जाहिद खान
समद यार खाँ उर्फ सागर निजामी यांचे नाव क्रांतिकारी शायरांमध्ये पहिल्या रांगेत घेतले जाते. त्यांची गणना आपल्या काळातील चार मोठ्या शायरांमध्ये केली जात असे. सागर निजामी हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताच्या कोकिळा सरोजिनी नायडू यांचेही आवडते शायर होते.
शायरीसोबतच त्यांचा आवाजही (तरन्नुम) दमदार होता. जेव्हा ते आपल्या सुरात काव्य सादर करत, तेव्हा लोकांवर एक प्रकारची जादू पसरत असे. सागर निजामी यांच्या साहित्याची सुरुवात रोमँटिक शायरीने झाली. पुढे जाऊन ते उद्देशपूर्ण साहित्याचे समर्थक बनले. देशभक्ती, स्वातंत्र्याचा संघर्ष आणि हिंदू-मुस्लीम ऐक्य हे त्यांच्या शायरीचे प्रमुख विषय होते. इंग्रजी सरकारच्या जुलमाचा त्यांनी उघडपणे विरोध केला:
गुल अपने ग़ुंचे अपने गुल्सिताँ अपना बहार अपनी
गवारा क्यूँ चमन में रह के ज़ुल्म-ए-बाग़बाँ कर लें।
(अर्थ: फुले आपली, कळ्या आपल्या, बाग आपली आणि वसंतही आपला, मग बागेत राहून माळ्याचा (इंग्रजांचा) जुलूम का सहन करायचा?)
सागर निजामी यांनी राष्ट्रीय चेतना वाढवणाऱ्या कविता लिहिल्या. त्यांनी हिंदुस्थानी जनतेला गुलामगिरीची जाणीव करून दिली आणि स्वातंत्र्यासाठी जागृत केले. त्यांच्या कविता जनतेमध्ये एक नवीन जोश भरत असत:
ऐ सुब्ह-ए-वतन ऐ सुब्ह-ए-वतन
ऐ रूह-ए-बहार ऐ जान-ए-चमन
तारीख़ के ख़ूनीं हाथों से छीना है तिरा सीमीं दामन
ऐ सुब्ह-ए-वतन ऐ सुब्ह-ए-वतन
(अर्थ: हे माझ्या देशाच्या पहाटे... हे वसंताच्या आत्म्या, हे बागेच्या प्राणा... इतिहासाच्या रक्तरंजित हातांतून तुझा सुंदर पदर हिसकावून घेतला आहे... हे माझ्या देशाच्या पहाटे...)
सागर निजामी यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे स्वातंत्र्याचा पद्यात्मक इतिहास लिहिणे. इतकेच नाही, तर त्यांनी 'अनारकली', 'शकुंतला' यांसारखी पद्यात्मक नाटकेही लिहिली. त्यांनी 'नेहरू-नामा' सारखे महाकाव्यही रचले. सागर निजामी यांची भाषा उर्दू, हिंदीपेक्षा वेगळी ‘हिंदुस्थानी’ होती.
मुईन अहसन जज़्बी
मुईन अहसन जज़्बी हे उर्दू साहित्याच्या अभिजात परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या काव्यात त्यांनी पारंपरिक शब्द, चिन्हे आणि रूपकांना नवे अर्थ दिले. त्यांनी गझलच्या परंपरेशी एकनिष्ठ राहत राजकीय विषय अशा प्रकारे मांडले की, गझलचे सौंदर्यही टिकून राहिले आणि त्यांचे म्हणणेही व्यक्त झाले. त्यांच्या शायरीमध्ये केवळ निराशा आणि भूतकाळातील तक्रारीच नाहीत, तर भविष्याचे एक स्वप्नही आहे.
ज़िंदगी है तो बहरहाल बसर भी होगी
शाम आई है तो आने दो सहर भी होगी।
(अर्थ: आयुष्य आहे तर ते कसेही करून व्यतीत होईलच, संध्याकाळ झाली आहे तर होऊ द्या, सकाळही नक्कीच होईल.)
मुईन अहसन जज़्बी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. फाळणीला ते देशाची सर्वात मोठी शोकांतिका मानत. या घटनेवर त्यांनी त्यावेळी ‘तक़्सीम’ (फाळणी) या शीर्षकाने एक कविताही लिहिली होती, जी खूप लोकप्रिय झाली.
क्या यही इंक़लाब है, कल्ब इधर, जिगर उधर
नाला ए-बेकरार इधर, शोरिश—ए-चश्म—ए-तर उधर।
(अर्थ: हीच का ती क्रांती, हृदय इकडे तर काळीज तिकडे, बेचैन आक्रोश इकडे तर अश्रूभरल्या डोळ्यांचा कल्लोळ तिकडे.)
अख़्तर-उल-ईमान
अख़्तर-उल-ईमान हे आपल्या काळातील गंभीर कवी होते. उर्दू साहित्यात आधुनिक कवितांची सुरुवात त्यांनीच केली. त्यांच्या कवितांमध्ये साधी-सरळ शायरी नसून, एक संपूर्ण कथा असते, जी संपता-संपता वाचकांच्या मनात असंख्य प्रश्न सोडून जाते.
प्रोफेसर एहतेशाम हुसैन यांनी त्यांच्या शायरीबद्दल लिहिले आहे, "त्यांनी आपल्या शायरीतून व्यक्तिगत अनुभूती, वेदना आणि संघर्षांना वाचा फोडली आहे, त्यातून त्यांची सामाजिक चेतनाही समोर आली आहे."
१९४३ मध्ये त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रह ‘गिर्दाब’ च्या प्रकाशनानंतर ते पहिल्या श्रेणीतील कवींमध्ये गणले जाऊ लागले. या पुस्तकाचे परीक्षण करताना फिराक गोरखपुरी यांनी लिहिले होते, "नवीन कवींमध्ये सर्वात जखमी आवाज अख़्तर-उल-ईमान यांचा आहे. त्यातील मार्मिकता, कटुता आणि जी धग आहे, तीच आजच्या हिंदुस्थानातील संवेदनशील तरुणांच्या जीवनाची शोकांतिका काय आहे, हे सांगेल."
गुलाम रब्बानी ताबाँ
गुलाम रब्बानी ताबाँ यांनी केवळ शायरीच्या माध्यमातून प्रगतिशील विचार आणि तत्त्वे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यासाठी आयुष्यभर प्रत्येक आघाडीवर संघर्ष केला. शायरी त्यांच्यासाठी केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते, तर समाजाला अधिक चांगले बनवण्यासाठीची एक बांधिलकी होती.
गुलाम रब्बानी ताबाँ यांनी गुलाम देशात आपल्या साहित्यातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा ते खूप निराश झाले. त्यांनी आपल्या या दुःखाला शायरीतून मोकळेपणाने व्यक्त केले:
दे के हमको फ़रेब—ए—आज़ादी
इक नई चाल चल गया दुश्मन।
(अर्थ: आम्हाला स्वातंत्र्याचा धोका देऊन, शत्रू एक नवी चाल खेळून गेला.)
फाळणीला गुलाम रब्बानी ताबाँ हे इंग्रज सरकारचे षडयंत्र मानत होते. त्यांनी ‘ग़म-ए-दौरॉं’ आणि ‘शिकस्त-ए-ज़िंदॉं’ या दोन महत्त्वाच्या पुस्तकांचे संपादन केले, ज्यात त्यांनी भारत आणि इतर आशियाई देशांमधील स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित शायरी संकलित केली आहे.
लेखकाबद्दल:
भारतीय साहित्यातील प्रगतिशील चळवळीवर लेखक, पत्रकार जाहिद खान यांचे विस्तृत कार्य आहे. या चळवळीशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘तरक्कीपसंद तहरीक के हमसफर’, ‘तरक्कीपसंद तहरीक की रहगुजर’, ‘तहरीक-ए-आझादी और तरक्कीपसंद शायर’ आणि ‘आधी आबादी अधूरा सफर’ ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत.
जाहिद खान यांनी कृश्न चंदर यांच्या 'पौदे' या ऐतिहासिक रिपोर्ताजचे, अली सरदार जाफरी यांच्या 'यह किसका खून है' या नाटकाचे आणि हमीद अख्तर यांच्या 'रूदाद-ए-अंजुमन' या पुस्तकाचे उर्दूमधून हिंदीत लिप्यंतरण केले आहे. इतकेच नाही, तर ‘शैलेन्द्र हर जोर-जुल्म की टक्कर में’ आणि ‘बलराज साहनी एक समर्पित और सृजनात्मक जीवन’ या पुस्तकांचे संपादनही त्यांच्या नावावर आहे.
लैंगिक संवेदनशीलतेवरील उत्कृष्ट लेखनासाठी ‘पॉपुलेशन फर्स्ट’ संस्थेने जाहिद खान यांना सहा वेळा ‘लाडली मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’ हा प्रादेशिक पुरस्कार आणि २०१८मध्ये ‘साउथ एशिया लाडली मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
त्यांचे चर्चित 'तरक्कीपसंद तहरीक के हमसफर' हे पुस्तक मराठी आणि उर्दू भाषेत अनुवादित होऊन प्रकाशित झाली आहे. या पुस्तकासाठी त्यांना ‘मध्य प्रदेश हिंदी साहित्य संमेलन’ च्या प्रतिष्ठित ‘वागीश्वरी पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले आहे. संपर्कासाठी त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे- [email protected]