जाहिद खान
क्या हिन्द का ज़िंदाँ काँप रहा है गूँज रही हैं तक्बीरें
देशाचे स्वातंत्र्य लाखो-करोडो लोकांच्या बलिदानाचा परिणाम आहे. ज्यामध्ये लेखक, कलाकार आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांनीही एक महत्त्वाची भूमिका बजावली. उर्दू साहित्यातील मोठे शायर (कवी) स्वातंत्र्याच्या आंदोलनात आघाडीवर होते.
मौलाना हसरत मोहानी, जिगर मुरादाबादी, जोश मलीहाबादी आणि फिराक गोरखपुरी यांसारखे दिग्गज शायर आपल्या साहित्य आणि निर्मितीद्वारे स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत होते. खरे तर, या शायरांच्या गझल आणि कवितांनी देशात स्वातंत्र्याच्या बाजूने एक वातावरण निर्माण केले. आणि जनता इंग्रज सरकारच्या विरोधात एकवटली.
मौलाना हसरत मोहानी
मौलाना हसरत मोहानी यांचे विचार अत्यंत क्रांतिकारी होते. त्यांनी त्या काळात पत्रकारिता आणि लेखणीचे महत्त्व ओळखले आणि १९०३मध्ये अलीगढ येथून 'उर्दू-ए-मुअल्ला' नावाचे एक राजकीय-साहित्यिक मासिक सुरू केले, ज्यामध्ये इंग्रजी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली जात असे.
या मासिकात हसरत मोहानी यांनी नेहमीच स्वातंत्र्यप्रेमींचे लेख, शायरांची क्रांतिकारी गझल-कविता यांना प्राधान्य दिले, ज्यामुळे ते इंग्रज सरकारच्या डोळ्यात खुपू लागले.
१९०७मध्ये आपल्या एका लेखात मौलाना हसरत मोहानी यांनी सरकारवर तीव्र टीका केली. त्याबदल्यात त्यांना तुरुंगात जावे लागले आणि दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. तुरुंगात त्यांच्याकडून दररोज एक मण गहू दळायला लावले जात होते. याच तुरुंगवासाच्या परिस्थितीत त्यांनी आपला हा प्रसिद्ध शेर लिहिला होता:
है मश्क़-ए-सुख़न जारी, चक्की की मशक़्क़त भी
इक तुर्फ़ा तमाशा है हसरत की तबीयत भी।
(अर्थ: माझी काव्य-साधना (मश्क़-ए-सुख़न) सुरू आहे आणि सोबत तुरुंगात जात्यावर दळण दळण्याची मेहनतही (चक्की की मशक़्क़त) सुरू आहे. हसरतची प्रकृती (तबीयत) हा एक अजबच तमाशा आहे.)
१९२१मध्ये मौलाना हसरत मोहानी यांनी केवळ 'इन्कलाब जिंदाबाद' हा नारा दिला नाही, तर अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात 'आझादी-ए-कामिल' म्हणजेच संपूर्ण स्वराज्याचा प्रस्तावही ठेवला. काँग्रेसच्या त्या ऐतिहासिक बैठकीत क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्ला खाँ यांच्यासह इतरही अनेक क्रांतिकारक उपस्थित होते. महात्मा गांधींनी हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. असे असूनही, हसरत मोहानी 'पूर्ण स्वराज्य'चा नारा देत राहिले आणि अखेरीस १९२९मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला.
शहीद-ए-आझम भगत सिंह आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासह तमाम क्रांतिकारकांनी पुढे मौलाना हसरत मोहानी यांच्या 'इन्कलाब जिंदाबाद' या नाऱ्याचे महत्त्व ओळखले आणि पाहता पाहता ही घोषणा स्वातंत्र्याच्या लढ्यातील सर्वांत लोकप्रिय घोषणा झाली. त्यावेळी देशभरातील प्रत्येक मुलाच्या तोंडी हा नारा होता.
महात्मा गांधींना स्वदेशी आंदोलनाचा मार्ग मौलाना हसरत मोहानी यांनीच सुचवला होता, हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यांनी स्वतः याचा खूप प्रचार-प्रसार केला. इतकेच नाही तर एक खादी भांडारही उघडले जे खूप लोकप्रिय झाले होते.
जिगर मुरादाबादी
गझलचे शहेनशाह जिगर मुरादाबादी यांनी केवळ प्रेम-विरह यावरच लिहिले नाही, तर आपल्या अखेरच्या काळात ते जीवनातील वास्तवाच्या जवळ आले आणि त्यांनी आपल्या काळातील मोठ्या समस्यांना गझलचा विषय बनवले. बंगालच्या भीषण दुष्काळावर त्यांनी 'कहत-ए-बंगाल' (बंगालचा दुष्काळ) सारखी हृदयद्रावक कविता लिहिली:
बंगाल की मैं शाम-ओ-सहर देख रहा हूँ
हर चंद कि हूँ दूर मगर देख रहा हूँ
इफ़्लास की मारी हुई मख़्लूक़ सर-ए-राह
बे-गोर-ओ-कफ़न ख़ाक-ब-सर देख रहा हूँ।
(अर्थ: मी बंगालची संध्याकाळ आणि सकाळ पाहत आहे, जरी मी दूर असलो तरी सर्व काही पाहत आहे. गरिबीने ग्रासलेले लोक रस्त्यावर आहेत, कबरीशिवाय आणि कफनाशिवाय धुळीत पडलेले मी पाहत आहे.)
तर १९४६-४७मध्ये देशभरात झालेल्या जातीय दंगलींनी जिगर मुरादाबादी यांच्या आत्म्याला जखमी केले. या अस्वस्थ परिस्थितीला त्यांनी आपल्या गझलमध्ये अशा प्रकारे शब्दबद्ध केले:
फ़िक्र-ए-जमील ख़्वाब-ए-परेशाँ है आज-कल
शायर नहीं है वो, जो ग़ज़ल-ख्वाँ है आज-कल
इंसानियत के जिससे इबारत है ज़िंदगी
इंसां के साये से भी गुरेज़ाँ है आज—कल
दिल की जराहतों के खिले हैं चमन-चमन
और उसका नाम फ़स्ल-ए-बहाराँ है आज—कल।
(अर्थ: सुंदर विचार आज विखुरलेल्या स्वप्नासारखे झाले आहेत, जो फक्त गझल गातो तो आज कवी नाही. ज्या मानवतेमुळे जीवन घडते, तीच आज माणसाच्या सावलीपासूनही दूर पळत आहे. हृदयाच्या जखमांची बाग फुलली आहे आणि तिचे नाव आज वसंत ऋतू ठेवले आहे.)
जोश मलीहाबादी
उर्दू साहित्यात जोश मलीहाबादी आपल्या क्रांतिकारी लेखनामुळे 'शायर-ए-इन्कलाब' (क्रांतीचा कवी) म्हणून ओळखले गेले. जोश मलीहाबादी यांच्या जीवनाचा सुरुवातीचा काळ देशाच्या गुलामगिरीचा काळ होता. साहजिकच, या काळाचा प्रभाव त्यांच्या शायरीवरही पडला. देशभक्ती आणि बंडखोरी त्यांच्या स्वभावाचा भाग बनली.
त्यांच्या अनेक गझल आणि कविता देशभक्तीच्या रंगात रंगलेल्या आहेत. 'मातम-ए-आझादी', 'निजाम-ए-नौ', 'इन्सानियत का कोरस', 'जवाल-ए-जहां-बानी' ही नावे त्यात अग्रक्रमाने घेता येतील.
जूतियाँ तक छीन ले इंसान की जो सामराज
क्या उसे यह हक़ पहुँचता है कि रक्खे सर पै ताज।
(अर्थ: जे साम्राज्य माणसाचे जोडेसुद्धा हिसकावून घेते, त्याला डोक्यावर मुकुट ठेवण्याचा अधिकार आहे का?)
क्रांती आणि बंडखोरीने ओतप्रोत असलेल्या जोश यांच्या या गझल-कविता स्वातंत्र्य संग्रामादरम्यान तरुणांच्या मनात खोलवर परिणाम करत होत्या. ते आंदोलित होत असत. यामुळेच जोश मलीहाबादी यांना आपल्या क्रांतिकारी गझल-कवितांमुळे अनेकदा तुरुंगातही जावे लागले. पण त्यांनी आपला स्वभाव आणि मार्ग बदलला नाही.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जोश मलीहाबादी यांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी के फरजंदों के नाम’, ‘वफादारान-ए-अजली का पयाम शहंशाह-ए-हिन्दोस्तां के नाम’ आणि ‘शिकस्त-ए-जिंदां का ख्वाब’ यांसारख्या साम्राज्यवादविरोधी कविता लिहिल्या.
क्या हिन्द का ज़िंदाँ काँप रहा है गूँज रही हैं तक्बीरें
उकताए हैं शायद कुछ क़ैदी और तोड़ रहे हैं ज़ंजीरें।
(अर्थ: भारताचा तुरुंग का कापत आहे, घोषणा का घुमत आहेत? कदाचित काही कैदी कंटाळले आहेत आणि साखळ्या तोडत आहेत.)
फिराक गोरखपुरी
शायर-ए-आझम रघुपति सहाय उर्फ फिराक गोरखपुरी हेदेखील आपल्या साहित्यिक जीवनाच्या सुरुवातीलाच स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले होते. १९२०मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या दौऱ्याला विरोध केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यासाठी ते अडीच वर्षे आग्रा आणि लखनऊच्या तुरुंगात होते.
फिराक गोरखपुरी यांनी गुलाम देशातील शेतकरी-मजुरांचे दुःख-दर्द समजून घेतले आणि आपल्या शायरीतून त्यांना आवाज दिला. जोश मलीहाबादींप्रमाणे त्यांच्या कवितांचा आवाका मोठा होता. मजुरांना आवाहन करताना ते लिहितात:
तोड़ा धरती का सन्नाटा किसने ? हम मज़दूरों ने
डंका बजा दिया आदम का किसने ? हम मज़दूरों ने
(अर्थ: या धरतीची शांतता कोणी भंग केली? आम्ही मजुरांनी. मानवतेचा डंका कोणी वाजवला? आम्ही मजुरांनी.)
त्यांच्या काव्यात साम्राज्यवाद, भांडवलशाही आणि सांप्रदायिकतेचा स्पष्ट विरोध दिसतो.
बेकारी, भुखमरी, लड़ाई, रिश्वत और चोरबज़ारी
बेबस जनता की यह दुर्गत, सब की जड़ सरमायादारी।
(अर्थ: बेरोजगारी, भूक, भांडणे, लाच आणि काळाबाजार... असहाय्य जनतेच्या या दुर्दशेचे मूळ भांडवलशाहीत आहे.)
फिराक गोरखपुरी यांच्या 'गुल-ए-नग्मा' या पुस्तकात अशा प्रकारच्या गझल आणि कविता मोठ्या प्रमाणात आहेत. साम्राज्यावादाच्या विरोधात अनेक कवितांमध्ये त्यांचा सूर खूप तीव्रही होतो. त्यांच्या अशाच एका कवितेचे उदाहरण पाहा:
ये सब मर्दखोर हैं साथी इनके साथ मुरव्वत कैसी
यह दुनिया है इनकी मिलकिय्यत इस दुनिया की ऐसी तैसी
दुनिया भर बाज़ार है जिसका इक मंडी हेराफेरी की
उस अमेरिका की यह हालत यह बेकारी धत तेरे की।
(अर्थ: हे सर्व नरभक्षक (शोषक) आहेत, त्यांच्यासोबत कसली सहानुभूती? हे जग यांची मालमत्ता आहे, अशा जगाची ऐसीतैसी. ज्याचा जगभर बाजार आहे, एक हेराफेरीची बाजारपेठ आहे, त्या अमेरिकेची ही अवस्था, ही बेरोजगारी, धिक्कार असो.)
लेखकाबद्दल:
भारतीय साहित्यातील प्रगतिशील चळवळीवर लेखक, पत्रकार जाहिद खान यांचे विस्तृत कार्य आहे. या चळवळीशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘तरक्कीपसंद तहरीक के हमसफर’, ‘तरक्कीपसंद तहरीक की रहगुजर’, ‘तहरीक-ए-आझादी और तरक्कीपसंद शायर’ आणि ‘आधी आबादी अधूरा सफर’ ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत.
जाहिद खान यांनी कृश्न चंदर यांच्या 'पौदे' या ऐतिहासिक रिपोर्ताजचे, अली सरदार जाफरी यांच्या 'यह किसका खून है' या नाटकाचे आणि हमीद अख्तर यांच्या 'रूदाद-ए-अंजुमन' या पुस्तकाचे उर्दूमधून हिंदीत लिप्यंतरण केले आहे. इतकेच नाही, तर ‘शैलेन्द्र हर जोर-जुल्म की टक्कर में’ आणि ‘बलराज साहनी एक समर्पित और सृजनात्मक जीवन’ या पुस्तकांचे संपादनही त्यांच्या नावावर आहे.
लैंगिक संवेदनशीलतेवरील उत्कृष्ट लेखनासाठी ‘पॉपुलेशन फर्स्ट’ संस्थेने जाहिद खान यांना सहा वेळा ‘लाडली मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’ हा प्रादेशिक पुरस्कार आणि २०१८मध्ये ‘साउथ एशिया लाडली मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
त्यांचे चर्चित 'तरक्कीपसंद तहरीक के हमसफर' हे पुस्तक मराठी आणि उर्दू भाषेत अनुवादित होऊन प्रकाशित झाली आहे. या पुस्तकासाठी त्यांना ‘मध्य प्रदेश हिंदी साहित्य संमेलन’ च्या प्रतिष्ठित ‘वागीश्वरी पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले आहे. संपर्कासाठी त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे- [email protected]