पै.अस्लम काझी यांना रायगडावर शंभूछत्रपतींना जलाभिषेक करण्याचा मान

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
पै.अस्लम काझी यांना रायगडावर शंभूछत्रपतींना जलाभिषेक करण्याचा मान
पै.अस्लम काझी यांना रायगडावर शंभूछत्रपतींना जलाभिषेक करण्याचा मान

 

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र श्री. शंभूछत्रपतींचा रायगडावर 16 जानेवारीला राज्याभिषेक सोहळा पार पडला. या वेळी राज्याभिषेक समितीने जलाभिषेकाचा विशेष मान कुस्ती सम्राट पै.अस्लम काझी यांना दिला. छत्रपती शिवराय, शंभू राजे हे लढवय्ये कुस्तीगीर अन् कुस्तीचे आश्रयदाते होते. एकाच आखाड्यात अठरापगड जाती, धर्मांच्या मावळ्यांना त्यांनी सराव करायला लावला. तेव्हापासून या तांबड्या मातीतल्या मल्लांचे बंधुत्व कायम आहे. 'मर्दानी राजाचा मर्दानी सोहळा' ही थिम घेत हा सोहळा पार पडला.

पै.अस्लम काझी जिंकावे म्हणून देवळात नवस व्हायचे. आज ही आस्लम पैलवान यांनी जिंकलेल्या काही गदा त्यांच्या हिंदू मित्रांच्या देवघरात आहेत. जिथे रोज त्या गदांची पूजा होते. हा आपला महाराष्ट्र आहे अन् हा शिव-शाहू विचार आहे. आस्लम काझींच्या कुस्ती संकुलाचं नाव देखील 'छत्रपती शिवराय कुस्ती संकुल' आहे. आस्लम काझी शिवरायांच्या विचारानेच कुस्तीतील नवी पिढी घडवत आहेत.

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून कुस्ती सम्राट श्री.अस्लम काझी डबल महाराष्ट्र केसरी श्री.चंद्रहास पाटील यांच्या हस्ते श्री.रवि शिवाजी मोरे यांच्या 'संताजी घोरपडे ममलकतमदार' या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे तसेच महाराष्ट्र केसरी घडवणारे श्री.काका पवार आणि हिंदकेसरी श्री.संतोष वेताळ यांच्या हस्ते श्री.अमर साळुंखे यांच्या 'रायगड ते जिंजी' या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.त्याचबरोबर चित्रकार अमित राणे यांच्या 'छत्रपती संभाजी महाराजांची गोवा स्वारी' या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
 
तुर्क, उझबेकी, अफगाणी, पठाणी, मोघल, हबशी, रजपूत, कानडी, इंग्रज, पोर्तुगीज एकापेक्षा एक निष्णात योध्यांना निष्प्रभ करणारे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडी संपन्न झाला यावेळी समस्त शिवशंभू पाईक उपस्थित होते.