छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी या चकमकीत टॉप नक्षलवादी कमांडर आणि सीपीआय माओवादी सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ बसवराजू याचाही खात्मा केला. या घटनेत एक सुरक्षा कर्मचारी शहीद झाला आणि काही इतर कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, "या उल्लेखनीय यशाबद्दल आपल्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे. माओवादाचा नायनाट करून लोकांना शांतता आणि प्रगतीचे जीवन देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे."
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की, छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील कारवाईत सुरक्षा दलांनी २७ कुख्यात माओवाद्यांना ठार केले. यामध्ये सीपीआय-माओवादीचे सरचिटणीस नंबाला केशव राव ऊर्फ बसवराज यांचाही समावेश आहे. या मोठ्या यशाबद्दल त्यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले.
एक्सवर एका पोस्टमध्ये शहा म्हणाले, नक्षलवादाविरुद्ध भारताच्या तीन दशकांच्या लढ्यात प्रथमच सरचिटणीस दर्जाचा नेता ठार झाला आहे. बसवराज हे नक्षल चळवळीचा कणा होते, असे त्यांनी नमूद केले. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टनंतर छत्तीसगडमध्ये ५४ नक्षलवाद्यांना अटक झाली आणि ८४ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. मोदी सरकार मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे शहा म्हणाले.
शहा यांनी एक्सवर लिहिले की, "नक्षलवाद संपवण्याच्या लढ्यात मोठे यश मिळाले आहे. नारायणपूर, छत्तीसगडमध्ये आजच्या कारवाईत सुरक्षा दलांनी २७ कुख्यात माओवाद्यांना ठार केले. यात सीपीआय-माओवादीचे सरचिटणीस नंबाला केशव राव ऊर्फ बसवराज यांचा समावेश आहे. ते नक्षल चळवळीचे प्रमुख नेते आणि कणा होते."
ते पुढे म्हणाले की, "भारताच्या नक्षलवादाविरुद्धच्या तीन दशकांच्या लढ्यात प्रथमच सरचिटणीस दर्जाचा नेता ठार झाला. या मोठ्या यशाबद्दल मी सुरक्षा दलांचे आणि यंत्रणांचे अभिनंदन करतो. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टनंतर छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात ५४ नक्षल्यांना अटक झाली आणि ८४ नक्षल्यांनी शरणागती पत्करली. मोदी सरकार मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्यासाठी ठाम आहे."
आज सकाळी छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमडच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साव यांनी सांगितले की, "सुरक्षा दल बस्तरला मार्च २०२६ पर्यंत नक्षलमुक्त करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. राज्यात आमचे सरकार स्थापन झाल्यापासून बस्तरला नक्षलमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नारायणपूरमध्ये दोन डझनहून अधिक नक्षलवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले. मार्च २०२६ पर्यंत बस्तर नक्षलमुक्त होईल, यासाठी सुरक्षा दल मेहनत घेत आहेत."
उपमुख्यमंत्र्यांनी पुष्टी केली की, या चकमकीत एक जवान जखमी झाला. सुरक्षा दलांनी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुत्तालू डोंगर (केजीएच) परिसरात ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ राबवून नक्षलवाद्यांचा कणा मोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. माओवादाचा नायनाट करून लोकांना शांतता आणि प्रगतीचे जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.