जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांनी या आठवड्यात भारताची वाट धरली आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या एका महत्त्वाच्या Ai (कृत्रिम बुद्धिमत्ता) परिषदेसाठी हे दिग्गज एकत्र येत आहेत. या कंपन्यांचा उद्देश वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भारतीय बाजारपेठेत आपला विस्तार करणे हा आहे. ब्रिटन, दक्षिण कोरिया आणि फ्रान्सनंतर आता भारत या 'एआय इम्पॅक्ट समिट'चे यजमानपद भूषवत आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत या कार्यक्रमात 'ओपनएआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन आणि 'अल्फाबेट'चे सुंदर पिचाई यांसारखे दिग्गज सहभागी होत आहेत. अँथ्रोपिकचे प्रमुख डारियो अमोडेई आणि गुगल डीपमाईंडचे डेमिस हसाबिस देखील यावेळी उपस्थित राहतील. एनविडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग हे देखील येणार होते, मात्र काही "अपिरहार्य कारणांमुळे" त्यांनी शनिवारी आपला दौरा रद्द केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या जागतिक नेत्यांचे जंगी स्वागत करतील. तरुण आणि तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांसह प्रतिभेचा मोठा साठा ही भारताची ओळख असून एआयच्या विकासासाठी ही बाजारपेठ अत्यंत फायदेशीर आहे. "ही परिषद भारतीय बाजारपेठेच्या क्षमतेची मोठी पावती आहे. भारताकडे दुर्लक्ष करणे आता कोणालाही परवडणारे नाही, हे लक्षात आल्यामुळेच सर्वजण येथे येत आहेत," असे 'एएनएसआर'चे मुख्य कार्यकारी अधिकारी ललित अहुजा यांनी म्हटले आहे. ही परिषद अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या दिशेने पावले टाकत आहेत.
गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने भारताला जागतिक तंत्रज्ञान महासत्ता बनवण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे. देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी १८ अब्ज डॉलर्सच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. सरकार ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन भारतात वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदार भारतीय स्टार्टअप्सवर विश्वास दाखवत असून शेअर बाजारातही आयपीओचा ओघ वाढला आहे. 'काउंटरपॉईंट रिसर्च'चे नील शाह यांच्या मते, तंत्रज्ञानाला मिळणारा सरकारी पाठिंबा हा बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी विस्तार करण्यासाठी रेड कार्पेट आहे. या आठवड्यात अनेक मोठे गुंतवणुकीचे करार जाहीर होण्याची शक्यता असून नवी दिल्ली जगासमोर संधींची नवी दारे उघडेल.
या परिषदेत पायाभूत सुविधा, वापरकर्ते आणि प्रतिभा या तीन मुद्द्यांवर एआयचा प्रामुख्याने विचार होईल. एआय डेटा सेंटर्ससाठी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबरमध्ये ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि इंटेल यांनी भारतात एआय पायाभूत सुविधा आणि चिप्स निर्मितीची वचनबद्धता व्यक्त केली होती. 'ओपनएआय'च्या चॅटजीपीटीसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सध्या कोणतीही मोठी स्वदेशी स्पर्धा नसल्यामुळे अमेरिकन चॅटबॉट्सना वापरकर्ते आणि डेटा मिळवण्यासाठी येथे चांगली संधी आहे.
टेक महिंद्राचे शाम अरोरा यांच्या मते, भारत ही "एआय टॅलेंट फॅक्टरी" आहे. भारतात जागतिक क्षमता केंद्रांची (जीसीसी) संख्या वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थापन झालेल्या ६० टक्क्यांहून अधिक केंद्रांचा भर एआय, डेटा आणि डिजिटल इंजिनिअरिंगवर आहे. पुढील सहा ते आठ महिन्यांत सुरू होणारी ८० टक्क्यांहून अधिक केंद्रे एआय आधारित असतील. कंपन्या केवळ अभियंत्यांसाठीच नव्हे, तर वरिष्ठ नेतृत्व पदांसाठीही भारताकडे पाहत आहेत. ललित अहुजा यांच्या मते, आता भारतात 'चीफ एआय ऑफिसर' सारखी पदे निर्माण होत असून प्रतिभेच्या उपलब्धतेमुळे हे शक्य होत आहे.