आज नाताळ सणाचा म्हणजे उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस. गोव्यात येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस नाताळ सणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. दियेस नातालीस या लेटीन भाषेंतल्या शब्दांतून जन्माचा दिवस म्हणून नाताल शब्द गोमंतकीय लोकजीवनात रूढ झाला. इसवीसनाच्या चौथ्या वर्षी २४ डिसेंबरच्या उत्तररात्री पॅलेस्टाईन देशातल्या बेथलेहेम येथे गुरांच्या गोठ्यात मरिया आणि योसेफ यांच्या कुटूंबात भगवान येशू ख्रिस्ताचा जन्म झाला.
येशू ख्रिस्तानंतर बाराव्या शतकापर्यंत जगभरातील ख्रिस्ती समाज शक्यतो यात्रेद्वारे प्रत्यक्ष पॅलेस्टाईनमधील बेथलेहेम येथे येशूच्या मूळ स्थानी जाऊन पवित्र जागेचे दर्शन घेत असत. परंतु, तेराव्या शतकाच्या प्रारंभी बेथलेहेम इस्लाम धर्मियाच्या ताब्यात गेल्यावर ख्रिस्ती यात्रेकरूंना पवित्र स्थळाचे दर्शन घेणे कठिण झाले.
१२३३ मध्ये इटली देशातल्या असिसी गावी फ्रान्सिस व त्याच्या साथीदारानी बेथलेहेममधील गोठ्याची हुबेहूब प्रतिकृती निर्माण केली. माता मरिया व बाल येशू यांच्या प्रतिमा समवेत त्या गोठ्यात सजीव गाई, बैल बांधले होते. या देखाव्याद्वारे बेथलेहेमच्या पवित्र स्थळाची स्मृती सजीव झाली आणि तेव्हापासून असा गोठा म्हणजे क्रीब करण्याची परंपरा जगभर सुरु झाली.
आदिमानव आदाम आणि आदिस्त्री एवा यानी देवाज्ञा मोडून प्रतिबंधित ज्ञानवृक्षाचे फळ भक्षण केले. त्यामुळे त्या दोघांच्या वाट्याला शाप आला. ज्ञानवृक्षामुळे माणसाला मरणाचा शाप लाभला आणि येशू ख्रिस्ताचा जन्म पृथ्वीतलावर झाला. शेवटी मानवाच्या मुक्तीसाठी वृक्षासमान असलेल्या क्रूसावर येशूला बलिदान करावे लागले. त्यामुळे नाताळात ख्रिसमस वृक्षाची प्रतिकृती उभारून तिला विविध फळाफुलांनी सजवले जाते आणि तिच्यावर रोषणाई केली जाते.
ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता कळलेले पूर्वेकडचे तीन ज्ञानवत आकाशात त्या वेळी उगवलेल्या ताऱ्याच्या दिशेनं शोध घेत बेथलेहेम येथे पोहचले आणि त्यानी जन्माला आलेल्या बालकाचे पूजन केले होते. त्या घटनेची आठवण म्हणून नाताळात घरासमोर दिवाळीतल्या आकाश कंदिलासारखा तारा लावला जातो. संत निकलसचेच रूप असणारा सांताक्लॉज लहान मुलांना खाऊ आणि खेळण्यांचे वाटप करत फिरतो.
येशु ख्रिस्ताने प्रतिपादन केलेले तत्वज्ञान कालांतराने ख्रिस्ती धर्मियांचे संचित झाले. गोव्यातल्या जुन्या काबिजादीतल्या तीसवाडी, बार्देस आणि सासष्टीतल्या प्रांतांवर जेव्हा पोर्तुगिजांनी आपली सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांनी स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात सक्तीने धर्मांतरण केले आणि त्यांना पूर्वाश्रमीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अतितापासून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यावेळी धर्मसमीक्षण संस्थेने नव ख्रिस्ती समाजावर असंख्य निर्बंध लागू केले. त्यानुसार त्यांना घर डुक्कराचे मांस खाणे बंधनकारक झाले. १७३६ साली ख्रिस्ती समाजावर तांदुळ शिजवताना त्यांत मीठ घालण्यावर बंदी घातली हिंदुसारख्या दैनंदिन व्यवहार, आहारावर निर्बंध घातले. पान सुपारी खाण्यावर प्रतिबंध घातले.
१८७८ च्या अँग्लो पोर्तुगीज तहाद्वारे गोव्याचा संबंध ब्रिटीशकालीन भारताशी आला - आणि त्यामुळे चहा, कॉफी, साखरेसारख्या घटकांचा वापर गोव्यात सुरु झाला. गोव्यातील हिंदू समाज प्रारंभी टॉमेटो बटाटे खाण्यास उत्सुक नसत. पोर्तुगीज धर्म प्रसारकांनी गोव्यातल्या नव ख्रिस्ती समाजात आपली अन्न संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी त्यांच्या जेवणखाणात नवीन पदार्थाबरोबर पूर्वाश्रमीचे घटकही आपला प्रभाव कायम ठेवण्यास कारणीभूत ठरले. भारतीय समाजात विनेगर वापरले जात नसल्याने पोर्तुगिजांनी माडापासून काढण्यात येणाऱ्या सूरीचा उपयोग विनेगर म्हणून करण्याचा पर्याय शोधला.
माडापासून काढण्यात येणाऱ्या सूरीपासून विनेगरची निर्मिती करण्याबरोबर तिचा वापर तांदळापासून वाफवून सान्नां, त्याचप्रमाणे गुळ आणि पाव करण्यासाठीही केला जाऊ लागला. नाताळाच्या सणाचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून गोडधोड करण्यात येऊ लागले. त्याच्यावर सांता मोनिका येथील कॉन्वेंटमध्ये धर्माचे शिक्षण घेणाऱ्या नन्सनी आपल्या मिठाईची परंपरा गोमंतकीय लोकजीवनात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबिंका, दोदेल, समोसे, लोणचे असे पदार्थ प्रसिद्धीस पावले. बिबिंका आणि दोदेल या मिठाईची चव काही प्रमाणात समान असली तरी बिबिंका तयार करण्यात प्रामुख्याने अंड्याचा उपयोग केला जातो तर दोदेलमध्ये अंडे वगळता माडाचा गुळ, दूध, गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ तसेच वेलची, जायफळ सारख्या घटकांचा वापर केला जातो बिबिंका या मिठाईची निर्मिती सांता मोनिका येथे ख्रिस्ती धर्माचे शिक्षण घेणाऱ्या बेबियाना या ननने केल्याचे मानले जाते.
गोव्यात नाचण्याचे सत्व, गोडाची भाकरी सारख्या गोड पदार्थाची परंपरा असून, इथल्या नाताळाच्या सणावेळी ख्रिस्ती घरात तयार केल्या जाणाऱ्या बिबिंका आणि दोदेल या दोन मिठाईचा आस्वाद घेण्याची लोकपरंपरा एकेकाळी लोकमानसात रूढ होती. गोव्यातल्या आदिवासी कुणबींचे पोर्तुगीज अमदानीत धर्मांतर करण्यात धर्मगुरूंना यश लाभले. असे असले तरी त्यांच्या जुन्या चालीरिती, परंपरा यांच्यापासून त्यांना कायमस्वरूपी परावृत्त करणे पूर्णपणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे आज ख्रिस्ती गावडा अशी ओळख असणाऱ्या जमातीत धालो उत्सवातली नृत्यपरंपरा अनुभवायला मिळते.
सण उत्सवप्रसंगी ख्रिस्ती गावडा गोमांस आणि घर डुक्कराचे मांस सहसा भक्षण करण्यास उत्सूक नसतात. अन्य जातीतल्या धमांतरीत ख्रिश्चनात घर डुक्कराच्या मासापासून तयार केले जाणारे सार्राबुल्हो, विंदाल्हो काबीदेला, फैजोदा, अस्सादोस, गायसादोससारखे अन्नपदार्थ सण उत्सवात आवडीने खातात. पोर्तुगिजांनी विंदाल्हो, चौरीसोस सारख्या मांसाहारी पदार्थांची निर्मिती करताना आपली परंपरा इथल्या लोकजीवनात रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे या अन्न संस्कृतीचा प्रभाव नाताळातल्या मांसाहारी खाद्यान्नावर पहायला मिळतो. सर्पातेल, विंदाल्हो सारख्या खाद्यपदार्थांवर पोर्तुगीज छाप कायम ठेऊन गोव्यातल्या ख्रिस्ती समाजाने इथल्या काही संस्कारांचे जतन केलेले पहायला मिळते. त्यामुळे नाताळातल्या गोउधोडात चवथीच्या सणातल्या नेवऱ्या, मोदक, शंकरपाळ्यांनाही स्थान लाभते,
१५६० साली पोर्तुगिजांनी गोव्यात धर्मसमीक्षण संस्थेची स्थापना करून, स्थानिकांवर जे निर्बंध घातले, त्यात खाणाजेवणाबाबतच्या नियमांचा समावेश होता. विवाहसोहळ्यातल्या मेजवानीत काय करावे आणि काय करू नये, वराच्या किंवा वधूच्या घरात तांदूळ कडधान्ये, नारळ, विड्याची पाने, सुपाऱ्या किंवा अन्य कोणतेही खाण्याचे जिन्नस पुढे विशिष्ट दिवशी शिजवून खाण्यासाठी म्हणून एखाद्या टोपलीत, सुपात, मातीच्या भांड्यात किंवा अन्यत्र ठेवूं नयेत असे आदेश दिले होते. असे असले तरी आपल्या पूर्वजांच्या खाणाजेवणाच्या काही परंपरा इथल्या ख्रिस्ती समाजाने पूर्णपणे सोडलेल्या नाही आणि त्याचेच दर्शन नाताळासारख्या सणातल्या अन्नसंस्कृतीवर पहायला मिळते.
येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा गोमंतकीय लोकमानसात नाताळ म्हणून साजरा केला जात असून, धर्म समीक्षण संस्थेच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मुल्यांचा विध्वंस करण्याच्या मानसिकतेमुळे पोर्तुगीज धर्मगुरू काही अंशी सफल झाले तरी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या समन्वयाची प्रचितीही नाताळावेळी पहायला मिळते. 'पयले नमन देवबाप्पा, दूसरे नमन देवासूता, तिसरे नमन इस्पिरी सांता सगळे देव एकचि रे', हा धार्मिक सलोखा आणि सांस्कृतिक अभिन्नता गोमंतकीय लोकजीवनात नाताळाच्या सणातून आजही पहायला मिळते आणि हा समृद्ध वारसा प्रसन्नतेचा अनुभव प्रदान करतो.
- राजेंद्र पां. केरकर