भारत सरकार आणि एनएमएसीसीच्या पुढाकाराने भारतीय कलाकारांना मिळणार जागतिक व्यासपीठ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इटलीमधील व्हेनिस येथे आयोजित ६१ व्या 'आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन - ला बिनाले दि व्हेनेझिया २०२६' (La Biennale di Venezia 2026) मध्ये 'भारतीय पॅव्हेलियन'चे थाटात उद्घाटन होणार आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच भारत या प्रतिष्ठित जागतिक कला महोत्सवात पुनरागमन करत असून, 'जिओग्राफीज ऑफ डिस्टन्स: रिमेंबरिंग होम' (Geographies of Distance: remembering home) या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकार आणि सांस्कृतिक संस्थांचा पुढाकार

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) आणि 'सेरेन्डिपिटी आर्ट्स' यांच्या भागीदारीतून हे प्रदर्शन सादर केले आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात 'स्मृती आणि आपुलकीची भावना' (memory and belonging) या मध्यवर्ती संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारित आहे. यातून माणसाचा स्वतःच्या मुळांशी असलेला दुरावा आणि आठवणींचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भारतीय कलाकारांच्या कलाकृतींचे सादरीकरण

या सामूहिक प्रदर्शनात अल्वर बालसुब्रमण्यम (बाला), रंजनी शेट्टार, सुमाक्षी सिंग, स्कारमा सोनम ताशी आणि असीम वाकिफ यांसारख्या प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या भव्य आणि नवनवीन कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. या अनोख्या प्रदर्शनाचे क्युरेशन डॉ. अमीन जाफर यांनी केले आहे.

हे कला प्रदर्शन व्हेनिसमधील आयसोलोट्टो, आर्सेनल (Isolotto, Arsenale) येथे ९ मे ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सर्वांसाठी खुले राहणार आहे. याआधी ६, ७ आणि ८ मे रोजी याचे पूर्वदर्शन (Previews) आयोजित करण्यात आले आहे. तब्बल सात वर्षांनंतर या आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारताचा सहभाग असल्याने जागतिक कलाविश्वाचे याकडे लक्ष लागून आहे.