बनारसच्या सिड नियाझने गाण्यातून मांडली विणकर समाजाची व्यथा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
सिड नियाझ
सिड नियाझ

 

मलिक असर हाशमी 

रॅप संगीताकडे अनेकदा केवळ यमक जुळवणे किंवा हलकेफुलके मनोरंजन म्हणून पाहिले जाते. मात्र, बनारसच्या विणकर कुटुंबातील तरुण कलाकार सिड नियाझ हा समज खोटा ठरवत आहे. त्याच्यासाठी रॅप हे केवळ संगीत नाही. ते आपल्या समाजाच्या वेदना, संघर्ष आणि वास्तव मांडण्याचे एक माध्यम आहे. सिड नियाझ आपल्या गाण्यांतून विणकर आणि पसमांदा समाजाची दयनीय अवस्था जगासमोर आणतो. समाजातील एखाद्या मुलाला काळासोबत पुढे जायचे असल्यास त्याला धर्म, परंपरा आणि ईमानच्या नावाखाली का रोखले जाते, असा जाबही तो विचारतो.

बनारसच्या अंसारी बिरादरीतून आलेल्या सिड नियाझने अवघ्या ६ महिन्यांपूर्वी रॅपच्या विश्वात पाऊल टाकले आहे. या अल्प कालावधीत त्याने यूट्यूबवर सुमारे १५ गाणी प्रदर्शित केली आहेत. त्याची लोकप्रियता सध्या मर्यादित असू शकते. तरीही, त्याच्या प्रत्येक गाण्यात विणकर समाज आणि पसमांदा कुटुंबांच्या संघर्षाची धग स्पष्टपणे जाणवते.

सुरुवातीला लोकांनी त्याच्या गाण्यांमधील गांभीर्याकडे दुर्लक्ष केले. रॅपला सहसा हलकाफुलका किंवा कमी गंभीर प्रकार मानले जाते. मात्र, त्याची गाणी जसजशी एकामागोमाग एक समोर आली, तसतसे श्रोत्यांना उमजू लागले. सिड नियाझ रॅपच्या माध्यमातून काहीतरी मोठे आणि सखोल सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

खरे तर रॅप हे केवळ गाण्याचे रूप नाही. ती एक बोलली जाणारी कविता आहे. यात कलाकार लय आणि तालाच्या साथीने आपले विचार प्रभावीपणे मांडतो. सिड नियाझ याच शैलीचा वापर करून आपल्या समाजातील वास्तव मांडत आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाइलनुसार, तो विणकर कुटुंबातून येतो. स्वतःला संगीतकार, गायक आणि अभिनेता म्हणून स्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे तो आपल्या गाण्यांच्या अल्बममध्ये स्वतःच अभिनय करतो. कॅमेरा आणि एडिटिंगची जबाबदारी इम्रान सिद्दीकी सांभाळतो.

तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले त्याचे नवीन रॅप साँग ‘दुआएं देता रहा’ वरकरणी रोमँटिक वाटू शकते. मात्र, त्यामध्ये विणकर कुटुंबातून आलेल्या एका तरुणाचा संघर्ष दडलेला आहे. यापूर्वी त्याचे गाजलेले गाणे ‘भुमर जोत देने’ बनारस, मुगलसराय, सुरत आणि बेंगळुरू येथील विणकर समाजाला समर्पित आहे.

या गाण्यात सिड नियाझ आणि रायडर अबरार अंसारी यांनी जुलाहा संस्कृती अतिशय मजेशीर, देशी आणि बनारसी अंदाजात सादर केली आहे. बनारसी बोलीभाषा, हिप-हॉप आणि विनोदाच्या मिश्रणामुळे हे गाणे खास बनले आहे. असे असले तरी त्यामागे विणकरांचे कष्ट आणि त्यांच्या जीवनाची झलकही पाहायला मिळते.

सिड नियाझचे आणखी एक महत्त्वाचे गाणे ‘अंसारी खानदान’ हे आहे. यामध्ये त्याने आपल्या कुटुंबाची खाजगी कहाणी मांडली आहे. आपल्या आई-वडिलांना एकेकाळी घरातून बाहेर काढण्यात आले होते, असे तो या गाण्यात सांगतो. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्यांना प्लास्टिक अंथरून रात्र काढावी लागत असे.

त्याची आई लोकांच्या घरी काम करत असे आणि वडील मागावर (लूम) कष्ट करत होते. काळानुसार परिस्थिती काहीशी सुधारली, तरीही संघर्ष संपला नाही. कुटुंबाच्या इच्छेनुसार त्याच्या एका भावाला हाफिज-ए-कुराण बनवण्यात आले. मात्र, त्याच्या अकाली मृत्यूने संपूर्ण कुटुंब कोलमडून पडले.

‘अंसारी खानदान’ या रॅप साँगमध्ये सिड नियाझने आपल्या कुटुंबात आणि समाजात चालणारे सुन्नी-वहाबी मतभेद अधोरेखित केले आहेत. तसेच इस्लामच्या नावाखाली त्याला रॅप गाण्यापासून रोखण्यासाठी दिले जाणारे युक्तिवादही त्याने मांडले आहेत. कष्टाने भाकरी कमावणाऱ्या विणकरांकडे वारंवार संशयाच्या नजरेने का पाहिले जाते, असा सवाल तो उपस्थित करतो. या गाण्यातून हातमाग व्यवसायाच्या ऱ्हासाचे दुःखही व्यक्त होते. आज लाखो विणकर कुटुंबांचे हेच वास्तव आहे.

चार आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेले त्याचे ‘तेरी सोच पर खरोंच’ हे गाणे समाजातील मानसिक द्वंद्व आणि संकुचित विचारसरणीवर थेट प्रहार करते. तसेच ‘मां’ या विषयावर आधारित त्याचे एक स्वतंत्र रॅप साँग आहे. यात त्याने आपल्या आईचा संघर्ष, त्याग आणि कणखरपणा अतिशय भावूकपणे सादर केला आहे. ‘अंसारी खानदान’ गाण्याच्या व्हिडिओमध्ये पॉवर लूम आणि तेथील कारागीर दाखवण्यात आले आहेत. यामुळे हे संगीत थेट जमिनीशी जोडले जाते.

सध्या सिड नियाझची गाणी खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय नाहीत. फेसबुकवर त्याचे सुमारे साडेनऊ हजार फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर त्याच्या गाण्यांना ३ ते ३.५ हजारांच्या आसपासच व्ह्यूज मिळत आहेत. मात्र, पसमांदा समाज आणि विणकर समुदायात त्याच्या गाण्यांचे ज्या प्रकारे कौतुक होत आहे, त्यावरून तो एक सशक्त आवाज बनून पुढे येत असल्याचे स्पष्ट होते.

कलेचे माध्यम कोणतेही असो, त्यात सत्य आणि मातीशी जोडलेली वेदना असेल, तर ते लोकांपर्यंत नक्कीच पोहोचते, हे सिड नियाझच्या रॅपवरून सिद्ध होते. केवळ लोकप्रिय होणे हा त्याचा उद्देश नाही. आपल्या समाजाची कहाणी स्वतःच्या शब्दांत मांडण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यामुळेच त्याचा आवाज सध्या मर्यादित वर्तुळात ऐकला जात असला, तरी भविष्यात हा आवाज अधिक बुलंद होण्याची पूर्ण शक्यता आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter