दयाराम वशिष्ठ
काश्मीरच्या सांस्कृतिक वारशामध्ये अशा अनेक कलांचा समावेश आहे, ज्यांची नावे आजच्या धावपळीच्या आयुष्यात हळूहळू पुसली जात आहेत. यातलीच एक दुर्मिळ आणि अत्यंत देखणी कला म्हणजे ‘कर-ए-कलामदानी’, जिला ‘कारी-कलमदानी’ म्हटले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या देशातच अनेक लोक या कलेच्या नावापासून आणि महत्त्वाबद्दल अनभिज्ञ आहेत, तर कधीकाळी ही कला काश्मीरची ओळख मानली जात होती. आज या लुप्त होत चाललेल्या कलेला जिवंत ठेवण्यासाठी श्रीनगर, जम्मू-काश्मीरचे प्रसिद्ध शिल्पकार फैयाज अहमद जान लढा देत आहेत. ते केवळ या कलेला जपत नाहीत, तर ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे कामही करत आहेत.
‘कर-ए-कलामदानी’ ही मूळची पेपर माशे (कागदाचा लगदा) कला आहे, जिची सुरुवात १३ व्या शतकात काश्मीरमध्ये झाल्याचे मानले जाते. या कलेचे नाव ‘कलामदानी’ म्हणजेच पेन ठेवण्याचा डबा यावरून पडले आहे, कारण सर्वात आधी या शिल्पातून पेन ठेवण्याचे डबेच (कलमदान) तयार केले गेले होते. त्या काळात काश्मीरचा एक विशेष कागद, ज्याला ‘खोसुर कागद’ म्हटले जायचे, तो त्याच्या उत्कृष्ट दर्जासाठी दूरवर प्रसिद्ध होता. याच कागदापासून बनवलेल्या कलमदानांची मागणी वाढली आणि त्यांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्यावर कारी-कलमदानीची अत्यंत बारीक आणि नाजूक सजावट केली जाऊ लागली. याच कारणामुळे या कलेला ‘कर-ए-मुनाकाशी’ म्हणजेच सजावटीची कला असेही म्हणतात.
फैयाज अहमद जान सांगतात की, साधारण ७०० वर्षांपूर्वी मीर सईद हमरानी ही कला इराणमधून भारतात घेऊन आले होते. सुरुवातीच्या काळात याचा वापर शालींवर केला गेला, पण काळाच्या ओघात ही कला लाकूड आणि कागदावरही वापरली जाऊ लागली. हळूहळू ही काश्मीरची ओळख बनली. मात्र, बदलत्या काळानुसार यंत्रांनी हस्तकलेची जागा घेतली आणि तरुणांची आवडही या मेहनतीच्या कलेपासून कमी होत गेली. याच कारणामुळे आज कर-ए-कलामदानी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.
फैयाज अहमद जान यांचे या कलेशी नाते पिढ्यानपिढ्यांचे आहे. ते सांगतात की, हे कौशल्य त्यांना वारशाने मिळाले आहे. त्यांचे पणजोबा सबदरजान, आजोबा अली जान आणि वडील मोहम्मद वसीर जान हे सर्व या कलेशी जोडलेले होते. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या घरात कागद, रंग आणि ब्रशच्या साहाय्याने आयुष्याला आकार घेताना पाहिले. केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या फैयाज यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासूनच ही कला शिकायला सुरुवात केली होती. ते जेव्हा सातवीत होते, तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला, पण त्यांनी हिंमत हारली नाही. त्यांची आई फातिमा चरखा चालवून पश्मीना साड्यांसाठी धागा बनवत असे. आई आणि मुलाने मिळून मेहनत केली आणि याच कलेला आपला आधार बनवले.

पेपर माशे कलेची प्रक्रिया प्रचंड संयम आणि कौशल्याची मागणी करते. सर्वात आधी जुना कागद पाण्यात भिजवला जातो, त्यानंतर तो चांगला कुटून अगदी बारीक पिठासारखा केला जातो. यानंतर त्यात भाताच्या कांजीचे मिश्रण केले जाते, जेणेकरून तयार झालेली सामग्री मजबूत आणि टिकाऊ बनेल. या मिश्रणाला वेगवेगळ्या साच्यांमध्ये टाकून हवा तो आकार दिला जातो.
जेव्हा हे आकार सुकतात, तेव्हा त्यावर काश्मीरची पारंपरिक चित्रकारी केली जाते. फैयाज सांगतात की, यामध्ये नैसर्गिक रंगांसोबतच मेटॅलिक आणि एक्रेलिक रंगांचाही वापर होतो. अनेकदा सोने आणि चांदीचा वापरही केला जातो, ज्यामुळे या कलाकृती अधिक मौल्यवान बनतात. शेवटी त्यावर वॉर्निश केले जाते, ज्यामुळे चमक वाढते आणि त्या पाण्यापासूनही सुरक्षित राहतात.
फैयाज अहमद जान यांनी बनवलेल्या कलाकृतींनी आज देश-विदेशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची झलक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भिणींवरही पाहायला मिळते, जिथे कर-ए-कलामदानीची चित्रकारी प्रवाशांना काश्मीरच्या सांस्कृतिक खोलीची ओळख करून देते. युरोपमध्ये या कलेबद्दल विशेष आकर्षण आहे. तिथे लाकूड आणि कागदापासून बनवलेल्या या सजावटीच्या वस्तूंना मखमली कपड्यात गुंडाळून भेट म्हणून दिले जाते. विशेषतः ज्वेलरी बॉक्स आणि सजावटीच्या डब्यांना तिथे मोठी मागणी असते.
फैयाज आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी सांगताना म्हणतात की, पूर्वी रंग बनवण्यासाठी दगड कुटले जायचे. हे काम खूप कष्टाचे होते, पण त्या रंगांची चमक आणि खोली अतुलनीय असायची. आता काळानुसार यंत्रांनी बनवलेले रंग वापरले जाऊ लागले आहेत, ज्यामुळे काम सोपे झाले असले, तरी ते आज ही पारंपरिक तंत्र आणि डिझाइन वाचवून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.
त्यांच्या कष्टाची आणि समर्पणाची दखल देशानेही घेतली आहे. फैयाज अहमद जान यांना १९८५ मध्ये नॅशनल मेरीट सर्टिफिकेट, १९८८ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार आणि २०१९ मध्ये 'पद्मश्री' देऊन सन्मानित करण्यात आले. हे सन्मान केवळ एका कलाकारासाठी नाहीत, तर काश्मीरच्या त्या पारंपरिक कलेसाठी आहेत, जिला ते वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
फैयाज केंद्र सरकारच्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतात. ते सांगतात की, सरकारकडून वेळोवेळी मिळणारी मदत आणि देशभरात लागणाऱ्या मेळाव्यांमध्ये सहभागी होण्याच्या संधींमुळे त्यांना पुढे जाण्याचे बळ मिळाले. आज त्यांची उत्पादने १०० रुपयांपासून ३५०० रुपयांपर्यंतच्या किमतीत विकली जातात. फैयाज अहमद जान यांचे असे मत आहे की, जर आजही या कलेला योग्य संरक्षण आणि प्रोत्साहन मिळाले, तर कर-ए-कलामदानी आपली हरवलेली ओळख पुन्हा मिळवू शकते.
येणाऱ्या पिढ्यांनीही हे कौशल्य आत्मसात करावे आणि याकडे केवळ रोजगाराचे साधन म्हणून न पाहता आपला सांस्कृतिक वारसा म्हणून पहावे, अशी त्यांची इच्छा आहे. जर जिद्द सच्ची असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी परंपरा आणि कला जिवंत ठेवता येते, याची साक्षच जणू फैयाज यांची कथा देते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -