नगर - श्री विशाल गणेश मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम कारागीर गेल्या दीड तपापासून घाम गाळत आहेत. शनिमंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गोगादेव मंदिरांसोबत राजस्थानमधील या कारागिरांनी बिर्लांच्या लक्ष्मी नारायण मंदिराची उभारणी केली. हैदराबादेतही बालाजीचे मंदिर त्यांच्या कलेतून साकारलेय. धार्मिक वातावरण गढूळ झालेल्या काळात ही सामाजिक समरसता सुखावणारी आहे.
नगरच्या माळीवाड्यातील श्री विशाल गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अठरा वर्षांपासून हे काम सुरू आहे. त्यासाठी राजस्थानातील मुस्लिम कारागीर जीव तोडून मेहनत घेत आहेत. मुख्य कारागीर खालिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची उभारणी होत आहे.
शेख यांनी यापूर्वी अनेक प्रसिद्ध मंदिरांची उभारणी केली. एका मंदिरासाठी त्यांना किमान आठ ते दहा वर्षे लागतात. विशाल गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारास अठरा वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. आतापर्यंत अठरा कोटी रुपये खर्च झाला. आणखी साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर सांगतात.
हे देवस्थान क वर्गात मोडते. मंदिराचा गाभारा पूर्ण झालाय. सभामंडपाचेही काम पूर्णत्वास गेलेय. कळस, भिंतींचेही काम झाले आहे. ७५ ते ८० टक्के काम झाले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर वरच्या बाजूच्या मंडपाचे काम बाकी आहे. पुजारी बसतात, त्या जागेवरील काम राहिले आहे. राजस्थानातील या मुस्लिम धर्मीय कारागिरांनी आतापर्यंत मशीद, दर्ग्यापेक्षा जास्त मंदिरेच उभारली आहेत.
विघ्नहर्त्याच्या मंदिराला निधीचे विघ्न
श्री विशाल गणेश देवस्थानला दानपेटीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. हा गणपती नवसाला पावणारा आहे. त्यामुळे काही भाविक देणगी देतात. बहुतांशी काम क्रेडिटवर सुरू आहे. कारागिरांना राहण्यासाठी ॲड. अभय आगरकर यांनी स्वतःची जागा विनामूल्य दिली आहे. आस्थापनेवरही देवस्थानचा मोठा खर्च होतो. नगरकरांचा हा लाडका बाप्पा आहे. सर्वच राजकीय नेते त्याच्या चरणी नतमस्तक होतात. मात्र, दुर्दैवाने मंदिरासाठी कोणीही हात रिता करीत नाही. कोविड काळात उत्पन्नाचे स्रोत आटल्याने काम आणखीच लांबले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -