लष्कर भरती प्रक्रियेत बदल

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Indian Army Recruitment Rules Changed
Indian Army Recruitment Rules Changed

 

श्रीनगर: बुद्धिमत्तेबरोबरच ताकदीचे योग्य संतुलन साधण्याच्या हेतूने लष्कराने आपल्या भरतीच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लष्करात भरती प्रक्रियेच्या शेवटी लेखी परीक्षा घेतली जात होती. मात्र, आता भरतीच्या पहिल्या टप्प्यातच लेखी परीक्षा घेतली जाईल. भरतीप्रक्रियेतून निवडले जाणार उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि बुद्धिमान असतील, यावर भर असेल, असे लष्कराचे भरती अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उमेदवारांच्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या या लेखी परीक्षेनंतर घेतल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
कर्नल सुरेश पुढे म्हणाले, की लष्कराच्या भरती प्रक्रियेत करण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे लेखी परीक्षेसाठी आता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असेल. मात्र, त्यातही भारतीय लष्कर प्रत्येकी २५० रुपये देईल. त्यामुळे, उमेदवारांना प्रत्येकी २५० रुपयेच द्यावे लागतील. अग्निवीरांच्या भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, या महिन्यात त्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
लष्कराच्या बदललेल्या भरती प्रक्रियेनुसार, प्रत्यक्ष भरती मेळाव्यापूर्वी ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. भरती प्रक्रियेतील या बदलासंदर्भात लष्कराने विविध वृत्तपत्रांतही जाहिराती दिल्या होत्या.
 
तीन टप्प्यात भरती
लष्कराची भरती तीन प्रमुख टप्प्यात होईल:
पहिला टप्पा
भरतीसाठी नोंदणी केलेल्या आणि ऑनलाइन अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल
दुसरा टप्पा
निवडक उमेदवारांना प्रत्यक्ष भरती मेळाव्यासाठी बोलाविले जाईल. त्यासाठीचे, ठिकाण संबंधित लष्कर भरती कार्यालयाद्वारे निश्चित केले जाईल. या ठिकाणी उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी व शारीरिक मोजमाप घेतले जाईल.
तिसरा टप्पा
तिसऱ्या व अंतिम टप्प्यात भरती मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.