धुळ्यातील रिजवानने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, मिळवले बक्षीस!

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
शिक्षण संस्थाचालकांकडून बक्षिस स्वीकारताना रिजवान पिंजारी
शिक्षण संस्थाचालकांकडून बक्षिस स्वीकारताना रिजवान पिंजारी

 

गणेशोत्सवानिमित्त शाळेत इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्याची स्पर्धा जाहीर झाली. त्याला प्रत्येक शालेय स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची भारी हौस. त्याने शिक्षकांना थोडे घाबरतच या स्पर्धेत सहभाग नोंदवायची इच्छा प्रकट केली. त्याच्या आईनेही शिक्षकांना स्पर्धेत सहभागाची गळ घातली. शिक्षकांनीही लागलीच होकार दिला अन्‌ संधीचे सोने करत त्याने स्पर्धेत पारितोषिक पटकावले. इतकेच नव्हे तर सर्वधर्मसमभावाचा अनोखा संदेशही त्याने समाजात रूजवला. त्याचे नाव रिजवान पिंजारी...!  

कासारे (ता. साक्री, जि. धुळे) येथे बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयामध्ये रिजवान राजू पिंजारी सातवीचा विद्यार्थी आहे. त्याच्या शाळेत शनिवारी (ता. १६) इकोफ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रिजवाननेही या स्पर्धेत भाग घेतला आणि श्री गणेशाची सुबक मूर्ती साकारत सलोख्याचा संदेश दिला. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा दोन गटात ही स्पर्धा झाली.

रिजवान ठरला स्पर्धेचे विशेष आकर्षण
इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेला रिजवान स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरला. त्याची निरागसता जणू धर्मभेद करणाऱ्यांसाठी आदर्शवत असा ऐक्याचा संदेश आहे. एकिकडे समाजातील काही घटक जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसतात. तर, दुसरीकडे रिजवानसारखे निरागस बालके अशा कौतुकास्पद कृतीतून एकोप्यासह स्नेहपूर्वक, गुण्यागोविदांने नांदण्याचा संदेश देतात. त्यामुळे त्याच्या स्पर्धेतील सहभागाचे उत्स्फूर्त स्वागत झाले.
 
यावेळी भारावून गेलेला रिजवान म्हणाला, “मला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्याची हौस वाटते. जेव्हा सरांनी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्याची स्पर्धा जाहीर केली तेव्हा मी स्वतःहून सहभाग नोंदवला. त्यासाठी आईनेही उत्सुकता दाखवली आणि शाळेनेही मला सन्मानपूर्वक संधी दिली. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो.”

याविषयी बोलताना आर. एम. देसले हे शिक्षक म्हणाले, “इकोफ्रेंडली श्री गणेशमूर्ती साकारण्यासाठी स्पर्धेत सहभागाचे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. सातवीतील रिजवान पिंजारी याने थोडे घाबरतच स्पर्धेत मी सहभाग घेतला तर चालेल का? अशी विचारणा केली. शिक्षक या नात्याने सर्व विद्यार्थी आम्हाला सारखेच असतात. त्यामुळे रिजवानला आम्ही लागलीच होकार दिला. त्याच्या आईचाही फोन आला. त्या म्हणाल्या, "सर, माझ्या रिजवानलाही अशा उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायची आवड आहे. तोही गणेशमूर्ती साकारण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यायचा म्हणतोय." आम्हा शिक्षकांनाही ही भूमिका स्वागतार्ह वाटली. या स्पर्धेमुळे रिजवानमधील कलागुणांना वाव मिळाला याचे आम्हाला समाधान आहे.”
 

 

रिजवानला बक्षिस प्रदान

स्पर्धेवेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील, सचिव ऍड. एस. जे. भामरे, विश्वस्त तथा शालेय समितीचे अध्यक्ष संजय देसले यांनी शाळेस भेट दिली. त्यांनीही पुढाकार घेत रिजवान याला रोख रक्कमेचे बक्षीस प्रदान केले. स्पर्धेतील लहान गटात प्रथम राजनंदिनी ठाकरे, द्वितीय मानवी जाधव, तृतीय रिजवान पिंजारी याने, तर मोठ्या गटात प्रथम सार्थक तोरवणे, द्वितीय यश कुवर, तृतीय रविना चित्ते हिने पारितोषिक पटकावले. स्पर्धेचे ज्येष्ठ शिक्षक व्ही. जी. बागुल, सौ. आर. एस. भदाणे यांनी परिक्षण केले. मुख्याध्यापक ए. एन. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एम. देसले, बाळकृष्ण तोरवणे, तुषार सोनवणे, कविता देसले, विकास शिंदे, कविता ठाकरे, संजय गांगुर्डे यांनी संयोजन केले.

- बाळकृष्ण तोरवणे
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻

 
 
 





 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -