अहमदाबाद विमान अपघाताचा अंतिम चौकशी अहवाल अखेर सादर होणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
अहमदाबाद विमान अपघातातील दृश्ये
अहमदाबाद विमान अपघातातील दृश्ये

 

जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या उड्डाण 'AI-171' च्या भीषण अपघाताचा अंतिम कच्चा अहवाल (Draft final report) या वर्षी ऑक्टोबरमध्ये तयार होण्याची संपूर्ण अपेक्षा आहे, अशी अधिकृत माहिती 'एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'ने (AAIB) सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. १२ जून २०२५ रोजी झालेल्या या भयानक अपघातात तब्बल २६० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका सविस्तर प्रतिज्ञापत्रात AAIB ने स्पष्ट केले आहे की, अहमदाबाद विमान अपघातातील 'कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग' (Cockpit voice recordings) आणि हवेतील इमेज रेकॉर्डिंग कोणत्याही बाह्य समितीला किंवा जनतेला उघड करण्यास कायद्यानुसार पूर्णपणे "वैधानिक मनाई" आहे. असे संवेदनशील साहित्य सार्वजनिकरित्या शेअर केल्यास विमान (अपघात आणि घटनांची चौकशी) नियम, २०२५ च्या 'परिशिष्ट क' सह वाचल्या जाणाऱ्या 'नियम १७(१)' आणि 'नियम १७(५)' चे थेट उल्लंघन ठरेल.

AAIB ने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, आंतरराष्ट्रीय उड्डाणाचा समावेश असलेला हा गंभीर अपघात केवळ देशांतर्गत चौकशीचा विषय नसून, तो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) शिकागो कन्व्हेन्शन आणि त्याच्या 'परिशिष्ट १३' च्या जागतिक नियमांनुसार चालणारा एक आंतरराष्ट्रीय तपास आहे. या परिशिष्ट १३ मध्ये विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी जगभर मानली जाणारी मानक कार्यप्रणाली (SOP) विहित करण्यात आली आहे.

या चौकशीचा एकमेव हेतू केवळ विमान वाहतूक सुरक्षा सुधारणे आणि भविष्यात असे अपघात टाळणे हाच असतो; कुणावरही चुकीचा ठपका ठेवणे किंवा दिवाणी व फौजदारी दायित्व निश्चित करणे हा या चौकशीचा मूळ हेतू नसतो, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. अपघाताची गुंतागुंत पाहता, पुढील ६ आठवड्यांत हे काम पूर्ण होईल आणि विश्लेषण टप्प्यानंतर ऑक्टोबर २०२६ च्या सुमारास अंतिम अहवाल येईल.