नाशिक : गणेश मूर्ती विक्री स्टॉलच्या बाहेर पूजा साहित्य विक्री करताना मुस्लिम बांधव
नाशिकमध्ये मुस्लिम बांधवांच्या हळद कुंकू आणि पूजा साहित्याने उत्साहात बाप्पा घरोघरी विराजमान झाले. यावेळी कुठलाही हिंदू मुस्लिम रंग दिसला नाही तर दिसला तो केवळ भक्तीचा रंग.
समाजात सध्या जातीयतेढ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. जातीभेद करणाऱ्यांनी चक्क देवदेवतांना वाटून घेतले आहे. हा तुमचा देव हा आमचा देव. अशी द्वेषाची भावना निर्माण केली आहे. अशांना देवतांनीच चपराक देण्याचे काम केले आहे. प्रत्येक देवताच्या पूजेसाठी प्रथम हळद-कुंकूचा वापर होत असतो. बहुतांशी पूजेत मुस्लिम विक्रेत्यांकडून येणाऱ्या हळद कुंकूचा समावेश असतो.
गणेशोत्सवनिमित्ताने बाप्पाची स्थापना करण्यापूर्वी हळद कुंकू, गुलाल, कापूर, कापूस, लाल कापड अशा विविध प्रकारच्या पूजा साहित्याने पूजा करण्यात येते. या प्रकारच्या सर्व साहित्य विक्रीची मुस्लिम बांधवांची दुकाने गणेश मूर्ती विक्री स्टॉलच्या बाहेर आढळून आली. मूर्ती खरेदी केल्यानंतर प्रत्येक बांधव मुस्लिम बांधवांच्या दुकानावर पूजेचे साहित्य खरेदी करताना दिसून आले.
साहित्याचा वापर करून विधीवत बाप्पाची स्थापना झाली. आलेले पूजा साहित्य कुठल्या दुकानातून किंवा कुठल्या बांधवांकडून आले याचा भेदभाव जर बाप्पाने केला नाही. तर इतरांकडून तसे का केले जाते, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडताना दिसला. सर्व बांधव एक आहे कुठलाही धर्म जातीभेद शिकवत नाही. याची शिकवण या दृश्यावरून दिसून आली. पिढ्यानपिढ्या अनेक मुस्लिम बांधवांचे कुटुंब पूजा साहित्य विक्री करत आले आहेत. तर हिंदू बांधव पूजेसाठी त्याची खरेदी करत आले आहेत. हे समाजासाठी धार्मिक सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.
हजारोंची उलाढाल
गणेशोत्सवनिमित्ताने हळद कुंकू आणि इतर पूजा साहित्य विक्रीत हजारोंची उलाढाल झाली. पुढील दहा दिवसही पूजेसाठी दैनंदिन हळद कुंकूसह पूजा साहित्य विक्री होण्याची शक्यताही विक्रेत्यांनी वर्तवली आहे. सुमारे दोनशे रुपये किलो हळद-कुंकू विक्री होत आहे. सोलापूर येथील मोठा पंढरपूर येथून हळद-कुंकू विक्रीस येत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
आनंद व्यक्त करत साहित्य विक्रेता कय्युम अत्तार म्हणाले, “पिढ्यानपिढ्या हळद कुंकूसह अन्य पूजा साहित्य विक्री करत आलो आहे. याच व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. बाप्पासह विविध देवदेवतांची पूजा आम्ही विक्री केलेल्या पूजा साहित्यातून होत असते याचा गर्व वाटतो.”
- युनुस शेख
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -