जाणून घ्या 'कान फिल्म फेस्टिव्हल'पर्यंत पोहोचलेल्या ‘या’ भारतीय चित्रपटांबद्दल

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
'कान फिल्म फेस्टिव्हल'पर्यंत पोहोचलेले चित्रपट
'कान फिल्म फेस्टिव्हल'पर्यंत पोहोचलेले चित्रपट

 

जागतिक दर्जाचा चित्रपटमहोत्सव अशी खरे तर 'कान फिल्म फेस्टिव्हल'ची ओळख. मात्र, या महोत्सवाचे स्वरूप अलीकडे काहीसे बदलत चालले आहे. चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी महोत्सवाच्या या बदलत्या स्वरूपावर जोरदार टीका केली आहे. 
 
-छाया काविरे ([email protected])

-------------------------------

जागतिक पातळीवर नावलौकिक असलेल्या चित्रपट महोत्सवांची वाट सिनेरसिक दरवर्षी आवर्जून पाहत असतात. कारण, 'क्लासिक्स' ह्या वर्गात मोडणारे एकाहून एक दर्जेदार चित्रपट अशा महोत्सवांमध्ये हमखास पाहायला मिळण्याची संधी असते. फ्रान्समधला 'कान फिल्म फेस्टिव्हल' हा अशाच महोत्सवांपैकी एक. मात्र, या महोत्सवातल्या क्लासिक्स सिनेमांच्या चर्चेऐवजी ह्या वेळी चर्चा रंगली ती अभिनेत्रींच्या कपड्यांविषयी! 

'‘कान फिल्म फेस्टिव्हल' हा आता फिल्म फेस्टिव्हल राहिलेला नसून 'फॅशन फेस्टिव्हल' झाला आहे’, अशी टीका काही चित्रपटनिर्मात्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून केली आहे. या वर्षीचा ७६ वा 'कान फिल्म फेस्टिव्हल' ता. १६ ते २७ मे या कालावधीत फ्रान्समध्ये पार पडला. स्वीडिश दिग्दर्शक रुबेन ऑस्टलंड हे या वर्षीच्या महोत्सवाचे 'ज्यूरी प्रेसिडेंट' होते. 

ऐश्वर्या राय, सारा अली खान, मोनी रॉय, विजय वर्मा, मनुश्री छिल्लर, ईशा गुप्ता, डॉली सिंग आणि उर्वशी रौटेला यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींनी महोत्सवाच्या रेड कार्पेटवर या वेळी हजेरी लावली. अभिनेत्री आणि चित्रपटनिर्मात्या नंदिता दास यांनी गेल्या रविवारी, 'कान'संदर्भात एक पोस्ट इन्स्टाग्रामवर सादर केली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी या महोत्सवाविषयीच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला व यापूर्वीच्या 'कान' महोत्सवातील अनेक जुने फोटो (थ्रोबॅक फोटो) शेअर केले आहेत. यात दिव्या दत्ता, रसिका दुगल, नवाजुद्दीन सिद्दिकी, झेविअर बर्डेम आणि सलमा हायेक यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींसोबतचे नंदिता यांचे स्वतःचे फोटो आहेत.

या फोटोंना कॅप्शन देताना नंदिता यांनी म्हटले आहे : “या वर्षी मी 'कान फेस्टिव्हल' खूप मिस केला. मात्र,  कधी कधी लोक हे विसरतात की, हा महोत्सव चित्रपटांचा आहे, कपड्यांचा नव्हे!”
-------------------------------

'कान फिल्म फेस्टिव्हल'बद्दल... 
जगातील सर्वात प्रतिष्ठित, ग्लॅमरस आणि काही वेळा वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा 'कान फिल्म फेस्टिव्हल' हा फ्रान्समधील 'कान' या शहरात आयोजित केला जाणारा जागतिक पातळीवरचा वार्षिक चित्रपट महोत्सव आहे. 

जगभरातल्या सर्व शैलींमधील नवीन चित्रपटांचे पूर्वावलोकन या महोत्सवात होत असते. सन १९३८ मध्ये फ्रान्सचे राष्ट्रीय शिक्षणमंत्री जाँ झे यांनी, इतिहासकार फिलिप अर्लंगर आणि सिनेपत्रकार रॉबर्ट फाव ले ब्रेट यांच्या प्रस्तावानुसार, 'इंटरनॅशनल सिनेमॅटोग्राफिक फेस्टिव्हल' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि 'कान फिल्म फेस्टिव्हल'ची सुरुवात झाली. सन १९५१ मध्ये 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशन्स'द्वारे (FIAPF)  या फेस्टिव्हलला औपचारिकरीत्या मान्यता देण्यात आली. 

'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'च्या धर्तीवर आणखी एक महोत्सव असायला हवा म्हणून म्हणा किंवा त्या फेस्टिव्हलशी स्पर्धा करण्याच्या मुख्य उद्देशानं म्हणा, 'कान फिल्म फेस्टिव्हल'ची सुरुवात झाली, असे म्हटले जाते. कारण, त्या वेळी 'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल' हा एकमेव आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता. 
-------------------------------
 
हे आहेत 'कान २०२३' साठी निवडले गेलेले चित्रपट व चित्रपटनिर्माते :  

१. मणिपुरी चित्रपटनिर्माते अरिबम श्याम शर्मा यांचा १९९०  मधला ‘इशानौ’ हा चित्रपट 'हेरिटेज फाउंडेशन'ने रिस्टोअर केला आहे. मणिपूरच्या माईबी संस्कृतीवर आधारित असलेला हा चित्रपट 'कान क्लासिक्स' विभागात प्रदर्शित केला गेला. भारताच्या संदर्भात ही उल्लेखनीय कामगिरी आहे. मात्र, ८८ वर्षांचे अरिबम श्याम शर्मा 'कान फेस्टिव्हल'ला गेलेले असूनही प्रकृतीच्या कारणास्तव स्वतःच्या चित्रपटप्रदर्शनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

२. 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे (FTII) विद्यार्थी युधाजित बसू यांच्या ‘नेहेमिच’ नावाच्या चित्रपटाची 'कान'च्या 'सिनेफाउंडेशन' या विभागात निवड झाली होती. तब्बल दोन हजार चित्रपटांमधून ही निवड केली गेली. ता. २४ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका महिलेचा 'पीरिअड हट' मध्ये मृत्यू झाला. या बातमीने बसू यांना 'पीरिअड हट’ या प्रथेबद्दल सखोल शोध घेण्यास प्रवृत्त केले. या प्रथेअंतर्गत, मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना गावाच्या सीमेवर घरापासून दूर असलेल्या अस्वच्छ आणि मातीच्या झोपड्यांमध्ये ठेवले जाते, अशी माहिती बसू यांना या शोधातून मिळाली व ‘नेहेमिच’ या चित्रपटाची निर्मिती झाली.

'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये चित्रपट प्रदर्शित करू शकलेले बसू हे दुसरे सर्वात तरुण भारतीय चित्रपटनिर्माते ठरले आहेत. 'सिनेफाउंडेशन' या विभागातील हा या वर्षीचा एकमेव भारतीय चित्रपट आहे. ‘नेहेमिच’ चित्रपटात एका भटक्या जमातीतील किशोरवयीन मुलीची कथा आहे. ही मुलगी मासिक पाळीदरम्यान झोपडीत एकटीच असते. खिडकीविरहित भिंती, गच्च छप्पर आणि अस्वच्छता अशी त्या झोपडीची भयंकर अवस्था असते. “पाळीसंदर्भातील या अंधश्रद्धा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, संपूर्ण भारतभरातल्या लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे आज आपल्या समाजात अस्तित्वात असलेल्या अमानवी रूढींवर भाष्य करणारा चित्रपट बनवणे गरजेचे होेते,” असे बसू म्हणतात.

३. कनू बहल आणि अतिका चौहान यांनी लिहिलेला 'आग्रा' हा चित्रपट कुटुंबातील 'सेक्शुअल डायनॅमिक्स'वर आधारित आहे. 'कान फिल्म फेस्टिव्हल'च्या 'डायरेक्टर्स फोर्टनाइट' या विभागात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर झाला. कनू बहल म्हणतात, “ 'आग्रा' हा चित्रपट माझ्यासाठी एक गहन आणि कठीण शोध होता. 'पुरुषांच्या लैंगिक विचारांचे-भावनांचे-वासनांचे नकळतपणे होणारे दमन' (Repression) या विषयावर हा चित्रपट आधारित असून या त्याची निर्मिती हे खूप आव्हानात्मक काम होते. 'डायरेक्टर्स फोर्टनाइट' विभागात ‘आग्रा’चा वर्ल्ड प्रीमिअर होणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर या विषयावर चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा आहे."