सामाजिक नैतिकता शिकवणारा महिना

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Months ago
जामा मस्जीद
जामा मस्जीद

 

मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. या महिन्याचे महत्त्व सांगणारा, या महिन्यात केले जाणारे उपवास (रोजे) आणि इतर विशेष उपासना यांची माहिती देणारा आणि त्यामागचे तत्वज्ञान समजावून सांगणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या रमजान विशेष लेखमालेतील दुसरा लेख...
 
रमजान महिन्यात केवळ ३० दिवस उपवास करणे एवढेच अपेक्षित नाही, तर त्याचबरोबर पवित्र कुरआनमध्ये काही आज्ञा अनिवार्य (बंधनकारक), तर काही ऐच्छिक करण्यात आलेल्या आहेत. पाच वेळची प्रार्थना (नमाज) ही अनिवार्य असून, त्यामुळे त्या व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा यांची एकाग्रता साधली जाऊन समाधान प्राप्त होते. आत्मिक शक्ती लाभते आणि त्या व्यक्तीची बायोएनर्जी वृद्धिंगत होते.

ज्या बाबी पवित्र कुरआनच्या आज्ञेनुसार ऐच्छिक आहेत, त्यांची आपण माहिती घेऊया. उदा. ज्या व्यक्तीजवळ ९० ग्रॅम सोने किंवा ६३० ग्रॅम चांदी अथवा तेवढ्या मूल्याची रोख रक्कम किंवा तेवढ्या किमतीचा व्यापारी माल आहे, अशा सर्व मुस्लिम मिळकतदारांना आपल्या वर्षभरातील उत्पन्नाचा ४०वा भाग म्हणजे अडीच टक्के रक्कम 'जकात' म्हणून गोरगरिबांना वाटप करणे पवित्र कुरआनच्या आज्ञेप्रमाणे बंधनकारक आहे. याशिवाय रमजानच्या शेवटच्या १० दिवसांत आपल्या मोहल्ल्याच्या मशिदीत 'एअतेकाफ' म्हणजे एकांतवासात ध्यान (जप) करीत बसणे हेदेखील ऐच्छिक आहे.

रमजानचे ३० दिवस उपवास पूर्ण केल्यानंतर आपण अत्यंत आनंदाने 'ईद' साजरी करतो. परंतु केवळ आपलीच ईद आनंदात होऊन चालणार नाही, तर मोहल्ल्यातील गरीब लोकांचे काय ? म्हणून ईदच्या आदल्या दिवशी घरातील प्रत्येक माणसाच्या पाठीमागे एक किलो साडेसहाशे ग्रॅम गहू (याला फितरा म्हणतात) किंवा तेवढी रोख रक्कम गोरगरीब लोकांना पोहचविणे सक्तीचे आहे. कारण त्यांच्याही घरात ईद साजरी होणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची ईदची प्रार्थना (नमाज) ईश्वर कबूल करणार नाही. एवढेच नाही तर ईदची प्रार्थना करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारही राहणार नाही.

एखादा मुस्लिम बांधव अत्यंत आनंदात ईद साजरी करत आहे. घरात गोडधोड पदार्थ केले आहेत. घरातील सर्वांनी उच्चप्रतीचे भरजरी कपडे घातले आहेत. परंतु मोहल्ल्यातील गरीब लोकांना नियमाप्रमाणे फितरा (धान्य, रोख रक्कम) दिलेली नसेल, तर अशा श्रीमंत माणसाची ईद ईश्वराच्या दरबारी कबूल होणार नाही व परमार्थिक सुखाला, पुण्याईला ते पारखे होतील. याद्वारे पवित्र कुरआनद्वारे किती महान तत्त्वज्ञान सांगण्यात आलेले आहे, याची आपण फक्त कल्पना करू शकतो!

पवित्र रमजानमध्ये मुस्लिम बांधव या नैतिकतेचे पालन करणार असतील, तर त्यातून एक आदर्श समाज निर्माण होईल, जो या देशाला अभिप्रेत आहे.
 
- डॉ. एस. एन. पठाण
(लेखक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter