'इन्स्टा हिलर'च्या जाळ्यात अडकला मुंबईचा तरुण; गमावले तब्बल १ कोटी रुपये

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुंबईतील एका २१ वर्षांच्या विद्यार्थ्याला 'इन्स्टाग्राम'वरील एका भोंदू बाबाने तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समस्या सोडवण्यासाठी आणि 'अध्यात्मिक उपचार' (Spiritual Healing) करण्याच्या नावाखाली या भामट्याने या तरुणाची मोठी फसवणूक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी मुंबईच्या ओशिवरा परिसरातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला इन्स्टाग्रामवर एका 'हिलर'ची (उपचार करणारा) जाहिरात दिसली होती. घरातील काही अडचणी आणि वैयक्तिक समस्यांमुळे हा तरुण मानसिक तणावाखाली होता. याच परिस्थितीचा फायदा घेत या भोंदूने त्याला आपल्या जाळ्यात ओढले.

सुरुवातीला या भामट्याने या विद्यार्थ्याचा विश्वास संपादन केला. "तुझ्या घरावर वाईट सावट आहे आणि ते दूर करण्यासाठी काही विशेष विधी करावे लागतील", असे सांगून त्याने टप्प्याटप्प्याने पैसे उकळण्यास सुरुवात केली. या विद्यार्थ्याने आपल्या घरातील सोन्याचे दागिने विकून आणि कुटुंबाच्या बँक खात्यातून पैसे काढून या भामट्याला दिले.

फसवणुकीचा हा आकडा जेव्हा १ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला, तेव्हा या विद्यार्थ्याला आपली चूक उमजली. त्याने त्या भामट्याकडे आपले पैसे परत मागितले असता, त्याने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. अखेर या तरुणाने आपल्या पालकांना ही सर्व हकीकत सांगितली आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भामट्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर हे पैसे वळवून घेतले आहेत. सायबर सेलच्या मदतीने पोलीस आता या 'इन्स्टा हिलर'चा शोध घेत आहेत. सोशल मीडियावरील अशा भ्रामक जाहिरातींना आणि भोंदू बाबांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.