नुकतीच झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर म्हणून शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या एका टायने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा भारतीय वारशाशी असलेले आपले नाते अधोरेखित केले. शपथविधीसाठी त्यांनी पांढरा शर्ट, काळा ओव्हरकोट आणि फॉर्मल ट्राउझर परिधान केले होते. हा पेहराव पूर्ण करण्यासाठी त्यांनी गळ्यात खास आसामच्या एरी रेशमापासून बनवलेली आणि सोन्याचे नक्षीकाम असलेला टाय घातला होता.
दिल्लीतील कार्तिक रिसर्च या ब्रँडने हा टाय तयार केला आहे. कार्तिक कुमरा यांनी २०२१ मध्ये या मेन्सवेअर लेबलची स्थापना केली. आपल्या डिझाइन्समध्ये हस्तकलेचा वापर करण्यावर आणि लोप पावत चाललेल्या भारतीय कलांना पुन्हा प्रकाशझोतात आणण्यावर हा ब्रँड भर देतो.
टायचे वैशिष्ट्य
एरी रेशमाला 'अहिंसा सिल्क' किंवा 'नॉन-व्हायलंट सिल्क' म्हणूनही ओळखले जाते. आसाम, मेघालय आणि नागालँडच्या काही भागांत याचे उत्पादन होते. आसाम हे एरी रेशमाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य असून त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळतो.
आसाममध्ये उत्पादित होणाऱ्या रेशमाच्या चार प्रकारांपैकी एरी हा एक प्रकार आहे. पाट, मुगा आणि टसर हे इतर तीन प्रकार आहेत. 'एरी' हे नाव आसामी भाषेतील 'एरा' या शब्दावरून आले आहे. एरा म्हणजे एरंडाचे झाड. याच झाडावर हे रेशीम किडे जगतात. स्थानिक बोलीभाषेत एरी रेशमाला 'एंडी' आणि 'एरंडी' या नावानेही संबोधले जाते.
रेशम मिळण्यापर्यंतचा प्रवास
'सॅमिया रिसिनी' नावाच्या पाळीव रेशीम किड्यांपासून एरी रेशमाचे उत्पादन केले जाते. एरी रेशीम किड्यांना अंड्यातून कोषावस्थेत पोहोचण्यासाठी साधारणपणे सहा आठवडे लागतात. हिवाळ्यात हा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढतो. त्यानंतर ५ ते ७ दिवसांत अंड्यातून अळ्या बाहेर पडतात.
नर किड्यांच्या तुलनेत मादी एरी रेशीम किडे आकाराने मोठे असतात. कोषातून बाहेर पडल्यावर हा पतंग नैसर्गिकरीत्या मृत पावतो. साधारणपणे १०० कोषांपासून रेशमाची एक लडी मिळते. चार लड्यांपासून एक पुआ तयार होतो. रेशीम पालन करणाऱ्यांच्या भाषेत पुआ म्हणजे २५० ग्रॅम रेशीम असते.
सामान्यतः रेशमाचा एक सलग अखंड धागा मिळवण्यासाठी अळी आत असतानाच रेशमाचे कोष उकळले जातात. यामुळे गुळगुळीत आणि चमकदार कापड तयार होते. एरी रेशीम किड्यांचे वैशिष्ट्य वेगळे आहे. हे किडे धाग्याचे छोटे-छोटे तुकडे विणतात आणि एका बाजूला उघडा असलेला कोष तयार करतात. या उघड्या भागातून पतंग सहज बाहेर पडू शकतो.
एरी रेशमाच्या उत्पादनात रेशीम किड्याचे फुलपाखरात रूपांतर होण्याची नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण होऊ दिली जाते. रेशीम उत्पादनासाठी कोणत्याही पतंगाला त्रास दिला जात नाही किंवा मारले जात नाही. हे कोष सामान्यतः उन्हात वाळवले जातात. काही वेळा 'हॉट एअर ड्रायिंग' पद्धतीलाही प्राधान्य दिले जाते. या पद्धतीत कोष ९५ ते ५५ अंश सेल्सिअस तापमानात ३-४ तास ठेवले जातात.
ईशान्य भारतात निसर्गाचा समतोल राखण्याला महत्त्व दिले जाते. त्यानुसार या भागातील लोक एरी प्युपा (कोषातील अळी) अन्नाचा भाग म्हणून खातात. एरी रेशीम किडा हा 'मल्टिव्होल्टाइन' प्रजातीचा आहे. म्हणजेच या किड्यांपासून वर्षातून ४ ते ५ वेळा उत्पादन घेता येते.
रेशमाचे वैशिष्ट्य
एरी रेशीम हा एक मुख्य नैसर्गिक धागा आहे. इतर रेशमाच्या तुलनेत तो अधिक गडद आणि वजनदार असतो. याचा स्पर्श कापसासारखा असून त्याला इतर रेशमाप्रमाणेच एक वेगळी चमक असते. हे रेशीम लोकरीसारखे जाड आणि उबदार असते. तरीही सर्व रेशीम प्रकारांमध्ये ते सर्वात मऊ असते. याच्या विशिष्ट औष्णिक गुणधर्मांमुळे हिवाळ्यात ते उबदार वाटते, तर उन्हाळ्यात थंड राहते. तसेच लोकर, कापूस, ताग आणि इतर कृत्रिम धाग्यांशी त्याचे उत्तम मिश्रण होते.
एरी रेशमाचे कापड धुता येते आणि त्याला सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळे यावर कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. इतर रेशमाच्या प्रकारांपेक्षा वेगळे म्हणजे एरी रेशीम पाणी शोषून घेते. यामुळे ते अधिक मऊ बनते आणि त्वचेसाठी अनुकूल ठरते. इतर रेशीम कापड नाजूक असल्याने त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र एरी रेशीम वापरण्यास सोपे आणि टिकाऊ असते. विशेष म्हणजे प्रत्येक वापरागणिक ते अधिक मऊ होत जाते.
पर्यावरणपूरक स्वरूप आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे रेशमावर प्रयोग करणाऱ्या डिझाइनर्सची याला मोठी पसंती मिळते. या रेशमाला २०२४ च्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी जर्मनीकडून 'ओको-टेक्स' प्रमाणपत्र मिळाले आहे. कापडात कोणतेही हानिकारक घटक नाहीत आणि त्याचे उत्पादन पर्यावरणपूरक वातावरणात झाले आहे, याची खात्री हे प्रमाणपत्र देते. अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीचे वस्त्र तयार करण्यासाठी एरी आणि मुगा रेशमाचा वापर करण्यात आला होता.
आपल्या राजकीय प्रवासात झोहरान ममदानी यांनी भारतीय बनावटीच्या वस्त्राला पसंती देऊन आपल्या मुळांशी असलेले नाते अधिक घट्ट केले आहे. भारतीय बनावटीच्या एरी सिल्कचा हा प्रवास आता थेट न्यूयॉर्कच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे.