त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज ठाकरेंची संयत प्रतिक्रिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
राज ठाकरे
राज ठाकरे

 

नाशिक येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर सध्या चर्चेत आहे. या मंदिरात हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असा नियम आहे. मात्र १३ मे रोजी रात्री काही तरुणांनी मंदिराचे उत्तर दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर तणाव पसरल्याचं पाहायला मिळालं. देवाला धूप दाखवण्याची ही शंभर वर्षांची परंपरा असल्यचे या तरुणांचे मत होते. 

 

या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी ते म्हणाले, वर्षानुवर्षे जर तिथली प्रथा असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही, महाराष्ट्रामध्ये अनेक अशी मंदिरे आणि मशिदी आहेत, त्याठिकाणी हिंदू मस्लिम एकोप्याने राहतात .

 

माहिम मधील उरूसाला माहिम पोलिस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो, जर इतर धर्माचा माणूस मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा कमकुवत धर्म आहे का? अशा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर पुढं बोलताना म्हणाले, मी देखील अनेक दर्ग्यात गेलो असल्याचे त्यांनी सांगितले तर त्र्यंबकेश्वर मंदिराचा निर्णय गावकऱ्यांनी घ्यायचा आहे. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

 

दरम्यान त्र्यंबकेश्वर प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

 

काय आहे गावकऱ्यांची प्रतिक्रिया?

त्र्यंबकेश्वरमध्ये विशिष्ट समजाकडून मंदिरात प्रवेश करण्याच्या कथित घटनेचे रूपांतर  मोठ्या आंदोलनात झाले. हिंदू संघटना या घटनेबाबत आक्रमक झाल्याचं मंदिरात शुद्धीकरण आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात त्र्यंबकेश्वर मधील नागरिकांनी मात्र एकोपा दाखवला आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये आंदोलनासाठी नाशिकसह महाराष्ट्रातून हिंदू संघटनांचे पदाधिकारी आले होते.

 

ही घडलेली घटना त्र्यंबकेश्वर गावतील असून याबाबत चे सर्व निर्णय आता ग्रामस्थ गाव पातळीवर घेतील असा सुर ग्रामस्थांचा आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात बाहेरून कुठलेही व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांना हस्तक्षेप करू दिला जाणार नाही असाही पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.