खानकाह मुनेमिया : सेवेची सुफी परंपरा जिवंत ठेवताना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
खानकाह मुनेमिया
खानकाह मुनेमिया

 

महफूज आलम

आजच्या काळात समाज आर्थिक विषमता, शैक्षणिक मागासलेपणा, सामाजिक दुही आणि जातीय तणावाचा सामना करतोय. अशा वेळी खानकाहची भूमिका  आध्यात्मिक मार्गदर्शनापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्या आता मानवतावादी सेवा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सलोखा याला वाहिलेल्या संस्था म्हणून पुढे आल्या आहेत. 

खानकाह मुनेमिया हे या टिकून असलेल्या परंपरेचं उत्तम उदाहरण आहे. धर्म किंवा जातीचा कोणताही भेदभाव न करता ही संस्था गरिबांना आधार देते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करते आणि आरोग्य सेवा पुरवते. तसंच विविध धर्मांमधल्या संवादाला प्रोत्साहन देते. यातून प्रेम, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची मूल्यं अधिक मजबूत होतात.

या धार्मिक संस्था मानवतावादी सेवा आणि सामाजिक जबाबदारीला आपलं ध्येय मानतात, हे या उपक्रमांवरून दिसून येतं. अशा वेळी त्या शांततापूर्ण, सुशिक्षित आणि एकसंध समाज घडवण्यासाठी मोलाचं योगदान देऊ शकतात.

शतकानुशतकांची परंपरा पुढे नेणं
अनेक शतकांपासून खानकाह ही आध्यात्मिक प्रशिक्षण, मानवतावादी सेवा आणि सामाजिक सलोख्याची केंद्रं म्हणून काम करताहेत. धर्म, जात, समाज किंवा सामाजिक दर्जा यावरून कोणताही भेदभाव न करता मानवतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असणं, हे सुफी संत आणि त्यांच्या खानकाहचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलंय. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे, आदर्श चारित्र्यामुळे आणि सदिच्छेमुळे सुफी संतांनी प्रत्येक धर्माच्या आणि समाजातल्या प्रत्येक घटकाच्या लोकांच्या हृदयात अनोखं स्थान निर्माण केलंय.

पाटणा शहरातल्या मीथन घाट इथल्या खानकाह मुनेमिया सारख्या संस्थांमधून आज ही समृद्ध परंपरा पुढे नेली जातेय. आपल्या कल्याणकारी कामांना संस्थेचं स्वरूप देण्यासाठी या खानकाहने १९९९ मध्ये 'सिलसिला' या सामाजिक-धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक संस्थेची स्थापना केली. गेल्या अनेक वर्षांत 'सिलसिला'ने शेकडो विद्यार्थ्यांना आणि हजारो रुग्णांना मदत केलीय. शिक्षण, आरोग्य सेवा, राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा वाढवणं ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टं आहेत.

ही संस्था खानकाह मुनेमिया मीथन घाटचे सज्जादा नशीन आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इस्लामिक विद्वान मौलाना डॉ. शमीमुद्दीन अहमद मुनामी यांच्या आश्रयाखाली काम करते. प्राध्यापक मसूदूर रहमान या संस्थेचे सचिव म्हणून काम पाहतात.

'सिलसिला' ही संस्था पूर्णपणे लोकांच्या पाठिंब्यावर चालते, असं प्राध्यापक मसूदूर रहमान यांनी 'आवाज - द व्हॉइस' शी बोलताना सांगितलं. केवळ शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय नाही. समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा लोकांना मदत करणं हेदेखील त्यांचं उद्दिष्ट आहे.

शिक्षण : सकारात्मक बदलाचा पाया
सुशिक्षित समाजामध्ये सकारात्मक विचार करण्याची, विधायक काम करण्याची आणि देश तसंच समाज या दोघांच्याही प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्याची क्षमता असते, असं प्राध्यापक मसूदूर रहमान यांचं ठाम मत आहे. दुसरीकडे अशिक्षितपणामुळे समाज आतून कमकुवत होतो. यातून घातक चालीरीती आणि गैरसमज वाढीस लागतात आणि योग्य-अयोग्य यातला फरक पुसट होतो.

जगभरात ज्ञानाला महत्त्व दिलं जातं आणि इस्लाममध्ये ज्ञान मिळवणं हे कर्तव्य मानलं गेलंय. म्हणूनच प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. पैशाच्या अभावामुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याला शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहावं लागू नये. याची काळजी घेण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांचीही आहे.

हीच जबाबदारी पार पाडण्यासाठी 'सिलसिला' दरवर्षी शाळेत जाणाऱ्या मुलांसह व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या जवळपास शंभर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातल्या मुलांना शाळेची फी, परीक्षेची फी, कोचिंगचा खर्च, प्रवेश आणि शिक्षणाच्या इतर गरजांसाठी मदत दिली जाते. दहावीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी ही मदत दिली जाते. या आधारावर होतकरू विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता आपलं शिक्षण सुरू ठेवता येतं.

उच्च शिक्षणासाठी समान संधी
आर्थिक अडचणींमुळे अनेकदा हुशार विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेता येत नाही. कोणतीही संस्था ही समस्या पूर्णपणे सोडवू शकत नाही, हे प्राध्यापक मसूदूर रहमान मान्य करतात. मात्र, प्रामाणिक प्रयत्नांमुळे नक्कीच फरक पडू शकतो.

आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीच्या माध्यमातून 'सिलसिला' एमबीबीएस (MBBS), इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत करते.

संस्थेला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही, यावर त्यांनी भर दिला. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी स्वेच्छेने मदत करणाऱ्या समाजातल्या लोकांचा त्यांच्या सर्व कल्याणकारी कार्यक्रमांना पाठिंबा असतो.

तांत्रिक शिक्षणाला चालना
तंत्रज्ञान हा आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय, असं प्राध्यापक मसूदूर रहमान मानतात. यातून संगणक साक्षरता हे खूप महत्त्वाचं कौशल्य बनलंय. ही गरज ओळखून 'सिलसिला'ने २०१८ मध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. तिथे अवघ्या ५०० रुपयांच्या सवलतीच्या दरात सहा महिन्यांचा 'डीसीएस' (DCS) कोर्स शिकवला जातो. या केंद्रामध्ये सर्व धर्माचे विद्यार्थी एकत्र अभ्यास करतात. ही नाममात्र फी सुद्धा न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं.

शिक्षणासोबतच चारित्र्य घडवणं
शिक्षण हे केवळ पुस्तकी यशापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक आणि नैतिक विकासात त्याची मदत झाली पाहिजे, असं 'सिलसिला'चं मानणं आहे. मौलाना डॉ. शमीमुद्दीन अहमद मुनामी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करायला अनेक जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच वेळी इस्लामिक शिकवणीवर आधारित नैतिक मूल्यांची रुजवणूकही केली जाते.

निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा आणि इस्लामिक ज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक परीक्षा नियमितपणे घेतल्या जातात. यशस्वी स्पर्धकांना बक्षिसं आणि सन्मान देऊन प्रोत्साहन दिलं जातं. यातून त्यांचा आत्मविश्वास, जागरूकता आणि शिकण्याबद्दलची आवड कायम टिकून राहायला मदत होते. समाज सुशिक्षित झाल्याशिवाय तो खऱ्या अर्थाने प्रगती करू शकत नाही, असं प्राध्यापक मसूदूर रहमान मानतात.

गरिबांसाठी आरोग्य सेवा
बरेच लोक आर्थिक समस्येमुळे किंवा आरोग्याविषयी जागरूकता नसल्यामुळे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, असं 'सिलसिला'च्या व्यवस्थापनाचं मत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी दर आठवड्याला वैद्यकीय शिबिरं आयोजित केली जातात. तिथे कोणताही भेदभाव न करता सर्व धर्मांच्या लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते.

तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात आणि गरज पडल्यास उपचारांची व्यवस्था करतात. कोविड-१९ (COVID-19) महामारीच्या काळात 'सिलसिला'ने मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक कुटुंबांना आधार दिला.

ही संस्था रुग्णांसाठी आणि मृतदेह नेण्यासाठी सवलतीच्या दरात रुग्णवाहिका सेवा देखील चालवते. हे पैसे देऊ न शकणाऱ्या कुटुंबीयांना ही सेवा पूर्णपणे मोफत दिली जाते. हे उपक्रम खानकाहांनी ऐतिहासिकदृष्ट्या समाजाची सेवा करण्यात निभावलेल्या पारंपरिक मानवतावादी भूमिकेचं दर्शन घडवतात.

बंधुभाव आणि राष्ट्रीय सलोख्याला चालना
विविध धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी 'आंतरधर्मीय संवाद कार्यक्रम' (Interfaith Interaction Programmes) आयोजित करणं, हा 'सिलसिला'चा महत्त्वाचा उपक्रम आहे. हे कार्यक्रम संवादाला चालना देतात, गैरसमज दूर करतात आणि एकमेकांमधली सामंजस्याची भावना वाढवतात.

खानकाहांनी कधीही स्वतःला केवळ शांतता आणि बंधुभावाचा उपदेश देण्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही, असं प्राध्यापक मसूदूर रहमान सांगतात. त्यांनी या मूल्यांचं सातत्याने आचरण केलंय आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करायला काम केलंय. शांतता, सलोखा, सदिच्छा आणि परस्पर आदर ही भारताच्या संस्कृतीची मोठी ताकद आहे, असा त्यांचा विश्वास आहे. सुफी संस्थांनी कायम तळागाळात या आदर्शांचं जतन आणि प्रसार करण्यासाठी काम केलंय.

न्याय आणि प्रेमाच्या वातावरणाशिवाय कोणताही सभ्य समाज उभा राहू शकत नाही, असं ते मानतात. खानकाह मुनेमिया मीथन घाट प्रत्येक समाजातल्या लोकांचं स्वागत करून आणि गरजूंना भावनिक तसंच व्यावहारिक आधार देऊन हीच परंपरा पुढे नेत आहे.

साहित्यिक आणि बौद्धिक उपक्रम
'सिलसिला' ज्ञान आणि संस्कृतीमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या प्रख्यात अभ्यासक आणि साहित्यिक व्यक्तिमत्त्वांना समर्पित परिसंवाद आणि चर्चासत्रं नियमितपणे आयोजित करते. ही संस्था धार्मिक, शैक्षणिक आणि साहित्यिक विषयांवर पुस्तकंही प्रकाशित करते.
तरुण पिढीला इस्लामची खरी शिकवण समजायला मदत व्हावी, या उद्देशाने शालेय विद्यार्थी, तरुण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या पुस्तकांचं वाटप केलं जातं.

इतर कल्याणकारी उपक्रम
शैक्षणिक आणि वैद्यकीय मदतीसोबतच गरज पडेल तेव्हा 'सिलसिला' आर्थिक आणि कायदेशीर मदत देखील देते. ही संस्था पारंपारिक अर्थाने लोकांमधून देणग्या गोळा करत नाही, असं प्राध्यापक मसूदूर रहमान यांनी स्पष्ट केलं. शैक्षणिक आणि कल्याणकारी प्रकल्पांसाठी स्वेच्छेने योगदान देणारे संस्थेचे सदस्य आणि दानशूर लोक त्यांच्या कामाला मदत करतात.

रमजानच्या महिन्यात 'सदका' आणि 'जकात'च्या स्वरूपातली मदत स्वीकारली जाते आणि ती विविध धर्मादाय कार्यक्रमांसाठी वापरली जाते. 'सिलसिला'चं कार्यालय खानकाह मुनेमिया मीथन घाटच्या आवारातच आहे. तिथूनच सर्व कल्याणकारी कामांचं नियोजन केलं जातं.
 
दरवर्षी शहरातल्या सर्व प्रमुख मुस्लिम संस्थांच्या प्रतिनिधींशी सल्लामसलत करून 'सिलसिला' शहराचं रमजानचं सामायिक वेळापत्रक देखील तयार करतं. सर्वांच्या सहमतीवर आधारित असलेलं हे वेळापत्रक गेली अनेक वर्षं सातत्याने प्रकाशित केलं जातं आणि पाळलं जातं. यातून या संस्थेची समाजातल्या एकता आणि सहकार्याबद्दलची बांधिलकी दिसून येते.

माहिती पत्रक
 
खानकाह मुनेमिया : खानकाह मुनेमिया मीथन घाट शतकानुशतकं जुनी सुफी परंपरा पुढे नेत आहे. अध्यात्म, मानवतावादी सेवा आणि सामाजिक सलोख्याचं जिवंत केंद्र म्हणून हे ठिकाण काम करतं.
 
सिलसिलाची स्थापना : १९९९ मध्ये स्थापन झालेली 'सिलसिला' ही संस्था शिक्षण, आरोग्य सेवा, साहित्य, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजकल्याण या क्षेत्रात सातत्याने काम करतेय.
 
दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना मदत : दरवर्षी 'सिलसिला' शाळेची फी, परीक्षेची फी, कोचिंगचा खर्च, प्रवेश शुल्क आणि इतर शैक्षणिक गरजा पूर्ण करून जवळपास १०० होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देते.
 
उच्च शिक्षण शक्य करणं : एमबीबीएस (MBBS), इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते.
 
परवडणारं संगणक शिक्षण : संगणक प्रशिक्षण केंद्र अवघ्या ५०० रुपये नाममात्र फीमध्ये सहा महिन्यांचा कोर्स देतं. तसंच होतकरू विद्यार्थ्यांना संगणकाचं शिक्षण मोफत दिलं जातं.
 
दर आठवड्याला मोफत वैद्यकीय शिबिरं : सर्व धर्मांच्या लोकांसाठी दर आठवड्याला मोफत वैद्यकीय शिबिरं आयोजित केली जातात. तिथे तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य तपासणी, उपचार आणि वैद्यकीय सल्ला देतात.
 
मोफत रुग्णवाहिका सेवा : गरीब रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा मोफत दिली जाते. तर इतरांना रुग्णालयात आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी सवलतीच्या दरात या सेवेचा लाभ घेता येतो.
 
बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना : आंतरधर्मीय संवाद आणि सदिच्छा कार्यक्रमांच्या माध्यमातून ही संस्था प्रेम, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा वाढवते.
 
सर्वांसाठी खुलं : धर्म किंवा जातीचा कोणताही भेदभाव न करता खानकाह मुनेमिया प्रत्येक गरजू व्यक्तीला सेवा, आपुलकी, काळजी आणि आधार देते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter