गुवाहाटी
आसाममध्ये पुराची परिस्थिती अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. राज्यातील पूरस्थितीमुळे मृतांचा आकडा ८७ वर पोहोचला असून, अजूनही जवळपास १.३ लाख नागरिक पुरामुळे प्रभावित आहेत. जरी बहुतांश भागांमधील पुराचे पाणी ओसरत असले, तरी हवामान खात्याने दिलेल्या नवीन इशाऱ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) जारी केलेल्या बुलेटिननुसार, गेल्या २४ तासांत शिवसागर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे या वर्षातील पुरामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ८७ झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) अरुणाचल प्रदेश आणि मेघालयाच्या काही भागांत पुढील काही दिवसांत अत्यंत मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा (ऑरेंज आणि रेड अलर्ट) दिला आहे. या राज्यांच्या सीमांना लागून असलेल्या आसामच्या जिल्ह्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या आसाममधील सहा जिल्ह्यांमधील १ लाख २८ हजार नागरिक पुरामुळे बाधित आहेत. यामध्ये शिवसागर जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून ५५ हजारांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. त्यापाठोपाठ चराईदेव आणि जोरहाट जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रशासनाकडून ५५ मदत छावण्या आणि वितरण केंद्र सुरू करण्यात आली असून, ११ हजारांहून अधिक नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. पुरामुळे १४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली असून मोठ्या प्रमाणावर पशुधनही प्रभावित झाले आहे.