भेट द्यायलाच हव्या अशा भारतातल्या १० प्रसिद्ध मस्जिदी

Story by  पुणे | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
भारतातील ऐतिहासिक मस्जिदी
भारतातील ऐतिहासिक मस्जिदी

 

भारतातील ऐतिहासिक मस्जिदी देशाच्या समृद्ध इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्थापत्यकलेचा महत्त्वाचा दस्तऐवज आहेत. भारताची 'गंगा-जमुनी तहजीब' खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल, तर या वास्तूंना भेट दिलीच पाहिजे. भारतातील अशाच १० ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मस्जिदींविषयी जाणून घेऊया.

१. चेरामन जुमा मस्जिद, कोडुंगल्लूर (केरळ)

भारतातील मस्जिदींचा इतिहास थेट केरळच्या किनाऱ्यावरून सुरू होतो. त्रिशूर जिल्ह्यातल्या कोडुंगल्लूर इथली 'चेरामन जुमा मस्जिद' ही अख्ख्या भारतीय उपखंडातली सर्वात जुनी मस्जिद मानली जाते.

या मस्जिदीचं वैशिष्ट्य म्हणजे इसवी सन ६२९ मध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या काळातील अरब व्यापारी मलिक दीनार यांनी ही मस्जिद बांधली. तिची रचना. या वास्तूला मुघल मशिदींसारखे मोठे घुमट किंवा उंच मिनार नाहीत, तर तिची बांधणी अस्सल पारंपारिक केरळी आणि हिंदू मंदिर शैलीत करण्यात आली आहे. लाकडी कोरीव काम आणि कौलारू छप्पर या वास्तूला वेगळीच ओळख देतात. आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे, या मस्जिदीच्या आत एक पितळी दिवा (निलविलक्कु) आहे, जो गेल्या हजार वर्षांहून अधिक काळापासून अखंड तेवत आहे. सर्व धर्माचे लोक श्रद्धेने या दिव्यासाठी तेल आणून देतात.

२. जामा मस्जिद, नवी दिल्ली 

जुन्या दिल्लीची शान आणि मुघल स्थापत्यकलेचा परमोच्च बिंदू म्हणजे इथली भव्य 'जामा मस्जिद'. मुघल सम्राट शाहजहानने १६४४ ते १६५६ या काळात ही वास्तू उभारली. उस्ताद खलील या प्रसिद्ध वास्तूविशारदाच्या देखरेखीखाली लाल सँडस्टोन (वाळूचा खडक) आणि पांढऱ्या संगमरवराचा कल्पक वापर करून ही मस्जिद बांधण्यात आली आहे. मस्जिदीला ४० मीटर उंचीचे दोन भव्य मिनार आणि तीन मोठे संगमरवरी घुमट आहेत. याच्या विशाल प्रांगणात एकाच वेळी तब्बल २५,००० भाविक नमाज अदा करू शकतात. या मस्जिदीचं आणखी एक ऐतिहासिक महत्त्व म्हणजे, इथे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित काही अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये हरणाच्या कातड्यावर लिहिलेल्या कुराणच्या एका प्राचीन प्रतीचा समावेश आहे. दिल्लीच्या गजबजाटातही या मस्जिदीच्या आत मिळणारी शांतता आणि तिथून दिसणारा लाल किल्ल्याचा नजारा अविस्मरणीय असतो.

३. मक्का मस्जिद, हैदराबाद

चारमिनारच्या अगदी जवळ असलेली ही मस्जिद आकाराने आणि भव्यतेने थक्क करणारी आहे. कुतुबशाही वंशातील शासक मुहम्मद कुली कुतुबशाह याने १६१४ मध्ये या मस्जिदीची पायाभरणी केली, आणि तब्बल ८० वर्षांनंतर मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात तिचं बांधकाम पूर्ण झालं. या मस्जिदीच्या निर्मितीची कथा रंजक आहे. असं म्हणतात की, या मस्जिदीची मुख्य कमान बनवण्यासाठी थेट सौदी अरेबियातील मक्का शहरातून माती आणून तिच्या विटा तयार केल्या गेल्या होत्या, आणि म्हणूनच या वास्तूला 'मक्का मस्जिद' हे नाव पडलं. संपूर्ण वास्तू उभारताना ग्रॅनाईट दगडाचा सुबक वापर करण्यात आला असून मस्जिदीच्या मुख्य दालनाला १५ भव्य कमानींचा भक्कम आधार आहे. मस्जिदीच्या प्रांगणात आसफ जाही (निझाम) घराण्याच्या राज्यकर्त्यांच्या संगमरवरी समाध्या आहेत. या मस्जिदीच्या अवाढव्य आकारामुळे इथल्या शांततेत एक वेगळीच गंभीरता आणि 'सुकून' जाणवतो.

४. ताज-उल-मसाजिद, भोपाळ

ताज-उल-मसाजिद म्हणजे ‘मस्जिदींचा मुकुट' असा अर्थ असणाऱ्या या वास्तूची निर्मिती भोपाळच्या नवाब शाहजहान बेगम यांच्या काळात सुरू झाली. निधीअभावी अनेक दशके रखडलेलं हे काम शेवटी १९८५ मध्ये भारत सरकारच्या मदतीने पूर्ण करण्यात आलं. आज ही मस्जिद आशिया खंडातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे. या वास्तूची भव्यता शब्दांत सांगणं कठीण आहे. गुलाबी-लाल रंगाचा दर्शनी भाग, १८ मजली उंच असे अष्टकोनी मिनार आणि त्यावर संगमरवरी घुमट यामुळे ही मस्जिद विलोभनीय दिसते. या वास्तूच्या शेजारीच असलेला मोतिया तलाव मस्जिदीच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. मस्जिदीच्या आत संगमरवरी खांबांवर केलेलं बारीक नक्षीकाम आणि मुख्य प्रांगणाची अफाट लांबी-रुंदी पाहणाऱ्याला खिळवून ठेवते. भोपाळच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा हा एक अविभाज्य भाग आहे.

५. सिदी सय्यद मस्जिद, अहमदाबाद

आकाराने लहान आणि साधी वाटणारी ही मस्जिद तिच्या एका विशिष्ट कलाकुसरीमुळे आज जगभरात प्रसिद्ध आहे. गुजरात सल्तनतच्या काळात १५७३ मध्ये सिदी सय्यद नावाच्या एका सरदाराने ती बांधली. या मस्जिदीची खरी ओळख म्हणजे इथल्या खिडक्यांमध्ये पिवळ्या सँडस्टोनमध्ये कोरलेल्या अप्रतिम जाळ्या. यातील 'ट्री ऑफ लाईफ' (कल्पवृक्ष) ही खिडकीची जाळी इंडो-इस्लामिक कोरीव कलेचा मास्टरपीस मानली जाते. झाडाच्या फांद्या आणि पानांची गुंतागुंत दगडावर इतकी अचूक, सजीव आणि नाजूक कोरली आहे की ती दगडावर आहे यावर विश्वास बसत नाही. याच अद्वितीय कलेमुळे 'आयआयएम अहमदाबाद'ने (IIM) हे जाळीचं डिझाईन आपला अधिकृत लोगो म्हणून स्वीकारलं आहे. अहमदाबादच्या गजबजलेल्या रस्त्यावरची ही मस्जिद म्हणजे जणू दगडावर कोरलेलं जिवंत काव्यच आहे.

६. अढाई दिन का झोपडा, अजमेर

अजमेर शरीफ दर्ग्याच्या अगदी जवळ असलेली ही वास्तू भारतातील सर्वात जुन्या मशिदींपैकी एक मानली जाते. ११९९ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने ही मस्जिद बांधली. या वास्तूचं नाव 'अढाई दिन का झोपडा' कसं पडलं याबद्दल अनेक रंजक आख्यायिका आहेत. काहींच्या मते ही मस्जिद केवळ अडीच दिवसांत बांधून पूर्ण झाली, तर काहींच्या मते इथे भरणारा उरूस (जत्रा) अडीच दिवसांचा असतो म्हणून हे नाव रूढ झालं. दिल्लीच्या 'कुव्वत-उल-इस्लाम' मशिदीप्रमाणेच इथले खांब आणि रचना इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या मशिदीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या पिवळ्या दगडांच्या भव्य कमानींवर कोरलेली कुराणमधील वचने (कॅलिग्राफी). हे कोरीव काम इतकं नाजूक आणि अचूक आहे की ते तत्कालीन कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देतं.

७. मोती मस्जिद, आग्रा

आग्रा किल्ल्याच्या आत असलेली ही अतिशय सुंदर आणि शांत मस्जिद म्हणजे मुघल सम्राट शाहजहानच्या वास्तुकलेवरील प्रेमाचं आणि सौंदर्यदृष्टीचं आणखी एक उत्तम उदाहरण आहे. १६४८ ते १६५४ या काळात ही मस्जिद बांधण्यात आली. संपूर्ण मस्जिद शुद्ध पांढऱ्या संगमरवरापासून बनवली असल्याने ती उन्हात एखाद्या मोत्यासारखी चमकते, आणि म्हणूनच तिला 'मोती मस्जिद' असं सार्थ नाव देण्यात आलं आहे. या मशिदीचे तीन पांढरे घुमट आणि अत्यंत सुबक कमानी मुघल स्थापत्यकलेचा डौल दाखवतात. लाल वाळूच्या दगडाने (सँडस्टोन) बनवलेल्या भव्य आग्रा किल्ल्याच्या मध्यभागी ही पांढरीशुभ्र वास्तू एकदम उठून दिसते.

८. जामिआ मस्जिद, श्रीनगर

१३९४ मध्ये सुलतान सिकंदर शाह मिरी याने बांधलेली ही मस्जिद भारतातील इतर पारंपारिक मशिदींपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मस्जिदीला पारंपारिक घुमट किंवा उंच मिनार नाहीत. तिची रचना बौद्ध 'पॅगोडा' शैलीशी साधर्म्य सांगणारी असून, इंडो-सार्सेनिक लाकडी वास्तुकलेचा हा अप्रतिम नमुना आहे. या मस्जिदीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं छत पेलणारे देवदार वृक्षांचे ३७८ अखंड आणि भव्य लाकडी खांब. या लाकडी वास्तुकलेमुळे मस्जिदीच्या आत अतिशय थंड आणि शांत वातावरण तयार होतं. गेल्या कित्येक शतकांत ही मस्जिद अनेकदा आगीत भस्मसात झाली, पण प्रत्येक वेळी तिची त्याच मूळ स्वरूपात पुनर्बांधणी केली गेली. एकाच वेळी तब्बल ३३,००० नमाजी सामावून घेण्याची या मस्जिदीची अफाट क्षमता आहे.

९. जामा मस्जिद, फतेहपूर सिक्री

१५७१ ते १५७४ च्या दरम्यान मुघल सम्राट अकबराने आपली नवी राजधानी फतेहपूर सिक्री इथे ही विस्तीर्ण मस्जिद बांधली. सुफी संत शेख सलीम चिश्ती यांच्या सन्मानार्थ तिची उभारणी करण्यात आली. लाल सँडस्टोनमध्ये बांधलेली ही मस्जिद पर्शियन आणि पारंपारिक भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट संगम आहे. मस्जिदीच्या मध्यवर्ती प्रांगणातच शेख सलीम चिश्ती यांचा पांढऱ्या संगमरवरीतील कोरीव दर्गा आहे, जिथे लोक आजही श्रद्धेने येतात. याच मस्जिदीचा मुख्य दरवाजा म्हणून अकबराने आपल्या गुजरात विजयानंतर ५४ मीटर उंच 'बुलंद दरवाजा' बांधला. या मस्जिदीची अवाढव्य रचना आणि इथलं नक्षीकाम मुघल साम्राज्याच्या ऐश्वर्याची साक्ष देतं.

१०. नाखोदा मस्जिद, कोलकाता

कोलकात्याच्या गजबजलेल्या जाकारिया स्ट्रीटवर असलेली ही मशिद म्हणजे बंगालच्या सांस्कृतिक वैविध्यतेचं सुंदर प्रतीक आहे. १९२६ मध्ये अब्दुर रहीम उस्मान यांच्या नेतृत्वाखाली कच्छी मेमन जमातीने या मस्जिदीची निर्मिती केली. या मस्जिदीची वास्तुकला थेट आग्रा येथील सिकंदरा (अकबराचा मकबरा) आणि फतेहपूर सिक्रीच्या बुलंद दरवाजावरून प्रेरित आहे. लाल सँडस्टोनचा मुबलक वापर, तीन मोठे घुमट आणि तब्बल २५ छोटे मिनार ही या मस्जिदीची मुख्य ओळख आहे. या मस्जिदीच्या आत अतिशय सुबक रंगकाम आणि नक्षीकाम केलं आहे. गजबजलेल्या कोलकात्यात एकाच वेळी दहा हजार लोकांना सामावून घेणारी ही मस्जिद इथल्या स्थानिक मुस्लीम समुदायाचं प्रमुख केंद्र असून, रमजानच्या काळात या वास्तूचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.

भारतातील या ऐतिहासिक मस्जिदी कुशल कारागिरांच्या कलेचा, शासकांच्या दूरदृष्टीचा आणि भारतीय उपखंडात शतकानुशतके विकसित झालेल्या कलात्मक देवाणघेवाणीचा अविष्कार आहेत. स्थापत्यकला आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांनी या वास्तूंना आवर्जून भेट द्यायला हवी.