जागतिक पुस्तक मेळ्यात ‘खुसरो फाउंडेशन’च्या पुस्तकांनी वेधले लक्ष

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
जामिया हमदर्दचे कुलगुरू प्रो. अफशर आलम यांच्या हस्ते 'मुस्लिम अझहान की तश्कील-ए-नौ' या पुस्तकाचे प्रकाशन
जामिया हमदर्दचे कुलगुरू प्रो. अफशर आलम यांच्या हस्ते 'मुस्लिम अझहान की तश्कील-ए-नौ' या पुस्तकाचे प्रकाशन

 

आवाज द व्हॉइस, नवी दिल्ली

दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या 'जागतिक पुस्तक मेळ्या'त खुसरो फाउंडेशनची पुस्तके सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत. आधुनिक इस्लामिक विचार आणि सकारात्मक मांडणी असलेल्या या पुस्तकांकडे लेखक, संशोधक, विद्यार्थी आणि विचारवंतांचा मोठा ओढा दिसत आहे.

नवी दिल्लीतील 'खुसरो फाउंडेशन' ही संस्था प्रामुख्याने उर्दू, हिंदी आणि इतर भाषांमध्ये दर्जेदार साहित्य निर्माण करण्याचे काम करते. लोकांना प्रेरित करणे आणि त्यांना देशहितासाठी एकत्र आणणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या पुस्तक मेळ्यामध्ये फाउंडेशनने अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले असून त्यावर विशेष चर्चासत्रांचेही आयोजन केले आहे.

फाउंडेशनच्या स्टॉलवर सध्या काही पुस्तकांना वाचकांकडून मोठी मागणी आहे. यामध्ये मुस्तफा अकयोल यांच्या 'रिकन्स्ट्रक्शन ऑफ मुस्लिम माईंड' या पुस्तकाचा 'मुस्लिम अझान की तश्कील-ए-नौ' हा उर्दू अनुवाद, 'तिरंगा आंचल', मोहम्मद मुश्ताक तिजारवी यांनी लिहिलेल्या 'दारा शिकोह' पुस्तकाचा हिंदी अनुवाद आणि 'हिंदुस्तान उर्दू शायरी के हवाले से' या पुस्तकांचा समावेश आहे.

जामिया हमदर्दचे कुलगुरू प्रो. अफशार आलम यांच्या हस्ते 'रिओपनिंग मुस्लिम माईंड्स' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या निमित्ताने 'इस्लाम आणि आधुनिकता' या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चेत फाउंडेशनचे संचालक डॉ. शंतनू मुखर्जी आणि सिराजुद्दीन कुरेशी यांच्यासह इतर तज्ज्ञांनी सहभाग घेतला. धर्माची सांगड आधुनिकतेशी कशी घालता येईल, यावर यावेळी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आंतरधर्मीय संवादावर एक वैचारिक चर्चाही पार पडली. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. फाउंडेशनचे निमंत्रक डॉ. हफीझुर रहमान यांनी 'आवाज द व्हॉइस'शी बोलताना सांगितले की, त्यांची पुस्तके ही विशेषतः विचारवंत, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

ते पुढे म्हणाले, "आम्ही प्रकाशित केलेली बहुतांश पुस्तके सध्या इतरत्र कुठेही उपलब्ध नाहीत. पुस्तकांसाठी केलेले सखोल संशोधन आणि त्यांची उत्तम छपाई यामुळे वाचक या साहित्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter