श्रीलता एम.
तुम्हाला जर अजिता बेगम सुलतान यांच्याशी दोन शब्द बोलायचे असतील, तर वाऱ्याच्या वेगाने त्यांच्या मागे धावण्यासारखे आहे. केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या महानिरीक्षक (आयजी) अजिता बेगम यांच्याकडे श्वास घ्यायलाही वेळ नसतो. एका कामानंतर दुसरे काम असे करत त्यांचा दिवस कधी संपतो हेच त्यांना कळत नाही.
गुन्हे शाखेच्या प्रमुख असलेल्या अजिता बेगम भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) केरळ कॅडरच्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. तामिळनाडूतून आलेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आयपीएस अधिकारी आहेत.
त्यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते. त्यांचे कार्यालयही त्यांची वाट पाहत असते. त्या कधी एखाद्या क्रीडा स्पर्धेत असतात, कधी सांस्कृतिक कार्यक्रमात, तर कधी चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या असतात.
मानवी तस्करी, राज्यात येणारे अमली पदार्थ आणि राज्याच्या सामाजिक स्वास्थ्याला धक्का पोहोचवणाऱ्या अत्यंत संवेदनशील प्रकरणांचा तपास त्या स्वतः करत आहेत. महिला आणि लहान मुलांसाठी काम करणे हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याचे त्या नेहमी सांगतात.
केरळ पोलिसांच्या उतरंडीत त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने एक एक पायरी चढून यश मिळवले. जिथे जिथे त्यांची बदली झाली, तिथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांचे पतीही आयपीएस अधिकारी असून ते देखील 'आयजी' आहेत. त्यामुळे ही जोडी बऱ्यापैकी प्रसिद्धीच्या झोतात असते.

माध्यमांनीही त्यांच्या कामाची नेहमीच दखल घेतली आहे. अजिता यांनी मानवी तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करून ४४ आरोपींना गजाआड करणे असो. किंवा कोल्लम जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण 'एसपी' म्हणून या दोघांनी एकाच वेळी काम पाहणे असो.
काही वर्षांपूर्वी 'आयर्नमॅन ट्रायथलॉन' पूर्ण करून या जोडीने आपण सर्वात तंदुरुस्त पोलीस अधिकारी असल्याचे सिद्ध केले होते. 'फुलब्राइट स्कॉलरशिप'अंतर्गत अमेरिकेतून प्रशिक्षण पूर्ण करून हे दोघे पुन्हा आपल्या वर्दीत रुजू झाले.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एक दिवस संध्याकाळी अचानक फोन वाजतो. समोरून आवाज येतो, "हॅलो, मी अजिता बोलतेय. बोला." आणि अचानक तुम्हाला एका लहान मुलासारखे वाटू लागते. समोरची व्यक्ती कुणी साधीसुधी नसून ती चक्क गुन्हे शाखेची 'आयजी' आहे, या विचाराने थोडे दडपण येते.
त्या वयाने तुमच्या निम्म्या असतील. पण तरीही पोलिसांची भीती का वाटते? आपण अनेक पोलिसांच्या मुलाखती घेतल्या आहेत. बातम्यांसाठी अनेक पोलीस ठाण्यांच्या पायऱ्या झिजवल्या आहेत. तरीही पोलिसांशी बोलताना एक प्रकारची धाकधूक असतेच.
पोलीस गुन्हेगारांसाठी कठोर आणि धोकादायक असतात, अशी आपली समजूत असते. त्यांचा कठोरपणा आणि आक्रमकता सामान्य माणसाला थोडे दूरच ठेवते. पण अजिता यांचा आवाज ऐकताच ती भीती कुठल्या कुठे पळून जाते. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा जिव्हाळा आहे. दोन मुलांच्या आईचा साधेपणा आहे.
तामिळनाडूच्या कुठल्याशा दूरच्या गावात एका साध्या कुटुंबात वाढलेल्या लहान मुलीचा दयाळूपणा आणि नम्रता त्यांच्या बोलण्यातून जाणवते. मग तुमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचा ओघ सुरू होतो. मनातली भीती नाहीशी होते आणि त्या पोलिसामागचा एक संवेदनशील माणूस समोर येतो.
एका कठोर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका त्यांनी कशी स्वीकारली? त्यांच्यातला हा आत्मविश्वास आणि खंबीरपणा कुठून आला? त्या नेहमीच अशा होत्या का?
"मी नेहमीच इतकी आत्मविश्वासाने भरलेली नव्हते. तुम्हाला माहीत आहेच, मी कोईम्बतूरमधील एका अत्यंत साध्या कुटुंबातून आले आहे," त्या सांगतात. कुटुंबाविषयी आणि सेवेतील प्रवेशाविषयी सांगताना त्या म्हणतात, हा आत्मविश्वास त्यांच्यात हळूहळू आणि काळानुसार निर्माण झाला.

अजिता यांचे आई-वडील अशिक्षित होते. त्यांच्या कुटुंबात मुलींची वयाची १८ वर्षे पूर्ण होताच लग्न लावून देण्याची पद्धत होती. अजिता यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न ती कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच लावून देण्यात आले. त्यानंतर साहजिकच अजिता यांचा नंबर होता.
पण अजिता विद्यार्थी राजकारणात सक्रिय होत्या. त्यांच्या शिक्षकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले होते. त्यांनी तो सल्ला गांभीर्याने घेतला. लग्नाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. पण अजिता यांनी याला कडाडून विरोध केला आणि शेवटी त्यांचाच विजय झाला.
आता इतर वडिलांप्रमाणे त्यांच्या वडिलांचीही एक मोठी इच्छा होती. अजिता यांनी 'नागरी सेवा' परीक्षा द्यावी आणि 'आयएएस' अधिकारी बनावे, असे त्यांना वाटत होते. या परीक्षेबद्दल काहीही माहिती नसतानाही त्यांनी तयारी केली आणि 'आयपीएस'साठी त्यांची निवड झाली.
सरकारी लाभ मिळवण्यासाठी किंवा लाचखोरीला कंटाळून त्यांच्या वडिलांना कशी वणवण करावी लागली, हे त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे पोलिसांसारखा आत्मविश्वास त्यांच्यात जन्मतःच नव्हता. लालफितशाही आणि प्रशासनाच्या बेपर्वाईचे चटके सोसलेल्या लोकांचे दुःख आणि राग त्यांनी अगदी जवळून अनुभवला होता.
"काळानुसार माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला," असे त्या अगदी नम्रपणे सांगतात. पण एक माणूस म्हणून मी अजिबात बदलले नाही, हेही त्या आवर्जून नमूद करतात.
"आयपीएसमध्ये येण्यापूर्वी माझ्यात जो साधेपणा होता, तोच मी आजही जपला आहे. मी अजिबात बदलले नाही, हे माझ्या जवळच्या लोकांना चांगलेच माहीत आहे," त्या म्हणतात. "शेवटी ही एक सरकारी नोकरीच आहे. पण या नोकरीत खूप आदर, ताकद आणि अधिकार मिळतात," असे त्या मानतात.
एक महिला अधिकारी म्हणून स्वीकारले जाण्यासाठी मात्र थोडा वेळ लागला. २००८ मध्ये जम्मू-काश्मीर कॅडरमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग झाली. तिथे त्यांच्यासमोरील पहिले आव्हान हे 'लिंगभेद' नव्हते, तर 'भाषा' हे होते.
त्या सांगतात, “डोगरी किंवा हिंदी भाषा मला समजत नव्हती आणि सर्व फाईल्स उर्दूमध्ये होत्या. त्यामुळे मला खूप संघर्ष करावा लागला." पण तिथले लोक खूप साधे आणि नम्र होते, तसेच ते कॅडरही चांगले होते, असे त्या सांगतात.
२०१९ मध्ये त्या केरळ कॅडरमध्ये आल्या आणि त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, आता त्यांना सगळं समजू लागलं होतं. त्या वाचूही शकत होत्या. केरळ कॅडरमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांना भाषेची एक अनिवार्य परीक्षा पास करावी लागली होती, हे त्या आवर्जून सांगतात.
लिंगभेदाबद्दल बोलताना त्या त्रिशूरमधील 'एसपी' पदावरील पोस्टिंगची आठवण सांगतात. "संपूर्ण सभागृह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भरले होते. मी गुन्हेगारीच्या विषयावर एका परिषदेत बोलत होते. सर्व आमदारांनी तिथे येणे अपेक्षित होते. पण 'एसपी' नवीन आहेत आणि त्यात त्या एक महिला आहेत, म्हणून लोकांची उपस्थिती खूपच कमी होती."
पण या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. लोक तुमच्या पदाकडे आणि त्या पदाच्या जबाबदारीकडे पाहतात, असे त्या म्हणतात. प्रशिक्षण केंद्रातील त्यांच्या मार्गदर्शकाचे शब्द त्यांना आजही आठवतात.
"माझे मार्गदर्शक नेहमी सांगायचे, वयाच्या २५व्या वर्षीही तुमचे निर्णय योग्यच असले पाहिजेत. तुम्हाला चूक करून अजिबात चालणार नाही. जर तुम्ही एकदा किंवा दोनदा जरी चूक केली, तर तुमच्यावर कायमचा ठपका बसेल. हा सल्ला मी नेहमीच हृदयाशी जपून ठेवला आहे”, असे त्या सांगतात.
"ही एकमेव अशी नोकरी आहे, जिथे अत्यंत तरुण लोकांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी दिली जाते," असे त्या पुढे म्हणाल्या.
लिंगभेदाचा विचार केल्यास, केरळमध्ये पुरुष आणि महिलांसाठी पदोन्नतीचे नियम समान आहेत, असे त्या स्पष्ट करतात. केरळमध्ये येताच त्यांना अतिरिक्त 'एसपी'ची पोस्टिंग मिळाली. पण जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या बॅचमेटला मात्र 'एसपी'ची पोस्टिंग मिळायला खूप वेळ लागला.
'द केरळ स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाबद्दल त्या काहीही बोलणे टाळतात. मात्र, राज्यात 'पॉक्सो' अंतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्याचे त्या मान्य करतात. किंबहुना, हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. गुन्ह्यांची नोंद होण्याचे प्रमाण वाढले आहे, हे यामागचे मुख्य कारण आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या आरोपांवर आधारित 'हेमा समिती'च्या अहवालाचा तपास करणाऱ्या 'विशेष तपास पथकाचा' अजिता या एक महत्त्वाचा भाग आहेत. लहान मुले आणि महिलांचे संरक्षण करणे, विशेषतः मानवी तस्करी, लैंगिक छळ आणि अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणे, हेच आपले नेहमी प्राधान्य राहील, असे त्या स्पष्ट करतात.
'स्टेट पोलीस कॅडेट' या कार्यक्रमाच्या त्या राज्य नोडल अधिकारी आहेत. हा कार्यक्रम केरळचीच संकल्पना असून नंतर तो अनेक राज्यांनी स्वीकारला. हा कार्यक्रम त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून त्या नेहमी या कार्यक्रमातील आपल्या सहभागाबद्दल माहिती देत असतात. तरुणांमध्ये सामाजिक जाणीव आणि शिस्त निर्माण करणे आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना जबाबदार बनवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सुमारे १०४८ शाळांनी 'एसपीसी' प्रकल्प स्वीकारला आहे, अशी माहिती त्या देतात. बोलता बोलता त्यांना पुन्हा फोन येऊ लागतात. त्या एका कॉलनंतर दुसऱ्या कॉलमध्ये पुन्हा एकदा आपल्या कामात व्यग्र होतात...

मात्र, त्या काही क्षणांच्या संवादातून त्यांनी त्यांच्या वर्षांच्या मेहनतीची आणि सेवेची मोठी शिदोरी मागे ठेवली. कोईम्बतूरच्या त्या लहान मुलीचा आयपीएस प्रशिक्षणापासून ते अनेक बदल्या, आव्हाने आणि केरळच्या जनतेने तिला गुन्हे शाखेची 'आयजी' म्हणून स्वीकारण्यापर्यंतचा हा मोठा प्रवास थक्क करणारा आहे.
२०२५ च्या अखेरीस 'एसपीसी माजी विद्यार्थी मेळाव्यात' पोलीस कॅडेट्सना मार्गदर्शन करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर आहे. त्यात त्या अत्यंत शुद्ध मल्याळम भाषेत बोलत आहेत. त्यांच्या मल्याळमचा कोणत्याही मल्याळी माणसाला अभिमान वाटेल. त्यांच्या आवाजात एक वेगळीच सहानुभूती आणि ठाम विश्वास आहे.
अमली पदार्थांच्या व्यसनासारख्या समस्यांशी लढणाऱ्या तरुणांसोबत मिळून सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रचंड उत्साह त्यांच्या आवाजात जाणवतो. उद्याचे नागरिक असलेल्या या तरुणांच्या साथीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे हे एक मोठे वचन आहे. हा आवाज सत्ता आणि अधिकाराचा नाही, तर समाजासाठी आशेचा किरण आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -