गुवाहाटी येथे झालेल्या भाजपच्या उच्चस्तरीय रणनीती बैठकीत प्रबोधन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती निश्चित केली आहे. सुरक्षित आसाम हा भाजपच्या २०२६च्या निवडणूक प्रचाराचा मुख्य आधार असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. गुवाहाटी येथे झालेल्या भाजपच्या उच्चस्तरीय रणनीती बैठकीत त्यांनी यावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीत त्यांनी पक्षाच्या नेत्यांना घुसखोरी आणि राज्याच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर भर देण्याच्या सूचना केल्या.
अमित शाह यांनी गुवाहाटीत मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि प्रदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. "आसामला घुसखोरीमुक्त करणे आणि राज्याची सुरक्षा अबाधित राखणे हेच भाजपचे प्रमुख उद्दिष्ट आहे," असा संदेश त्यांनी यावेळी दिला. काँग्रेसने घुसखोरीचा वापर आपल्या व्होट बँकेसाठी केला, मात्र भाजपने सत्तेत आल्यानंतर घुसखोरांवर कडक कारवाई केली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या दौऱ्यात अमित शाह यांनी आसाममधील विकासावरही भर दिला. त्यांनी डिब्रूगड येथे नवीन विधानसभा इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच त्यांनी सुमारे १,७१५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यात वन्यजीव संशोधन संस्था आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे. भाजप सरकारने आसाममधील १.२६ एकर जमीन अतिक्रमणातून मुक्त केल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना शाह म्हणाले की, "काँग्रेसने ईशान्य भारताच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आसाममध्ये शांतता आणि विकास आणला आहे." आगामी निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीनंतर आसाम भाजपचे अध्यक्ष दिलीप सैकिया यांनी सांगितले की, अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाईल.