मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मराठी लघुपट ''चिरभोग''ची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली आहे. आसामी भाषेतील ''सक्षम''ला द्वितीय, तर तमीळ भाषेतील ''अछम थावीर''ला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
लघुपट, चित्रपटांच्या माध्यमातून मानवी हक्क संवर्धनाच्या सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी मानवाधिकार आयोगातर्फे मानवाधिकार आयोग लघुपट पुरस्कार स्पर्धा घेतली जाते. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष होते. एकूण १२३ लघुपट स्पर्धेत होते.
प्रथम क्रमांकासाठी दोन लाख रुपयांचा पुरस्कार आहे. समाजातील जात आणि व्यवसाय यावर आधारित भेदाभेद तसेच स्वातंत्र्य, समानता, सन्मान आणि मानवी हक्क यासाठीच्या संघर्षावर निलेश आंबेडकर यांनी ‘चिरभोग''मध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. भवानी डोले टाहू यांनी ''सक्षम''मध्ये दिव्यांग मुलाची कथा सादर केली आहे.
दिव्यांग व्यक्तींबद्दलची मानसिकता बदलण्याची गरज आणि संगोपनात भेदभाव न करण्याचा संदेश पालकांना देण्यात आला आहे. या लघुपटाला दीड लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाची रक्कम एक लाख रुपये इतकी आहे. टी. कुमार यांच्या ‘अछम थाविर’ मध्ये अनुचित स्पर्श आणि लैंगिक छळाबद्दल विद्यार्थिनींमध्ये तसेच शालेय प्रशासनामध्ये जागरूकता वाढविण्याचा संदेश या लघुपटाद्वारे देण्यात आला आहे.
मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण आयोगाने पुरस्कार विजेत्या लघुपटांची निवड केली. आयोगामध्ये डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि राजीव जैन या सदस्यांचा समावेश होता. ज्युरी समितीत मानवाधिकार आयोगाचे सरचिटणीस देवेंद्र कुमार सिंग, महासंचालक (अन्वेषण), मनोज यादव, रजिस्ट्रार (विधी), सुरजित डे, सहसचिव, अनिता सिन्हा आणि देवेंद्रकुमार निम, उपसंचालक, जेमिनीकुमार श्रीवास्तव आणि बाह्यतज्ज्ञ लिलाधर मंडलोई, माहितीपट निर्मात्या आणि आकाशवाणी तसेच दूरदर्शनच्या माजी महासंचालक प्रा. संगीता प्रणवेंद्र यांचा समावेश होता.
राजदत्त रेवणकर यांचाही सन्मान
''सर्टिफिकेट ऑफ स्पेशल मेन्शन'' गटासाठी निवडलेल्या लघुपटांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येईल. या श्रेणीत राजदत्त रेवणकर निर्मित ''द लॉस्ट प्रोग्रेस'' (हिंदी), इंजिनियर अब्दुल रशीद भट निर्मित "डोन्ट बर्न लिव्ज" (इंग्रजी), हरिलाल शुक्ला निर्मित "यू टर्न" (हिंदी) या लघुपटांचा समावेश आहे.