आपण ‘पिपली लाईव्ह’पासून तमीळमधील ‘मंडेला’पर्यंतच्या अनेक चित्रपटांतून राजकारणी, पोलिस, पत्रकार आणि न्यायव्यवस्थेनं एकत्र येऊन एखादी समस्या सोडवताना निर्माण झालेल्या ब्लॅक ह्यूमरवरचे चित्रपट पाहिले आहेत. यशोवर्धन मिश्रा दिग्दर्शित ‘कटहल’ हा चित्रपट एक चोरी आणि त्यातून तयार झालेल्या तुफान विनोदी प्रसंगांची मालिका सादर करतो. सतत हसत ठेवणारा संयत विनोद, खिळवून ठेवणारी कथा, संगीत व कलाकारांचा अभिनय यांच्या जोरावर जमून आलेला हा उपहास तुमचे छान मनोरंजन करतो.
‘कटहल’ची कथा उत्तर प्रदेशातील मोबा या गावात सुरू होते. गावचा आमदार मुन्नालाल पटेरिया (विजय राज) याच्या घरातील अंगणातील दोन कटहल (फणस) एका रात्री चोरी होतात. दुर्मिळ प्रजातीच्या झाडाचे कटहल चोरी गेल्यानं आमदार पोलिसांना धारेवर धरतो आणि कटहल न मिळाल्यास उपोषणाचा इशारा देतो. या चोरीच्या चौकशीची जबाबदारी इन्स्पेक्टर महिमा बसोरवर (सान्या मल्होत्रा) दिली जाते.
हवालदार सौरभ द्विवेदी (अनंत जोशी) तिला या कामात मदत करणार असतो, तर दोघांचं प्रेमही जुळलेलं असतं. मात्र, महिमाला प्रमोशन मिळाल्यानं सौरभच्या घरच्यांचा या विवाहाला विरोध असतो. पत्रकार अनुज (राजपाल यादव) या चोरीची सनसनाटी बातमी देण्यासाठी कसरती करत असतो. श्रीवास्तव (विजेंद्र काला) हा फॉरेन्सिक अधिकारी महिमाला मदत करीत असतो. दोन फणसांसाठी पोलिस दलाला वेठीस धरलेलं महिमाला पटलेलं नसतं.
आणखी काही महत्त्वाचे तपास त्यामुळं मागं पडत असतात. महिमा एक खोटी बातमी पसरवते व त्यामुळं तपासाची दिशाच बदलून जाते आणि तुफान हास्यस्फोटक प्रसंगांनंतर सर्वांना न्याय मिळतो. महिमानं पसरवलेली बातमी काय असते, सौरभ व महिमाच्या प्रेमाचं काय होतं, आमदाराला त्याचे कटहल मिळतात का या प्रश्नांची मजेदार उत्तरं चित्रपटाचा शेवट देतो.
कथेतील उपहास हेच तिचं बलस्थान आहे. पंधरा किलोचे दोन कटहल शोधण्यासाठी पोलिस दल कामाला लावण्याचा हास्यास्पद निर्णय आणि या टीमनं केलेल्या चुका धमाल आणतात. खोचक वनलायनर आणि कलाकारांनी चहेऱ्यावरील रेषही हलू न देतात केलेले विनोद सतत हसवत ठेवतात. महिमाच्या निर्णयानंतर कथा मोठं वळण घेते, मात्र या तुलनेनं गंभीर भागतही विनोदी प्रसंगाची मालिका सुरूच राहते. शेवट अपेक्षित असला तरी, त्याचं सादरीकरण भन्नाट आहे.
जातीय उतरंड, मुलींना समाजात मिळणारं दुय्यम स्थान, मुलापेक्षा मुलगी मोठ्या पदावर असल्यास लग्नाला घरच्यांचा विरोध, आधुनिक राहणीमान असल्यास मुलीला उथळ समजण्याचा मानसिकता अशा अनेक विषयांना कथेच्या ओघात हात घातला जातो, मात्र तो कुठंही ‘डोस’ वाटत नाही. हलकं फुलकं पार्श्वसंगीत आणि गाणीही मजा आणतात.
अभिनयाच्या आघाडीवर सान्या मल्होत्रानं कमाल केली आहे. विनोदी भूमिका अत्यंत सहज व कोणताही आक्रस्ताळेपणा न करता जमू शकते, हे तिनं दाखवून दिलं आहे. तिचं विनोदाचं टायमिंगही जबरदस्त. अनंत जोशी या नवोदित कलाकारांना लाजऱ्या प्रियकराची भूमिका छान निभावली आहे. विजय राज, राजपाल यादव, विजेंद्र काला, रघुवीर यादव या मुरलेल्या कलाकारांनी हसे वसूल केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.