जम्मू-काश्मीर पोलिसांनी अलीकडेच उघडकीस आणलेल्या 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या अनेक डॉक्टरांनी २०१६ मध्ये कट्टरपंथी बनल्यानंतर केंद्रशासित प्रदेश आणि इतर ठिकाणी विध्वंसक कारवाया करण्यासाठी 'अन्सार इंटरिम' नावाची नवीन दहशतवादी संघटना स्थापन केली होती, अशी माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करत आहे.
श्रीनगरच्या बाहेरील नौगाम येथील बनपोरा भागात १९ ऑक्टोबर रोजी भिंतींवर जैश-ए-मोहम्मदची पोस्टर्स दिसल्यानंतर हे आंतरराज्य दहशतवादी जाळे पहिल्यांदा समोर आले. श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. त्यानंतर आरिफ निसार डार ऊर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद डार ऊर्फ शाहिद या तीन स्थानिक तरुणांना अटक करण्यात आली. या तिघांवर पूर्वी दगडफेकीचे गुन्हे दाखल होते. त्यांच्या चौकशीतून मौलवी इरफान अहमदचे नाव समोर आले.
शोपियानचा असलेला हा मौलवी पूर्वी पॅरामेडिक म्हणून काम करायचा आणि नंतर इमाम बनला होता. त्यानेच पोस्टर्सचा पुरवठा केला होता आणि आपल्या पदाचा वापर करून डॉक्टरांचे ब्रेनवॉश केले होते. तपासात असे आढळले की, आरोपी डॉक्टर मुझमिल गन्नी, उमर-उन-नबी (आता मृत), अदिल रादर आणि त्याचा फरार भाऊ मुझफ्फर रादर, मौलवी इरफान, कारी अमीर आणि तुफैल गाझी हे सर्व एप्रिल २०२२ मध्ये श्रीनगरमधील ईदगाह येथे भेटले होते.
या बैठकीत त्यांनी 'अन्सार इंटरिम' ही दहशतवादी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अदिलला 'अमीर' (प्रमुख), मौलवी इरफानला 'डेप्युटी अमीर' आणि गन्नीला खजिनदार बनवण्यात आले. 'अन्सार' हे नाव सहसा जागतिक स्तरावर प्रतिबंधित अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित मानले जाते. सक्रिय दहशतवाद्यांशी संपर्क तुटल्यानंतर आपण नवीन गट तयार केल्याचे अटक केलेल्या डॉक्टर आणि धर्मगुरूंनी चौकशीत सांगितले. या गटात प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या होत्या.
उमरने समन्वयक म्हणून सूत्रे हाती घेतली आणि गन्नीच्या मदतीने निधी व साहित्याची सोय करण्यास सुरुवात केली. २०२३ मध्ये या गटाने हरियाणातील सोहना आणि नूह येथून खतासह इतर साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली. उमरच्या सूचनेनुसार फरीदाबादमधील एका केमिकल शॉपमधून एनपीके म्हणजेच पोटॅशियम नायट्रेटची खरेदी करण्यात आली. अटक केलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, उमरने ऑनलाइन व्हिडिओ पाहून आयईडी (IED) बनवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. त्याने ट्रायसेटोन ट्रायपेरॉक्साईड (TATP) हे स्फोटक तयार करण्यात यश मिळवले होते, ज्याचा वापर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये आयईडी भरण्यासाठी केला जातो.
अदिलने नवीन सदस्यांची भरती सुरू केली आणि दक्षिण काश्मीरमधील दानिश ऊर्फ जासिर याला गटात सामील केले. अदिलने त्याला फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातील एका भाड्याच्या खोलीत नेले, जिथे उमर आणि गन्नी टीएटीपी स्फोटक साहित्य तयार करताना दिसले. उमरने नंतर दानिशला 'फिदाईन' (आत्मघाती) हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु आर्थिक परिस्थिती आणि इस्लाममध्ये आत्महत्या निषिद्ध असल्याच्या कारणास्तव त्याने शेवटच्या क्षणी माघार घेतली.
पुलवामा येथील २८ वर्षीय डॉक्टर उमर हा या जाळ्यातील सर्वात कट्टरपंथी सदस्य आणि मुख्य सूत्रधार होता. त्याचे जाळे काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेले होते. त्याने राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी किंवा धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणी 'व्हेईकल-बॉर्न आयईडी' (VBIED) म्हणजेच स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा मोठा स्फोट घडवून पळून जाण्याचा कट रचला होता.
मात्र, श्रीनगर पोलिसांनी गन्नीला अटक करून स्फोटके जप्त केल्यामुळे हा कट फिस्कटला. गन्नीच्या अटकेमुळे उमर घाबरला आणि त्यातूनच १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर अकाली स्फोट झाला, ज्यामध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला. उमरने यापूर्वी २०१६ आणि २०१८ मध्येही दहशतवादी गटात सामील होण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.