आवाज मराठी'वर सौहार्दाच्या कहाण्यांसोबतच दर आठवड्याला एका महत्त्वाच्या विषयाचे विविधांगी वेध घेणारे लेखन प्रसिद्ध केले जाणार आहे. 'भारतीय मुस्लिमांसाठी अनुकरणीय ठरतील अशा इस्लामी देशांतील धार्मिक सुधारणा' या विषयावर आधारित लेख 'आवाज मराठी'वरून प्रसिद्ध होणार आहेत. त्यापैकी, भारतीयांनी मस्जीदींवरील लाउडस्पीकरविषयी सौदी अरेबियाचे अनुकरण का व कसे करावे हे सांगणारा हा लेख...
लाऊडस्पीकरवरून दिली जाणारी अजान गेल्या काही वर्षांपासून भारतात वादाचा मुद्दा बनली आहे. वाद अजानविषयी नसून लाऊडस्पीकरबाबत आहे. पहाटेच्या म्हणजे फजरच्या अजानमुळे झोप भंग झाल्याची तक्रार काही हिंदू आणि इतर धर्मीय नागरिकांनी केली होती. त्यामुळे लाऊडस्पीकरवरची अजान बंद करण्याची मागणी करण्यात आली आणि वाद सुरू झाला. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण अधिक होते. या तक्रारीनंतर उत्तर प्रदेशातील हजारो मशिदींमधून लाऊडस्पीकर काढण्यात आले. महाराष्ट्रातही हा मुद्दा बराच तापला. याविरोधात काही मुस्लिमांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. इस्लामचा उगम ज्या सौदी अरेबियामध्ये झाला तिथे लाउडस्पीकरविषयीचे कायदे कसे आहेत? पाहूया...
काय आहे अजान?
अजान म्हणजे प्रार्थनेसाठी भाविकांना दिलेली साद. ती अरबी भाषेत असते. अजानाचे मराठी भाषांतर असे आहे : ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे. ईश्वराशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही. मी साक्ष देतो की, मुहम्मद हे ईश्वराचे प्रेषित आहेत. सर्वजन प्रार्थनेसाठी या. यशाच्या दिशेने या. ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे. ईश्वराशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही. विशेष म्हणजे सकाळच्या म्हणजे फज्रच्या अजानमध्ये एक वाक्य जोडले जाते, 'झोपेपेक्षा प्रार्थना चांगली आहे' अजानमध्ये वाक्यांची दोनदा पुनरावृत्ती केली जाते.
इस्लाम या अरबी शब्दाचा अर्थ होतो शांती. इस्लामचे अनुयायी- मुस्लिम- शांतीदूत. इतरांना दुखावणारी गोष्ट इस्लाममध्ये निषिद्ध आहे. म्हणूनच भारतीय मुस्लिमांचे वागणे असे असले पाहिजे ज्याने मुस्लिमेतर दु:खी किंवा नाराज होणार नाहीत. इस्लामचा लाऊडस्पीकरशी काही संबंध नाही. लोकांनी सोयीसाठी लाऊडस्पीकर लावले आहेत. मशिदींमध्ये लाऊडस्पीकरद्वारे अजान दिली तर आवाज दूरवर जातो आणि लोकांना नमाजची वेळ झाल्याचे कळते. जर परिसरात अनेक मशिदी असतील तर त्या सर्वांच्या अजानच्या वेळेत फरक असतो. मशिदीचे लाऊड स्पीकर परिसरातील अनेक घरांच्या छतावर लावल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे मशीद नसलेल्या ठिकाणीही अजानचा आवाज ऐकू येतो.
लाऊडस्पीकर काढण्यास विरोध
अजानचा आवाज मुस्लिमांना शांती देतो, परंतु तो इतरांना शांती देईलच असे नाही. अजानला विरोध झाल्यामुळे तो देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक लोकांना अजानची नाही तर त्याच्या उच्च डेसिबल पातळीच्या आवाजाची समस्या आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने धार्मिक स्थळांवर निर्धारित संख्येपेक्षा जास्त लाऊड स्पीकर लावल्यास ते काढून टाकण्याचे आदेश दिले होते. यासोबतच पुन्हा नवीन लाऊड स्पीकर न लावण्याचा इशाराही देण्यात आला होता.
बदायूंच्या नूरी मशिदीच्या समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, म्हणत अर्ज दाखल केला होता. तर, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मशीद समितीचा अर्ज फेटाळून लावला. लाऊडस्पीकरद्वारे अजान देणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. अजान हा इस्लामचा भाग आहे, परंतु लाऊडस्पीकरद्वारे अजान देणे हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही. त्यामुळे मस्जिद समितीला संपूर्ण यूपीमध्ये लाऊडस्पीकरवरून अजान देण्याची परवानगी नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
लाऊड स्पीकरशी संबंधित एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ऑक्टोबर २००५ मध्ये सांगितले होते की, सणांच्या निमित्ताने मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वाजवले जाऊ शकतात. परंतु एका वर्षात १५ दिवसांपेक्षा जास्त वेळा हे होऊ शकत नाही. लाऊडस्पीकर किंवा असे कोणतेही ध्वनी निर्माण करणारे उपकरण रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंद राहतील. यापूर्वी १८ जुलै २००५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आवाजाबाबत काही मानके निश्चित केली होती.
डेसिबलची मर्यादा काय?
जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मानकांच्या आधारे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळी मानके निश्चित केली आहेत. त्याची दिवस आणि रात्र अशी विभागणी केली आहे. दिवसाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० आणि रात्रीची वेळ रात्री १० ते सकाळी ६ अशी मानली जाते. निवासी भागातील आवाजाची मर्यादा दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा ७५ डेसिबल तर रात्री ७० डेसिबल, सार्वजनिक क्षेत्रांसाठी दिवसा ६५ डेसिबल तर रात्री ५५ डेसिबल, तर शांत भागांसाठी दिवसा ५० डेसिबल तर रात्री ४० डेसिबल निश्चित करण्यात आले आहे. रुग्णालये, न्यायालये आणि शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूच्या १०० मीटरपर्यंतचे क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
भारतीय कायदा काय म्हणतो?
भारतीय राज्यघटनेच्या कलम-१३९ नुसार कोणत्याही प्रकारचे प्रदूषण पसरवल्यास शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. अवाजवी आवाज करणे हा गुन्हा तर आहेच शिवाय त्यामुळे हानिकारक प्रदूषण होते. कलम-२७८ नुसार त्याकरता शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे.
भारत सरकारने पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ आणि त्याच्याशी संबंधित नियमांतर्गत ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम-२००० बनवले. सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय रात्री लाऊडस्पीकरचा वापर करता येऊ शकत नाही. तर ऑडिटोरियम, कॉन्फरन्स रूम, कम्युनिटी हॉल आणि बँक्वेट हॉलमध्ये मायक्रोफोनचा वापर केला जाऊ शकतो. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते. ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांसोबतच लाऊडस्पीकरच्या अवाजवी वापरावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-२१ नुसार जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ध्वनीप्रदूषण त्यात विघ्न आणते असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले.
अजान नव्हे तर लाउडस्पीकर वादाचा मुद्दा
वास्तविक, अजान हा वादाचा मुद्दाच नाही. मुस्लिमांनी समजूतदारपणाची भूमिका घेतली तर हा वाद क्षणार्धात संपुष्टात येईल. मुअज्जिनने म्हणजे अजान, बांग देणाऱ्या व्यक्तीने माईकशिवाय अजान द्यावी आणि लाऊडस्पीकर लावायचेच असतील तर ती मशिदीच्या आत लावावीत, बाहेर लावू नये.
आता अनेकांना प्रश्न पडेल, अजानचा आवाज ऐकल्याशिवाय प्रार्थनेची वेळ कशी कळेल? प्रत्येक मशिदीमध्ये दैनंदिन अजानच्या वेळेची यादी असते आणि त्याआधारेच अजान दिली जाते. शिवाय, भाविकांना नमाजची आठवण करून देण्यासाठी अनेक मोबाइल अॅप्स उपलब्ध आहेत. आज प्रत्येक घरात आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल फोन आहे. त्यामुळे वेळेवर नमाज अदा करण्यासाठी अलार्मचा वापर करता येऊ शकतो. त्यासाठी लाउडस्पीकरची अजिबात गरज नाही.
सौदी अरेबियामध्ये लाउडस्पीकर
सौदी अरेबियामध्ये लाऊडस्पीकर मस्जीदींच्या बाहेर नसून आत आहेत. जून २०२१ मध्ये सौदी अरेबिया सरकारने मशिदींमधील लाऊड स्पीकरच्या संख्येवर मर्यादा आणली. इस्लामिक व्यवहार मंत्री शेख डॉ. अब्दुल लतीफ बिन अब्दुल अझीझ अल शेख यांनी प्रत्येक मशिदीमध्ये अजानसाठी लाऊड स्पीकरची संख्या केवळ चारपर्यंत मर्यादित केली आहे. सोबतच त्यांनी मस्जीदीच्या प्रमुखांना सूचना दिल्या की त्यांच्याकडील अधिकचे लाऊडस्पीकर्स असतील तर ते भविष्यातील वापरासाठी गोदामात ठेववेत किंवा लाऊडस्पीकर नसलेल्या मस्जीदींना द्यावे.
भारतीय मुस्लिम प्रत्येकबाबतीत सौदी अरेबियाचे अनुकरण करण्यात धन्यता मानतात. मात्र अशा सुधारणावादी मुद्द्यांबाबत मात्र ते त्यांचे अनुकरण करत नाहीत. हा दुटप्पीपणा नाही का? त्यामुळे भारतातही मुस्लिमांनी लाउडस्पीकरविषयी सौदी अरेबियासारखीच भूमिका घ्यायला हवी. भारतासारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैविध्य असणाऱ्या देशातील नागरिकांनी सर्व धर्मीयांची आणि त्यांच्या भावनांची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मुस्लिमांनी आपल्या एखाद्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपली श्रद्धा इतरांवर न लादता ती स्वतःपुरती ठेवायला हवी.
(अनुवाद : छाया काविरे)
- फिरदोस खान
'भारतीय मुस्लिमांसाठी अनुकरणीय ठरतील अशा इस्लामी देशांतील धार्मिक सुधारणा' या विषयावरील हे लेखही वाचा -