महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या बैठकांमध्ये चर्चा करताना व पोलिसांना निवेदन देताना मुस्लीम बांधव.
अनंतचतुर्दशी (गणेशविसर्जन) आणि ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) या दोन्ही सणांमधील साम्य म्हणजे, या सणांच्या दिवशी निघणाऱ्या भव्य मिरवणुका. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हे दोन्ही सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. विशेष म्हणजे, गणेशविसर्जनाची मिरवणूक आणि ईद-ए-मिलादनिमित्त काढले जाणारे जुलूस यांची वेळ जवळपास सारखीच असते. यावेळी हे दोन्ही सण एकाच दिवशी, म्हणजे २८ सप्टेंबरला आले होते. त्यामुळे हे उत्सव कसे साजरे होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील मुस्लिम समुदायाने, विविध मुस्लीम संघटनांनी एकत्र येत महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे जनतेकडून आणि पोलिस प्रशासनाकडून कौतुक होत आहे.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या (ईद-ए-मिलाद) मिरवणुकीबाबत मुस्लिम समुदायातील वेगवेगळ्या सामाजिक व धार्मिक संस्था, संघटना आणि व्यक्ती यांच्या पुढाकारातून विविध जिल्ह्यांत ‘विश्वस्त समित्या’ स्थापन करण्यात आल्या होत्या. या समित्यांच्या वतीने बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. काही बैठकांचे अयोजन पोलीस प्रशासनानेही केले होते. त्यात, २८ सप्टेंबरला ईद घरात साजरी करायची आणि गणेशविसर्जनानंतर मिलादुन्नबीचा जुलूस (मिरवणूक) काढायचा, असा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रभरात असेच चित्र होते. त्यातील काही महत्त्वाच्या 'सलोखा बैठकींचा आणि तेथे घेण्यात आलेल्या निर्णयांच्या बातम्या 'आवाज मराठी'वर तपशीलवार प्रसिद्ध झाल्या. त्या बातम्या संकलित करून तयार केलेला हा लेख...
पुण्यात १ ऑक्टोबरला निघणार पैगंबर जयंती मिरवणूक
पुण्यातील गणेश उत्सवाची ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षी अतिशय उत्साहाने गणेश विसर्जन मिरवणूक येथे निघते. जवळपास दोन दिवस या मिरवणुका सुरु असतात. गणेश उत्सवात सलग १० दिवस बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना आराम मिळावा, या उद्देशाने पैगंबर जयंतीची मिरवणूक रविवारी (१ ऑक्टोबर) काढण्याचा निर्णय मुस्लिमांची महत्वाची संघटना असलेल्या सिरत कमिटीने घेतला आहे. पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत डिजे-ध्वनिवर्धकचा वापर न करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सीरत कमिटीचे मौलाना हाफिज गुलाम अहमद कादरी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत सीरत कमिटीचे उपाध्यक्ष निजामुद्दीन फखरुद्दीन, सचिव रफिउद्दीन शेख, अतिक रियाज खान, खजिनदार नदीम मुजावर, समन्वक हाफिज कुरेशी उपस्थित होते. या निर्णयाची माहिती पोलिस आयुक्त रितेशकुमार आणि सहआयुक्त संदीप कर्णिक यांना देण्यात आली.
सोलापूरच्या मुस्लिम समाजाचा निर्णय
ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीबाबत मुस्लिम समुदायातील वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकारातून एक समिती स्थापन करण्यात आली होती. मिलादुन्नबीची मिरवणूक २९ सप्टेंबरला काढायची, असा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. शहरातील विजापूर वेस, शास्त्रीनगर, ‘नई जिंदगी’ व ‘नवे घरकुल’ येथील ‘जुलूस समित्यां’नी मिळून हा निर्णय घेतला.
समितीची प्राथमिक चर्चेची बैठक झाल्यानंतर शहरकाझी सय्यद अमजदअली यांच्यासह ईमाम व पदाधिकारी यांनी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची भेट घेतली. ईदच्या मिरवणुकीबाबत झालेल्या निर्णयाची माहिती शिष्टमंडळाने पोलिसांना दिली. या निर्णयाचे कौतुक करत मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक विजयकुमार शाबादी म्हणाले, ‘‘सोलापूर शहरात अनेक समाजांचे लोक शांततेने व एकोप्याने राहतात. एकमेकांच्या सण-उत्सवांसाठी परस्परांना सहकार्य करण्याची येथे पंरपरा आहे. त्या परंपरेला साजेसा हा निर्णय आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.’’ तर, ‘‘या निर्णयामुळे नागरिकांना दोन्ही उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. ईदच्या मिरवणुकीच्या आयोजनाबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशीही आम्ही समन्वय साधणार आहोत,’’ असे शहरकाझी सय्यद अमजदअली व उत्सव समितीचे अध्यक्ष मतीन बागवान यांनी सांगितले.
धुळ्यातील मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश
ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक जिल्ह्यात ग्रामीण भागात २९ सप्टेंबरला, तर धुळे शहरात ३० सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेत मुस्लिम बांधवांनी सलोखा, एकात्मता जोपासण्याचा संदेश दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठक झाली होती. त्या वेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मिरवणुकांबाबत सूचना
मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी विशिष्ट सूचनांसह आवाहन केले होते. मिरवणुकांमध्ये उंचच उंच काठ्यांद्वारे झेंडे फिरवले जाऊ नयेत... काही अक्षेपार्ह घोषणाबाजी अगर हावभाव, आरडाओरड करण्यात येऊ नये अशा या सूचना होत्या. या सूचनांनुसार, योग्य ती काळजी घेऊन येणारे सण-उत्सव शांततेने साजरे करावेत असे आवाहन त्यांनी केले होते. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी, तसेच पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील सिरत कमिटीचे सदस्य, मुस्लिम धर्मगुरू, मौलाना, मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शांतता समित्यांचे सदस्य या वेळी उपस्थित होते.
जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन
ईद-ए-मिलादनिमित्तची मिरवणूक गणेशविसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय जुन्नर (जि. पुणे) शहरातील मुस्लिम समाजाने घेतला. ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय ‘कादरिया वेलफेअर सोसायटी’चे अध्यक्ष रऊफ खान यांनी जाहीर केला होता. गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस जुन्नर येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, नगराध्यक्ष श्याम पांडे, आशा बुचके, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, ‘कादरिया वेलफेअर सोसायटी’चे सदस्य, ईद-ए-मिलाद कमिटीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. शिवजन्मभूमीतील सामाजिक एकता व सलोखा कायम राहावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला होता.
गणेशविसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना ‘कादरिया वेलफेअर सोसायटी’तर्फे सकाळी चहा-नाश्त्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती रऊफ खान यांनी दिली. हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. या वेळी माजी नगरसेवक फिरोज पठाण, सईद पटेल, मोहम्मद उमर, अजीम तीरंदाज, मनू पीरजादे, इक्बाल बेग, जरार कुरेशी, रऊफ इनामदार, वाजीद इनामदार, हनीफ शेख उपस्थित होते.
पुण्यातील मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा निर्णय
पुण्यात एक ऑक्टोबर रोजी मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्याचा निर्णय पुण्यातील विश्वस्त समितीच्या वतीने आयोजित बैठकीत घेण्यात आला. याबाबत विश्वस्त समितीचे मुख्तार मणियार माहिती देताना म्हणाले, ‘‘उत्सवाचा आनंद सर्वांना मुक्तपणे घेता यायला हवा. समाजात अशांतता पसरवण्याची संधी कुणालाही मिळू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. समाजविघातक प्रवृत्तीचे लोक आनंदाच्या प्रसंगात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अशी संधी मिळू नये यासाठी हा निर्णय कोथरूड, वारजे, कर्वेनगर व डेक्कन परिसरातील मुस्लिम बांधवांच्या विश्वस्त समितीच्या बैठकीत झाला.’’
ईद-ए-मिलादनिमित्तच्या मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषण टाळावे असे आवाहन पुण्यातील ‘कागदीपुरा मस्जिद ट्रस्ट’च्या वतीने शहरातील मुस्लिम मंडळे, मदरसे, तंजीम यांना करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायाची ‘अमन परिषद’
‘बडी दर्गा’ परिसरातील मदरशांमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांची ‘अमन परिषद’ पार पडली. सामाजिक-धार्मिक सलोखा कायम टिकून राहील, असा संदेश या परिषदेत देण्यात आला. ईद-ए-मिलाद आणि गणेशविसर्जन या मिरवणुकांबाबत ‘शहर-ए-खतीब’ हिसामुद्दीन खतीब यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले. आमदार देवयानी फरांदे, ज्येष्ठ नेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गीते, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, सुधाकर बडगुजर, हरिभाऊ लोणारे, गणेशोत्सव महामंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे, अंकुश पवार आदी या वेळी उपस्थित होते.
चांदोरीतील (जि. नाशिक) मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय
चांदोरी येथील मुस्लिम पंच कमिटीचे मुश्ताक इनामदार मौलाना शहाबुद्दीन रजवी म्हणाले, ‘‘गणेशोत्सव हा आमच्या हिंदू बांधवांचा सण आहे. दहा दिवस हा उत्सव असतो. शेवटच्या दिवशी गणेशविसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे ईद-ए-मिलादुन्नबींची मिरवणूक ता २८ सप्टेंबरऐवजी २९ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’’ तर, ‘आदर्श युवा प्रतिष्ठान’चे संस्थापक सिद्धार्थ वनारसे मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे कौतुक करत म्हणाले, ‘शांततामय गाव’ अशी असलेली चांदोरी गावची ओळख या निर्णयाने जपली जाणार आहे. मुस्लिम बांधवांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे."
लातूरच्या मुस्लिम समुदायाचाही कौतुकास्पद निर्णय
मिरवणुकीसंदर्भात ‘लातूर जिल्हा ईद-ए-मीलादुन्नबी’ समितीची बैठक नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या विनंतीला मान देऊन, गणेशविसर्जनाच्या पार्श्वभूमीवर, ईद-ए-मिलाद ता. २९ सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय, या वर्षीची ‘कौमी एकता मोटारसायकल रॅली’ही रद्द करण्यात आली होती. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता व सामाजिक सलोखा राखण्यास व समाजकार्यात ही समिती नेहमीच अग्रेसर असते, हेही या वेळी समितीने दाखवून दिले आहे.
वणीत (जि. नाशिक) मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय
वणीतील मुस्लिम समाजातील पंच समितीने ईद नंतर साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावास सर्व मुस्लिम बांधवांनी एकमताने पाठिंबा दर्शवला. या बैठकीला ऐजाज पठाण, बब्बू शेख, बंटी सय्यद, नियाज शेख, फईम शेख, आयूब मुल्ला, रमीज काजी, आरीफ शेख, मुजीब दादा आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी मुस्लिम बांधवाच्या या भूमिकेचे कौतुक व अभिनंदन केले. यापूर्वीही, आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता.
मुंबईतील मुस्लिम समुदायाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समुदायांतील बंधुत्व जोपासण्यासाठी ईदच्या मिरवणुका एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या होत्या. भायखळा येथील ‘खिलाफत हाऊस’ येथे मुस्लिम प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईनमियाँ) यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली. बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नसीम सिद्दिकी उपस्थित होते.
किन्हवलीतील (जि. ठाणे) मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे
परिसरातील हिंदू-मुस्लिम राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी म्हणून किन्हवली येथील मुस्लिम बांधवांनी एक पाऊल पुढे टाकले. ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीबाबत किन्हवली पोलीस ठाण्यात बैठक आयोजिण्यात आली होती. मिरवणूक ता. २९ रोजी संध्याकाळच्या नमाजपठणानंतर काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, अजीमभाई शेख आणि इतर मुस्लिम बांधवांनी मिळून हा निर्णय घेतला होता.
कऱ्हाडच्या (जि. सातारा) मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय
कऱ्हाड (जि. सातारा) येथील मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणूक गणेशविसर्जनाच्या दोन दिवसांनंतर, म्हणजेच एक ऑक्टोबरला, काढण्याचा निर्णय घेतला आहे. मिरवणुकीचे आयोजक साबीरमियाँ मुल्ला यांनी याबाबत माहिती दिली.