अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
गणपती विसर्जन व ईद ए मिलाद मिरवणूक
गणपती विसर्जन व ईद ए मिलाद मिरवणूक

 

अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) आणि ईद ए मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) या दोन्ही सणांमधील साम्य म्हणजे त्या त्या सणादिवशी निघणाऱ्या भव्य मिरवणुका. विशेषतः पुण्यासारख्या शहरांमध्ये हे दोन्ही सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यंदाच्या वर्षी हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मिरवणुकांची वेळ जवळपास सारखीच असते. त्यामुळे हे उत्सव कसे साजरे होणार, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत शहरातील मुस्लीम संघटनांनी एकत्र येत महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांकडून आणि पोलिस प्रशासनाकडून त्यांचे कौतुक होत आहे. 

ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीबाबत मुस्लिम समुदायातील वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकारातून विश्वस्त कमिटी बनवण्यात आली. या कमिटीच्यावतीने पुण्यात बैठक आयोजित केली होती. २८ सप्टेंबरला ईद घरात साजरी करायची आणि गणेश विसर्जनानंतर म्हणजे १ ऑक्टोबरला मिलादुन्नबीचा जुलूस (मिरवणूक) काढायचा असा समन्वयवादी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

या निर्णयाबाबत विश्वस्त कमिटीचे मुख्तार मणियार माहिती देताना म्हणाले, “उत्सवाचा आनंद सर्वांना मुक्तपणे घेता यायला हवा. समाजात अशांतता पसरवण्याची संधी कोणालाही मिळू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  मुस्लिम समाजाच्या वतीने पुढाकार घेत हा निर्णय घेण्यात आला.”

ते पुढे म्हणाले, “समाज विघातक प्रवृत्तीचे लोक आनंदाच्या प्रसंगात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अशी संधी मिळू नये यासाठी ईदची मिरवणूक नंतर काढण्याचा निर्णय कोथरुड, वारजे, कर्वेनगर व डेक्कन परिसरातील मुस्लिम बांधवांच्या विश्वस्त कमिटीच्या बैठकीत झाला. या निर्णयामुळे समाजातील शांतता, सलोखा, टिकून राहील व बंधुभाव वाढीस लागेल, अशी आम्हाला आशा आहे. ” 

मुस्लीम समुदायाने घेतलेल्या या निर्णयानंतर ईद ए मिलादुन्नबीचा जुलूस (मिरवणूक) १ ऑक्टोबर रोजी घेण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत झाले. यावेळी पुण्यातील कागदीपुरा मस्जिद ट्रस्टच्या वतीने शहरातील मुस्लीम मंडळ, मदरसे, तंजीम यांना जुलूसमध्ये ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन करण्यात आले. 

या आवाहनाबाबत कागदीपुरा मस्जिद ट्रस्टचे संचालक हाजी याकुब इनायत शेख व सचिव मुफीद गुलाब बेग म्हणाले, “वयोवृध्द नागरिकांना, लहान मुलांना व गरोदर स्त्रियांना ध्वनी प्रदूषणाचा होणारा त्रास टाळण्यासाठी आम्ही डीजे मुक्त मिरवणुकीचे आवाहन करत आहोत. यावेळी डीजेमुळे होणारे दुष्परिणाम आम्ही लोकांना समजावून सांगत आहोत. आमच्या या आवाहनाला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.” 
 

 
या निर्णयाचे साजिद खान, साहिल मणियार, दस्तगीर बागवान यांसारख्या स्थानिक मुस्लिमांकडून स्वागत करण्यात येत होते. लोकांच्या प्रतिसादाबाबत जावेद शेख म्हणाले, “समाजाची प्रगती शांततापुर्ण सहजीवनातून अधिक वेगाने होते. आपल्यातील विविधतेचा सन्मान करत एकात्मता साधण्यासाठी मुस्लीम समाजाने केल्या गेलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.”
 
- जितेंद्र मैड

मुस्लीम समाजाच्या अशाच निर्णयासंदर्भातील ह्याही बातम्या वाचा 👇🏻 


‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय  


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook

Twitter | Instagram | YouTube