मोहरम : कर्बलाचा संदेश हा अवघ्या मानवजातीसाठी आहे!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
 मुहर्रमच्या पहिल्या दिवशी श्रीनगरच्या मध्यवर्ती भागात शिया आणि सुन्नी समुदायातील सदस्यांनी ज्यूस आणि पाण्याचे वाटप केले
मुहर्रमच्या पहिल्या दिवशी श्रीनगरच्या मध्यवर्ती भागात शिया आणि सुन्नी समुदायातील सदस्यांनी ज्यूस आणि पाण्याचे वाटप केले

 

अमीर सुहेल वानी

मोहरम हा मुस्लिम बांधवांना अंतर्मुख करणारा, जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा, तसंच त्याग, न्याय आणि नैतिकतेची जाण करून देणारा पवित्र महिना मानला जातो. कर्बलामध्ये घडलेली ती हृदयद्रावक घटना म्हणजे अतुलनीय शौर्य, अन्यायाला केलेला कडाडून विरोध, अढळ श्रद्धा आणि ईश्वरी तत्त्वांसाठी केलेल्या निस्सीम भक्तीचं जिवंत उदाहरण आहे. प्रेषित मुहम्मद साहेबांचे नातू इमाम हुसेन इब्न अली यांनी काही फक्त एखाद्या विशिष्ट गटासाठी किंवा पंथासाठी आपले प्राण पणाला लावले नाहीत. तर, त्यांचा तो महान त्याग हा इस्लामचा नैतिक आणि आध्यात्मिक पाया भक्कम राहावा, याच्या रक्षणासाठी होता.

त्यांचा हाच विचार आजच्या काळातही जगभरातल्या मुस्लिमांना आणि अगदी मुस्लिम नसलेल्या इतर लोकांनाही खूप मोठी प्रेरणा देतो. कर्बलातून मिळालेला हा संदेश संपूर्ण जगासाठी आहे. पण एवढं सगळं असूनही, मोहरमचे दिवस आले की जगातल्या काही भागांमध्ये शिया आणि सुन्नी या दोन गटांमध्ये बऱ्याचदा वाद किंवा तणाव पाहायला मिळतो. यातून कर्बलाचे मूळ विचार आणि आजच्या मुस्लिम समाजाची खरी परिस्थिती या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा विरोधाभास दिसून येतो. ही दुर्दैवी गोष्ट आहे.

या शिया-सुन्नी वादाची पाळंमुळं तशी खूपच गुंतागुंतीची आहेत. सुरुवातीच्या काळातील इस्लामी इतिहासाचा आपापल्या सोयीने लावलेला अर्थ, पैगंबरांनंतर नेतृत्व कुणाकडे जाणार हा प्रश्न, वेगवेगळ्या न्यायपरंपरा आणि काही धार्मिक चालीरीती यातूनच हे मतभेद उभे राहिले. अनेक शतकांपासून सुरू असलेली राजकीय चढाओढ, स्वतःची सत्ता वाढवण्याची हाव, बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप, चुकीच्या माहितीचा प्रसार आणि गटागटांत विभागले जाणे, या सगळ्यांमुळे हे धार्मिक मतभेद आणखीनच चिघळले. याच गोष्टींचे पडसाद पुढे समाजात आणि राजकारणात फूट पाडण्यात झाले. यातले बरेचसे वाद हे खरंतर फक्त जाणकार आणि विद्वानांच्या अभ्यासापुरतेच मर्यादित होते. पण तेच वाद हळूहळू सामान्य लोकांमध्ये आणि रस्त्यावर आले. आणि तिथेच ज्ञानाची आणि संवादाची जागा थेट रागाने घेतली.

आजकालच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात तर हे वाद अजूनच भडकले आहेत. सोशल मीडियावर सतत फिरणारे भडकाऊ मेसेजेस, सोयीस्कर असा अर्धावट इतिहास, द्वेष पसरवणारी भाषणं आणि लोकांच्या भावना भडकवणारे उपदेश यांचा सगळीकडे सुळसुळाट झाला आहे. यातच मोठी शोकांतिका दडलेली आहे.

या दोन्ही समुदायांमध्ये दुरावा निर्माण करणाऱ्या गोष्टींपेक्षा, त्यांना एकमेकांशी घट्ट जोडून ठेवणारे धागेच खरे म्हणजे जास्त आहेत. शिया काय किंवा सुन्नी काय, दोघेही एकाच अल्लाची भक्ती करतात. दोघेही एकाच प्रेषित मुहम्मद साहेबांनी दाखवलेल्या मार्गावरून चालतात. दोघेही पवित्र अशा कुराणलाच मानतात आणि एकाच किब्लाच्या दिशेने नमाज अदा करतात. दोघेही सारख्याच इस्लामी शिकवणुकीचं पालन करतात आणि अहल-अल-बायत यांच्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्यात जे काही थोडेफार मतभेद असतील, ते फक्त अभ्यासू चर्चेच्या पातळीवर आणि एकमेकांचा आदर राखण्याच्या चौकटीतच राहायला हवेत. त्यातून समाजात एकमेकांबद्दल दुश्मनी किंवा वैर निर्माण होता कामा नये.

काश्मीरचा विचार केला तर तिथे शिया आणि सुन्नी यांच्यातले संबंध म्हणजे एकत्र गुण्यागोविंदाने राहण्याचं आणि एकत्र संस्कृती जपण्याचं उदाहरण आहे. काश्मीरमधले मुस्लिम बांधव उत्तम शेजारी, नातेवाईक, सहकारी आणि जिवाभावाचे मित्र म्हणून वर्षानुवर्षं एकत्र राहत आले आहेत. इथल्या सगळ्यांच्या एकत्र परंपरा, एकच भाषा, सगळ्यांचं मिळून असलेलं एकत्र दुःख आणि इथली खोलवर रुजलेली आध्यात्मिक संस्कृती, या सगळ्या गोष्टींनी धर्माच्या किंवा पंथाच्या भिंती ओलांडण्याचं काम नेहमीच केलं आहे.

काश्मीरमधल्या सुफी परंपरेचा एवढा प्रभाव आहे की, त्यामुळे सर्व लोकांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती, दयाभाव तसंच संत आणि ज्ञानी माणसांबद्दल आदर बाळगण्याची संस्कृती रुजली आहे. मोहरमच्या दिवसांत निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये सहभागी होणं, मातम करणाऱ्या लोकांसाठी अन्न-पाण्याची सोय करणं आणि इमाम हुसेन यांच्याबद्दल आदर दाखवणं, हे सगळं काश्मीरच्या अनेक भागांतले सुन्नी बांधव दरवर्षी अगदी न चुकता करतात. अगदी तसंच, शिया बांधवांनी सुद्धा समाजाच्या भल्यासाठी, शिक्षणासाठी आणि इतर धार्मिक कामांमध्ये नेहमीच हिरिरीने सहभाग घेतला आहे. याचाच मोठा फायदा संपूर्ण मुस्लिम समाजाला झाला आहे. मधे कधीतरी थोडाफार तणावाचा काळ आला असेल, पण ते अपवादानेच. काश्मीरची मुख्य समाजव्यवस्था किंवा जडणघडण कधीच अशा वादांवर किंवा तणावांवर अवलंबून राहिलेली नाही.

 

कर्बलाच्या त्या घटनेची नुसती आठवणच लोकांना पुन्हा एकत्र आणणारी मोठी ताकद बनू शकते. इमाम हुसेन यांनी अन्याय, जुलूम, भ्रष्टाचार आणि नैतिकतेशी तडजोड करणाऱ्या गोष्टींच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती. जर कर्बलाच्या त्या घटनेची आठवण काढून केलेला मातम आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात न्याय, दया, खरं बोलणं, एकमेकांचा सन्मान करणं आणि बंधुभावाने राहणं शिकवत नसतील, तर त्या अश्रूंना तसा काहीच अर्थ उरणार नाही.

उलेमांकडे लोकांचे विचार बदलण्याची आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची नैतिक ताकद असते. त्यांनी लोकांमधले वाद आणि मतभेद वाढवण्यापेक्षा, इस्लाममध्ये सांगितलेल्या चांगल्या आणि समान गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा. या विद्वानांनी लोकांना हे समजावून सांगितलं पाहिजे की, एखाद्या गोष्टीवर मतभेद असणं साहजिक आहे पण तो कसा मांडावा, एकोप्याने राहणं किती गरजेचं आहे आणि एकमेकांच्या आयुष्याचा व इज्जतीचा मान कसा राखावा. शिया आणि सुन्नी या दोन्ही गटांच्या विद्वानांनी एकत्र येऊन घेतलेल्या सभांमधून लोकांपर्यंत चांगला संदेश जाऊ शकतो. धार्मिक गोष्टींवरून असलेल्या मतभेदांमुळे समाजातली शांतता आणि सलोखा बिघडण्याची काहीच गरज नाही, हेच यातून स्पष्ट होईल. हे मोठे धार्मिक नेतेच एकमेकांचा मान राखतील आणि आदर करतील, तेव्हा सामान्य जनताही त्यांचं अनुकरण करेल.

मोहरमच्या या दिवसांत मशिदी आणि 'इमाम बारगाह' यांच्यावर मोठी जबाबदारी असते. ही ठिकाणं आध्यात्मिक प्रगती, चांगले संस्कार आणि समाजाला एकत्र बांधणारी मोठी केंद्रं बनायला हवीत. तिथून दिल्या जाणाऱ्या प्रवचनांमध्ये कर्बलाने जगाला दिलेल्या महान शिकवणीवर भर दिला गेला पाहिजे. त्यात मुख्यत्वेकरून त्याग, संयम, शौर्य, न्याय आणि माणसांची सेवा कशी करावी, या सगळ्या गोष्टी असायला हव्यात.

पण यातली सर्वात मोठी जबाबदारी ही आपल्यासारख्या सामान्य माणसांवरच आहे. समाजातला सलोखा आणि भाईचारा सरकारी नियम किंवा धार्मिक आदेश काढून लोकांवर जबरदस्तीने लादता येत नाही. तो तर प्रत्येक मुस्लिम व्यक्तीच्या रोजच्या वागण्यातून आणि त्याच्या छोट्या-छोट्या निर्णयांमधूनच दिसून यायला हवा. सामान्य लोकांनी उगाच पसरणाऱ्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवता कामा नये. एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या मेसेजेसला त्यांनी थारा डेटा कामा नये. एखादी बातमी किंवा मेसेज पुढे पाठवण्याआधी तो खरंच बरोबर आहे ना, याची खात्री करणं गरजेचं आहे. माणसात फूट पाडणाऱ्या असल्या फालतू चर्चांमध्ये पडू नये, हीच आजच्या काळाची गरज आहे. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी एकमेकांच्या घरी येणं-जाणं सुरू ठेवलं पाहिजे. एकमेकांचं सुख-दुःख वाटून घेणं आणि पूर्वीपासून आपल्याला एकत्र जोडून ठेवणारे नातेसंबंध जपणं, हेच आपल्या सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे.

आई-वडिलांनी आपल्या मुलांना सर्व मुस्लिम बांधवांचा आदर करायला आवर्जून शिकवलं पाहिजे. इस्लामिक परंपरेत असलेल्या या विविधतेचं कौतुक कसं करावं, हेही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. जे लोक सोशल मीडिया वापरतात, त्यांनी उगाच आग लावणारी माहिती पुढे पाठवण्यापेक्षा समाजात शांतता पसरवणारे दूत बनलं पाहिजे.

मोहरमचा हा महिना आपल्याला एकत्र येऊन आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. आपण दुसऱ्या समुदायापेक्षा कसे वेगळे आहोत, हा प्रश्न विचारत बसण्यापेक्षा मुस्लिमांनी स्वतःला एक वेगळाच प्रश्न विचारला पाहिजे. इमाम हुसेन यांनी ज्या महान विचारांसाठी आणि मूल्यांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, ते विचार खरंच आपण आपल्या जगण्यात आणतोय का? आपण खरंच न्यायाची बाजू घेत आहोत का? जे लोक कमकुवत आहेत, त्यांना आपण आधार देतोय का? सत्ताधाऱ्यांसमोर न घाबरता खरं बोलण्याची हिंमत आपल्यात आहे का? आपण आपल्याच मुस्लिम बांधवांना आदराने आणि प्रेमाने वागवतोय का? पंथ किंवा धर्मावरून भांडत बसण्यापेक्षा हे प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. कर्बला म्हणजे फक्त दुःख किंवा शोक व्यक्त करण्याची घटना नव्हती. तर माणसाला नैतिक पातळीवर बदलून टाकणारी ती मोठी शाळाच होती. जगात जिथे जिथे अन्याय, भेदभाव, भ्रष्टाचार सुरू आहे आणि माणसांच्या दुःखाची कुणालाच पर्वा नाही, त्या प्रत्येक ठिकाणी कर्बलाचा हा संदेश लागू पडतो.

मुस्लिम समाजाचं भविष्य काही सर्व मुस्लिमांचे विचार अगदी एकसारखेच असण्यावर अवलंबून नाहीये. तर ते सगळ्यांचं ध्येय एक असण्यावर अवलंबून आहे. इस्लामच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच गोष्टींचे वेगवेगळे अर्थ काढण्याची विविधता आहे आणि ती पुढेही तशीच राहणार. आणि हेच आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. ही जी विविधता आहे, ती समाजात भांडणं लावण्याचं कारण बनू नये, तर त्यातून आपलं ज्ञान आणखी कसं वाढेल याचा मार्ग शोधला पाहिजे. काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे एकत्र गुण्यागोविंदाने राहण्याची जी परंपरा आहे, ती बघितली की हे नक्कीच शक्य आहे हे आपल्या लक्षात येतं. एकमेकांबद्दलचा आदर, आपल्यातली माणुसकी आणि एकत्र राहून पार पाडण्याची जबाबदारी; ही भावना आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण जपून ठेवली पाहिजे आणि ती आणखीनच मजबूत केली पाहिजे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter