भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या उर्दू साहित्यात हिंदू-मुस्लीम सौहार्दाचे, गंगा जमनी तहजीबचे असंख्य दाखले मिळतात. हिंदू देवीदेवतांच्या गुणगान करणारी उर्दू काव्ये ही त्यापैकीच एक. या काव्याला हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आहे. उर्दूसह देशभरातल्या विविध प्रांतातील, भाषांतील कवींनी विविध धर्मातील देवीदेवतांप्रती असलेली श्रद्धा काव्यातून व्यक्त केली आहे.
आपल्या देशात आंतरधर्मीय सुसंवादाची, धार्मिक सौहार्दाची आणि गंगा जमुनी संस्कृतीची मोठी परंपरा राहिली आहे. त्यामुळे कृष्ण, ब्रम्हा, विष्णू, महेश, राम, हनुमान, पार्वती, गंगा, शक्ती, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, काली यांसारख्या हिंदू देवीदेवतांचे गुणगान करणारी मुस्लिमांनी लिहिलेली काव्ये साहित्यात जागोजागी आढळतात.
उर्दू साहित्य कन्हैया, दुर्गाजी, बलदेव जी, महादोजी यांसारख्या देवतांच्या गौरवार्थ काव्य रचणारे नजीर अकबराबादी यांनी उर्दू साहित्यात स्वतःचे वेगळेपण जपलेले आढळते. इतर देवी-देवतांप्रमाणेच गणपतीचा उल्लेखही त्यांच्या काव्यात अध्लतो. त्यांच्या एका कवितेची सुरुवात गणेश नमनाने होते. त्या कवितेतील हा शेर पहा-
पहले नाम गणेश का लीजिये सिस नवाये
जा से काज सिध होना सदा महूरत लाय
(कोणतेही कार्य सुरु करताना आधी गणपतीला नमन करा
असे केल्यास तुमच कार्य निर्विघ्नपणे पार पडेल)
कुठल्याही कामाची सुरुवात गणपतीच्या नावाने करण्याचा प्रघात आहे. त्याचे नाव इतर देवी देवतांच्या आधी घेतले जाते. त्यामुळे काम सुखकर होते आणि इप्सित ध्येय साध्य होते अशी धारणा आहे. हिन्दू धार्मिक श्रद्धांप्रति असलेल्या आदराची झलक या ओळीतून दिसते.
उर्दूतील आणखी एक प्रसिद्ध कवी गुलजार देहेलवी त्यांच्या एका काव्यात, ईश्वराची स्तुती करणाऱ्या काव्यात ज्याला उर्दू भाषेत हम्द म्हटलं जातं त्यात एका ओळीत ते गणपतीची स्तुती करतात. तत्पूर्वी ईश्वराची स्तुती करताना ते म्हणतात,
तेरी ज़ात ज़ात-ए-क़दीम है तेरी ज़ात ज़ात-ए-अज़ीम है
तू नदीम है तू नईम है तू करीम है तू रहीम है
(तू सर्वश्रेष्ठ आहेस आणि सर्वांत आदरणीय आहेस, तू एकमेव सखा आहेस, बक्षीसी देणारा आहेस, तू दयावान आहेस) अल्लाहची म्हणजेच ईश्वराची स्तुती करताना वापरली जाणारी ही सर्व विशेषणे आहेत.
याच कवितेत गुलजारे पुढे म्हणतात की,
तू वकील है, तू खलील है तू ही मोर है तू ही फिल है
(तू मदतगार आहेस, तूच आमचा प्रिय आहेस, तू मोर आहेस तूच हत्ती आहेस) या शेरमध्ये'फिल' या शब्द गणपतीसाठी आलेला आहे.
उर्दूतील दुसरे मोठे कवी नदीम जौनपुरी आपले एका कवितेत लिहितात,
गणेश की शान है सबसे निराली
उन्ही का नाम ले हर एक सवाली
जिसने भी उसको है पुकारा
उन ने भर दी झोली खाली
उर्दू कवितेतील गणपतीच्या उल्लेखातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कवितांमध्ये गणपतीला वेगवेगळ्या नावांनी म्हणजेच विशेषणांनी संबोधले गेले आहे. उदाहरणार्थ समुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, वाकट, विघ्ननाश, विनायक, गजानंद.
उर्दू कवींप्रमाणेच उर्दू लेखकांनीही आपल्या साहित्यात, कथा-कादंबऱ्यांमध्ये गणपतीला विशेष स्थान दिल्याचे आढळते. उदाहरणार्थ महान उर्दू लेखक सआदत हसन मंटो याच्या 'हटक' या कथेतील सुगंधी हे पात्र गणपतीची भक्त असते. ती गणपतीला सर्वश्रेष्ठ गुरु मानते. याशिवाय, अली इमान नकवी, राजेंद्र सिंह बेदी, इस्मत चुगताई, कुर्तलैन हैदर, कृष्ण चंद्र यांसारख्या उर्दूतील महान साहित्यकारांच्या कृतीतही गणपतीचे संदर्भ आढळतात.
मंटोसारखे अनेक उर्दू लेखक एकेकाळी मुंबईत राहत असल्यामुळे आणि महाराष्ट्राचे गणपतीशी असलेल्या विशेष नात्यामुळे साहजिकच उर्दू साहित्यिकांमध्ये आणि त्यांच्या साहित्यात गणपतीचे आणि त्याच्याविषयीच्या श्रद्धेचे प्रतिबिंब पडलेले आढळते.
उर्दूचा सर्वाधिक वापर बॉलीवूड मध्ये केला जातो. बॉलिवूडचे महाराष्ट्र विशेषतः मुंबई हेच केंद्र असल्यामुळे सहाजिकच महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या गणपतीचा प्रभाव बॉलीवूड आणि बॉलीवूड मधील कलाकारांवर पडलेला आढळतो. अमिताभ बच्चनपासून सलमान, शाहरुख यांच्यासारख्या खान सुपरस्टार्सची गणपतीवरील गाणी विशेष लोकप्रिय ठरली आहेत. विशेष म्हणजे ही गाणी लिहिणारे गीतकारांपैकी काही गीतकार मुस्लिम धर्मीय होते.
धार्मिक सौहार्द जपणाऱ्या आपल्या भारतीय परंपरेचे प्रतिबिंब आपल्याला साहित्यावरही पडलेले दिसते. मग अस्सल भारतीय भाषा असलेल्या उर्दूतील साहित्यही याला अपवाद कसे असेल?
(अनुवाद - समीर शेख)
- सय्यद तालीफ हैदर
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -