जागतिक लसीकरण दिन : आजवर अडीच हजार कोटी लशींचे डोस देऊन 'सिरम'ने वाचवलेत लहानथोरांचे प्राण

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक उमेश शाळीग्राम
सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक उमेश शाळीग्राम

 

दरवर्षी १० नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक लसीकरण दिन' म्हणून साजरा केला जातो. सुदृढ आरोग्यासाठी लसीकरणाचे  महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. कोरोना महामारीच्या काळात लसीकरणाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. कोरोनावरील लसनिर्मितीत भारताच्या योगदानाने जग अवाक झाले. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट या औषध निर्मात्या कंपनीने कोरोनावरील 'कोव्हीशिल्ड' ही पहिली लस बाजारात आणली होती. जागतिक लसीकरण दिनानिमित्त सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक (संशोधन आणि विकास विभाग) उमेश शाळीग्राम यांच्याशी 'आवाज मराठी'ची प्रतिनिधी पूजा नायक यांनी साधलेला संवाद...

 

प्रश्न- जगभरातील वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यांपैकी ६५ टक्के लसी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. तर अशा या सिरम इन्स्टिट्यूटचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? 
- सिरम इन्स्टिट्यूटचा प्रवास आत्तापर्यंत बऱ्याच स्वरूपात प्रकाशित झाला आहे व उपलब्ध आहे. तरी पण संक्षिप्त / थोडक्यात सांगायचे झाले तर डॉ. सायरस पूनावाला ह्यांनी १९६७ साली सीरम इंस्टिट्यूटची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज सिरम इस्टिट्यूटमध्ये अत्यल्प दरात उच्च प्रतीच्या लसी  गरिबातल्या गरीब देशांना पुरवठा करण्यात येतो. डॉ. सायरस पूनावाला ह्यांनी सिरममध्ये पायाभूत सुविधांची उभारणी करून व जगभरातील अत्याधुनिक तंत्रज्ञान येथे आणून लस निर्मितीवर भर दिला. आत्तापर्यंत विविध लसींचे कोट्यवधी (अडीच हजार कोटी) डोस हे जगभरातील मुलांना देऊन त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत.

प्रश्न- विशेषतः मागील दहा वर्षात कोणते बदल झाले आणि त्याचा एकूणच परिणाम काय झाला?
- मागील दहा वर्षात तंत्रज्ञान झपाट्याने बदलले असून 'कमी कालावधीत अधिक मागणी" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पणे हे नवनवीन तंत्रज्ञान आम्ही सहजपणे (agility) आत्मसात करून वाढीव मागणी पुरवण्याचे आमचे ध्येय आम्ही पूर्ण केले आहे.

प्रश्न- लसींची जागतिक बाजारपेठ आणि त्यात भारताला मिळणाऱ्या संधी यांच प्रमाण कसं आहे? त्यात सिरमसारख्या इन्स्टिट्यूटच नेतृत्व भारतीय उत्पादकांना कसं प्रोत्साहित करते?
- लस उत्पादन क्षेत्राच्या जागतिक बाजारपेठेत भारताला मिळणारी संधी अमाप आहे. स्वस्तदरात चांगल्या प्रतीची लस मिळण्याकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित आहे. आणि भारत ह्या सगळ्यागरजा पूर्ण करण्यास सर्वात सक्षम असून सिरम इन्स्टिट्यूटनेच ह्याची सुरुवात केली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची सुरुवात सायरस पूनावाला ह्यांनी करून आता त्याच्या नेतृत्वाची धुरा आदर पूनावाला यशस्वी रित्या पार पाडत अत्यल्प दरात उच्च प्रतीची लस पुरवण्याचे मानस पार पाडण्यास सतत झटत असतात.

प्रश्न- कोविडनंतर सिरममध्ये कोणत्या लसींचे उत्पादन सुरू आहे?
कोविडनंतर सिरममध्ये मलेरिया आणि सर्व्हिकल कॅन्सरवर लस निर्मिती सुरु असून, ट्युबरकुलोसिस (क्षयरोग)चे पूर्वनिदान आणि त्यावरील लस ह्यावरदेखील काम सुरु आहे. या व्यतिरिक्त, विविध प्रकारचे कर्करोग आणि जीवनशैलीशी निगडित विविध आजारांवर संशोधन सुरु असून लवकरच ह्यावर देखील आम्ही स्वस्त औषधं उपलब्ध करून देणार आहोत.
 
प्रश्न- नुकतेच mRNA मध्ये नोबल पारितोषिक जाहीर झाले? यासंबंधी आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये काही संशोधन चालू आहे का?
- सिरम इन्स्टिट्यूटमध्ये mRNA वर संशोधन सुरु असून अमेरिका येथील ग्रीनलाइट बायोसायन्सेस आणि बेल्जियम येथील युनिव्हर्सल टेकनॉलॉजिस सोबत करार केले आहेत. ह्या करारांतर्गत "युनिक mRNA टेकनॉलॉजिवर काम करत "कोल्ड चेन सप्लाय / शीतसाखळी पुरवठा" हाताळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

प्रश्न- कोविड नंतर सरकारच्या ध्येय-धोरणात बदल झालेत का? झाले असतील तर ते कोणते आणि त्याचा लसी संबंधित संशोधनावर सकारात्मक परिणाम कसा होतोय?
- कोव्हीडच्या काळामध्ये सरकारने एक खूप चांगले काम केले आणि ते म्हणजे कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय संकुल स्थापन केले. त्यामुळे आपण कोव्हीड मधून लवकर बाहेर पडू शकलो. यापुढे जाऊन सरकार आरोग्य सेवा क्षेत्रात नावीन्य आणून विद्यमान आजार आणि भविष्यातील साथीच्या रोगांपासून देशाला सक्षम करण्यासाठी काम करत आहे.

प्रश्न- बराच वेळा संशोधनासाठी फायनान्स नसल्याची कुरबुर ऐकायला मिळते? तर आपल्यालाही अशा काही आव्हानांना सामोरे जावे लागते का?
- संशोधनासाठी निधी उपलब्धतेबाबत आमचे विचार फार वेगळे असून आम्ही ह्या मतावर ठाम आहोत कि संशोधनासाठी निधी हा नेहमीच उपलब्ध असून निधी पुरवणारे तुमच्या संशोधनात काही तरी वेगळेपण किंवा नावीन्य शोधत असतात. तसेच संशोधनाला चालना मिळावी म्हणून सरकारने "स्टार्ट-अप संस्कृतीला आर्थिक पाठबळ देऊ केले आहे. ICMR, DBT सारख्यासंस्था निधी पुरवण्यास तत्पर असतात. आणि त्यामुळेच आपण आपल्या संशोधनाद्वारे वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देऊ शकतो.

प्रश्न- देशाच्या जडणघडणीत संशोधनाचा मोठा वाटा असतो? मात्र हे संशोधन करत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरणीय स्तरावर कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते?
- जीवन म्हणलं कि आव्हाने ही आलीच, आणि त्या आव्हानांना तुम्हाला खंबीरपणे सामोरे जायला पाहिजे आणि ती सोडवली पाहिजे. तसेच एखादे संशोधन करतांना देखील आव्हाने हि येणारच ज्यांना तुम्हाला खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे.

प्रश्न- सिरमची भविष्यातील वाटचाल काय असेल?
- सिरम आता "निदान-उपचार प्रतिबंध " (डिटेक्ट-ट्रीट-प्रिव्हेंट) अशा इको सिस्टमवर काम करत आहे. तसेच नवनवीन तंत्रज्ञान वापरून भविष्यात येणाऱ्या साथींचा सामना करण्यासाठी कसे सज्ज होता येईल ह्याकडे लक्ष केंद्रित करीत आहोत.

प्रश्न- भारतासारख्या देशात लस आणि संशोधन या संबंधित प्रक्रियेमध्ये कोणत्या सुधारणा होण्याची गरज भासते?
- भारत हा लस पुरवठा बाबतीत एक अग्रेसर देश असून आपण पुरवलेल्या लसी ह्या जगमान्य आहेत. पण अमेरिका आणि युरोप सारख्या विकसित देशांना अधिकाधिक प्रमाणात लस पुरवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.

प्रश्न- सिरम मधील एकंदरीत कामाचा अनुभव कसा राहिला? देशात संशोधनात्मक उपक्रम राबविणे हे शाश्वत विकासासाठी कसे सहकार्य करेल?
- सायरस पूनावाला आणि अदार पूनावाला यांचे दूरदर्शी नेतृत्व लाभले हे आमचे भाग्य आहे. जगभरातील गरीब जनतेला अल्प दरात लस उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय आहे. सीरममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यात त्यांना विशेष रस आहे. ते सर्व प्रकल्प आणि त्याच्या प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष देतात. तसेच ते आपल्या कर्मचाऱ्यांना प्रकल्प पुर्तीकरीता सर्व स्वातंत्र्य देतात.