पाकिस्तानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; भारताचे राष्ट्रगीत गायल्याने चार विद्यार्थ्यांची हकालपट्टी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
पाकिस्तानच्या बाचा खान विद्यापीठातील भारताचे राष्ट्रगीत गाणारे विद्यार्थी
पाकिस्तानच्या बाचा खान विद्यापीठातील भारताचे राष्ट्रगीत गाणारे विद्यार्थी

 

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भारताचे राष्ट्रगीत गायल्यामुळे चार विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकले आहे. हे चारही विद्यार्थी चारसड्डा येथील बाचा खान विद्यापीठाचे असून त्यांनी एका युवा महोत्सवादरम्यान हे राष्ट्रगीत सादर केले होते.

विद्यापीठाचा हा युवा महोत्सव १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला होता. १२ फेब्रुवारी रोजी फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांनी चालू उत्सवाचा भाग म्हणून एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सादरीकरणाचा व्हिडिओ व्हायरल

कार्यक्रमादरम्यान फार्मसीचा तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी जिब्रान रियाझ याने छातीवर हात ठेवून 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. या सादरीकरणाच्या व्हिडिओमध्ये सय्यद रियाझ अहमद हा दुसरा विद्यार्थी देखील संगीताबद्दलचा उत्साह आणि आदराची भावना व्यक्त करत त्याच्यासोबत राष्ट्रगीत गाताना दिसत आहे.

या सादरीकरणाचा व्हिडिओ नंतर इतर विद्यार्थ्यांनी प्रसारित केला आणि तो वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर काही कट्टरपंथीयांनी कॅम्पसमध्ये या विद्यार्थ्यांशी हुज्जत घातली. त्यांनी या विद्यार्थ्यांना कॅमेऱ्यासमोर पाकिस्तान लष्कराच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास भाग पाडल्याची माहिती मिळाली.
 

विद्यापीठाची कारवाई आणि हकालपट्टी

या सर्व प्रकारानंतरही परिस्थिती चिघळली. विद्यापीठ प्रशासनाने या घटनेप्रकरणी फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांना बडतर्फ केले. हकालपट्टीच्या कारवाईसोबतच या विद्यार्थ्यांचे वसतिगृहातील प्रवेशही रद्द केले असून त्यांना तातडीने खोली रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी कुलगुरू, कुलसचिव, मुख्य सुरक्षा अधिकारी, फार्मसी विभाग प्रमुख आणि मुलांच्या वसतिगृहाच्या अधीक्षकांना माहिती देण्यात आली आहे. 

या कारवाईत जिब्रान रियाझ, सय्यद कातीब शाह, बशीर खान आणि मुराद खान या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांवर संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि देशाविरुद्ध घोषणाबाजी केल्याचा आरोप लावला आहे. भारताचे राष्ट्रगीत अशा पद्धतीने सादर केले गेले, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचू शकते, असे प्रशासनाने नंतर स्पष्ट केले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह

विद्यार्थ्यांचे निलंबन आणि या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे पाकिस्तानमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शैक्षणिक वातावरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे प्रदेशातील विरोधाभासही ठळकपणे समोर आला आहे. 

काही दिवसांपूर्वी याच चारसड्डा शहरात जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एक मेळावा झाला होता. कमांडर ओमर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका रोड शोमध्ये भारताविरुद्ध अत्यंत जहाल आणि टोकाची भाषा वापरली गेली तसेच जैशचे झेंडेही फडकवण्यात आले होते. या कार्यक्रमाला खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी सुरक्षा पुरवल्याचे वृत्त आहे. तरीही, त्याच शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमात भारताचे राष्ट्रगीत गायल्यामुळे चार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण नाकारून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

प्रशासकीय भूमिकेवर चिंता

या घटनेमुळे सोहेल आफ्रिदी यांची भूमिका आणि प्रांतातील एकूण प्रशासकीय वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रशासनाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक सोयीस्कर भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येते. एकीकडे दहशतवादी गटांशी संबंधित मेळावे आणि भारताविरुद्धचा द्वेषपूर्ण प्रचार कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडत असताना, दुसरीकडे सांस्कृतिक कार्यक्रमात परदेशी राष्ट्रगीत गाणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर कारवाई करणे, यातूनच पाकिस्तानची दुटप्पी भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter