Hantavirus Outbreak: क्रूझवरवरील दोन भारतीयांना नेदरलँड्समध्ये केले क्वारंटाईन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

'एमव्ही हॉन्डिअस' या डच जहाजावर हंटाव्हायरसचा प्रादुर्भाव झाला. या क्रूझवरील दोन भारतीयांना सुरक्षितपणे नेदरलँड्सला हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत. स्पेनमधील भारतीय दूतावासाने रविवारी ही माहिती दिली.

'ओशनवाईड एक्सपेडिशन्स' कंपनीची ही एक आलिशान क्रूझ आहे. १ एप्रिल रोजी अर्जेंटिनाच्या उशुआया येथून या जहाजाने आपला प्रवास सुरू केला होता. जहाजावर हंटाव्हायरसची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर रविवारी हे जहाज स्पेनच्या कॅनरी बेटांवर पोहोचले.

प्रवाशांची सुटका आणि सुरक्षितता

या जहाजावर एकूण दीडशे जण होते. त्यात दोन भारतीय कर्मचारीही होते. हे जहाज कॅनरी बेटांवर नांगरून ठेवण्यात आले. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर एका निवेदनाद्वारे याबद्दलची सविस्तर माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि स्पॅनिश अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार प्रवाशांना जहाजातून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.

"स्पेनच्या 'नॅशनल सेंटर फॉर इमर्जन्सी मॉनिटरिंग अँड कोऑर्डिनेशन'ने आम्हाला महत्त्वाची माहिती दिली आहे. क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या दोन भारतीयांना नेदरलँड्सला हलवले आहे. आरोग्य सुरक्षेच्या नियमांनुसार तिथे त्यांना क्वारंटाईन (विलगीकरणात) ठेवले जाईल," असे या निवेदनात स्पष्ट केले आहे.

स्पेनमधील भारताचे राजदूत जयंत एन. खोब्रागडे स्पॅनिश अधिकारी आणि दोन्ही भारतीयांच्या सतत संपर्कात आहेत. त्यांची सुरक्षितता आणि प्रकृतीची पूर्ण काळजी घेतली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची मोठी कारवाई

प्रवाशांना खाली उतरवण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. "जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करत आहेत. ते स्पॅनिश आरोग्य मंत्रालयासोबत मिळून प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करत आहेत. तसेच, गृह मंत्रालयाच्या मदतीने चार्टर विमानांची व्यवस्था करत आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.

प्रवाशांना हलवण्याच्या या मोहिमेत प्रत्येक टप्प्यावर निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच 'पीपीई' किटचा (वैयक्तिक सुरक्षा उपकरणे) अत्यंत काटेकोर वापर करण्यात आला. "सर्वांची प्रकृती उत्तम असून कोणामध्येही लक्षणे नाहीत. बाह्य आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला आहे," असेही टेड्रोस यांनी सांगितले.

काय आहे हंटाव्हायरस?

हंटाव्हायरस हा प्रामुख्याने संक्रमित उंदीर किंवा त्यांच्या मलमूत्राच्या संपर्कात आल्याने माणसांमध्ये पसरतो. उंदरांची लाळ, लघवी आणि विष्ठा यातून हा संसर्ग वेगाने होतो. गोदावर, जहाजे, धान्याची कोठारे आणि साठवणुकीच्या बंदिस्त किंवा हवा खेळती नसलेल्या जागांवर याचा धोका सर्वात जास्त असतो. उंदराची लघवी, विष्ठा किंवा लाळेतून हवेत पसरलेले विषाणू श्वासावाटे शरीरात गेल्याने माणसांना याची लागण होते.

सध्या आढळलेली हंटाव्हायरसची प्रकरणे तुरळक असल्याचे दिसते. संसर्ग झाल्यानंतर साधारणपणे एक ते आठ आठवड्यांच्या दरम्यान आजाराची लक्षणे दिसू लागतात. या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 'एपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जहाजातून बाहेर पडलेल्या पाच प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण झाली आहे.