नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान, भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (Digital Public Infrastructure) कशी आर्थिक सेवा अधिक सुलभ आणि परवडण्याजोगी बनवत आहे, यावर चर्चा करण्यात आली.
राणी मॅक्सिमा या संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या 'आर्थिक आरोग्यासाठी विशेष वकील' (Special Advocate for Financial Health) म्हणून काम पाहत आहेत. जागतिक स्तरावर वित्तीय समावेशनासाठी (Financial Inclusion) त्यांचा आवाज महत्त्वाचा मानला जातो. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वर (X) पोस्ट करत आपल्या आनंदाची भावना व्यक्त केली.
"भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे कशी मोठी क्रांती झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक सेवा सहज आणि कमी खर्चात उपलब्ध झाल्या आहेत, यावर आम्ही चर्चा केली. यामुळे लोकांचे 'इज ऑफ लिव्हिंग' वाढले असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे सक्षमीकरण झाले आहे," असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. भारताने मिळवलेले हे यश आणि अनुभव इतर भागीदार देशांसोबत वाटून घेण्यास भारत नेहमीच कटिबद्ध असल्याचेही मोदींनी या वेळी स्पष्ट केले.