जागतिक तापमानवाढीचा भाग म्हणून भारतातही तापमानात मोठी वाढ होऊन होरपळ होण्याची; तसेच योग्य काळजी न घेतल्यास उष्माघाताने जास्त लोक दगावण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठीची काळजी कशी घ्यायची, याचे मार्गदर्शन.
- डॉ. अनंत फडके
उष्माघात होतो म्हणजे काय होते? उष्माघात का होतो, याची माहिती करून घेण्याची गरज आहे. उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे. त्यावर वेळेवर योग्य उपचार केले नाहीत, तर मृत्यू येऊ शकतो. उष्माघातात खूप ताप येऊन शरीराचे तापमान १०४ अंश फॅरेनहाईटच्या पुढे जाते. हवा खूपच दमट असेल तर तापमान एवढे वाढत नाही. त्वचा लाल होते, हाताला खूप गरम, कोरडी लागते. अजिबात घाम येत नाही. ती व्यक्ती ग्लानीत जाते, कधी कधी बेशुद्ध होते, कधी कधी झटकेही येतात. नाडी फार जलद होऊन रक्तदाब खालावतो. रक्त-तपासणीत काही विशिष्ट दोष आढळतात. वेळेवर, योग्य उपचार केले नाहीत तर मृत्यू येतो.
आपल्या शरीराचे तापमान वर्षातील सर्व ऋतूत ३७ अंशाच्या खाली राहावे, अशी निसर्गाची योजना असते. त्यासाठी शरीरात एक ‘तापमान-संतुलन-व्यवस्था’ असते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला घाम जास्त येतो आणि तो वाळताना शरीरातील उष्णता वापरली जाऊन शरीराचे तापमान वाढत नाही. या उलट थंडीत आपल्याला घाम कमी येतो. या तापमान-संतुलन-व्यवस्थेवर तीव्र उन्हाळ्यात फार ताण पडला तर ती बिघडून उष्माघात होऊ शकतो. विशेषत: उन्हात किंवा गरम वातावरणात श्रमाचे, अंगमेहनतीचे काम करावे लागले व त्याच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी काही उपाय केले नाहीत तर आपली तापमान-संतुलन-व्यवस्था कोलमडून ‘उष्माघाताचा झटका’ येऊ शकतो.
काळजी कशी घ्यावी?
तीव्र उन्हाळा असल्यास म्हणजे हवेचे तापमान नेहमीपेक्षा ५ सेंटिग्रेडने वाढल्यास किंवा ४५ अंशांपेक्षा जास्त झाल्यास उष्माघाताची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तहान नक्की भागवावी. त्यासाठी वारंवार म्हणजे दर तासाला एक ग्लास पाणी प्यायला हवे व दिवसातून तीन-चार वेळा तरी पाण्यात, लिंबू-सरबतात किंवा ताकात मीठ मीठ घालून प्यायला हवे. (लघवी गडद पिवळी झाली तर समजायचे की आणखी पाणी प्यायला हवे) तीव्र उन्हाळ्यामध्ये भर उन्हात सतत तसेच खूप श्रमाचे काम करणे टाळावे. मधूनमधून सावलीत थांबावे. शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी. उन्हात काम करावे लागलेच, तर पांढरे किंवा फिकट रंगाचे शरीर पूर्ण झाकणारे सुती कपडे घातल्याने सूर्य-किरण शरीरात शोषले न जाता परावर्तीत होतात. कपडे गळाबंद असू नयेत, हवा खेळती राहील असे सैलसर असावे. घरातून बाहेर पडतांना, विशेषत: प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे.
पाच वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, खूप लट्ठ व्यक्ती, दारुच्या अमलाखाली असणारे, काही विशिष्ट औषधे घेणारे यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. तसेच रस्त्यावर, शेतात काम करणारे श्रमिक, रस्त्यावर विक्रीसाठी फिरणारे निरनिराळे फेरीवाले, उन्हात खूप वेळ वाहने चालवणारे रिक्षाचालक, गरम वातावरणात काम करावे लागणारे कामगार यांनीही विशेष काळजी घ्यावी. दमट हवेत काम करणा-यांना त्या हवेमुळे उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम न आल्याने अशांनाही उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते.
सर्व सार्वजनिक ठिकाणी (शैक्षणिक संस्था, दुकाने, सरकारी व खाजगी कचे-या, दवाखाने, रुग्णालये, प्रवासी थांबे, रेल्वे स्टेशन इ.इ.) येणाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी पुरेसे व मोफत उपलब्ध करून देणे हे त्या त्या संस्थांचे कर्तव्य आहे.
उष्माघात कसा ओळखावा?
उष्माघात अगदी अचानक, अनपेक्षित येत नाही. नीट लक्ष दिल्यास त्याची आधी चाहूल लागते. उन्हाळ्यात तहान, थकवा घालवण्यासाठी मीठ-पाणी, सावलीत, गार हवेत विश्रांती अशा गोष्टी पाळल्या नाहीत, शरीरातील तुलनेने सौम्य बिघाडाकडे, पूर्व-सूचनेकडे दुर्लक्ष केले तर खूप थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे, पायाचे व पोटाचे स्नायू दुखणे, त्यात पेटके येणे (heat cramps) असा त्रास होतो. हा त्रास म्हणजे उष्माघाताची पूर्वसूचना होय. ती ओळखून सावलीत, शक्यतो गार जागेत विश्रांती घेणे, मीठ घालून भरपूर पाणी घेणे हे कटाक्षाने करायला हवे. अशी पुरेशी काळजी घेतली गेली नाही आणि पाणी किंवा मीठ कमी पडले तर शरीरातील बिघाड वाढून उष्म-दमछाक असा त्रास होतो.
यात खूप घाम येतो, प्रचंड थकवा येतो, चक्कर मळमळ, उलटी असा त्रास होतो. कधी कधी ताप येत नाही, उलट कातडी थंड लागते. कधी कधी भ्रमिष्टासारखी अवस्था होते. अशा माणसाला वेळीच सावलीत, शक्यतो गार जागेत हलवून विश्रांती द्यायला हवी. भरपूर पाणी व पुरेसे मीठ पोटात जाईल असे पाहावे. असे नाही केले तर शेवटी उष्माघाताचा झटका (heat stroke) येतो. वर दिल्याप्रमाणे अशा व्यक्तीमध्ये १०४ डिग्री पेक्षा जास्त ताप, ग्लानी/बेशुद्धी किंवा झटके, कोरडी त्वचा, जलद नाडी, घसरलेला रक्तदाब अशी लक्षणे, चिन्हे दिसतात.
उपचारांचे स्वरूप
उष्माघाताची वर दिलेली लक्षणे, चिन्हे दिसली तर त्वरित उपचार करावेत. प्रथमोपचार म्हणून रुग्णाला सावलीत, गार जागेत हलवणे, कपडे काढून ओली चादर लपेटणे, त्यावर वारा घालत राहावा. गार पाण्याने अंग पुसत रहावे, बर्फ, बर्फाचे पाणी मिळाल्यास त्याचा वापर करावा. दवाखान्यात नेल्यावर या रुग्णाचे तापमान लवकरात लवकर, शक्यतो काही मिनिटांमध्ये ३८ अंशांच्या खाली आणण्यासाठी रुग्णावर गार पाण्याचा फवारा उडवून त्याला पंख्याच्या झोताखाली ठेवतात. बर्फ, बर्फाचे पाणी असल्यास वापरतात. फ्रीजमध्ये ठेवलेले सलाईन नीलेवाटे देणे, बर्फाच्या पाण्याचा एनिमा देणे असे उपायही परिस्थितीनुसार केले जातात. मात्र गार पाण्याचा फवारा व पंख्याचा झोत यावरच सहसा जोर देतात. मलेरिया इ. दुसरा कोणता आजार नाही ना, उष्माघातामुळे शरीरात आणखी काही बिघाड झालेला नाही ना, हे बघण्यासाठी रक्त इ. तपासतात आणि गरजेनुसार पुढील उपचार करतात.
काही महत्त्वाच्या सूचना
• उन्हात, गरम हवेत सतत काम करणे टाळावे. मधून मधून सावलीत थांबावे. शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी.
• तहान शिल्लक ठेवू नये. त्यासाठी दर तासाला एक ग्लासएवढे पाणी प्यावे. (लघवी गडद पिवळी होणार नाही एवढे.)
• हवेचे तापमान ४४ अंशांपेक्षा पेक्षा जास्त असेल तर शाळा, महाविद्यालये, कचेऱ्या, दुकाने इ. सकाळी ११ ते दुपारी ४ बंद ठेवाव्यात.
• दिवसातून तीन-चार वेळा तरी पाण्यात मीठ घालून प्यावे.
• शरीर पूर्ण झाकले जाईल; पण हवा खेळती राहील असे पांढरे किंवा फिकट रंगाचे, सुती कपडे घालावे.
• घरातून बाहेर पडतांना, विशेषत: प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे.
• उष्माघाताची शंका आल्यास लगेच सावलीत नेऊन, अंगावर ओली चादर लपेटून वारा घालत दवाखान्यात न्यावे.