पंतप्रधान मोदींनी पाठवलेली चादर अजमेर दर्ग्यावर अर्पण

Story by  Sameer D. Shaikh | Published by  Fazal Pathan • 3 Months ago
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रीजीजू अजमेर दर्ग्यावर पंतप्रधान नरेंद्र यांनी दिलेली चादर चढवताना
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रीजीजू अजमेर दर्ग्यावर पंतप्रधान नरेंद्र यांनी दिलेली चादर चढवताना

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजमेर शरीफ दर्ग्याच्या ८१३व्या उरुसानिमित्त चादर अर्पण करत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना आदरांजली वाहिली आहे. या चादरीसोबत पंतप्रधानांनी एक संदेशही पाठवला असून, त्यामध्ये त्यांनी ख्वाजा साहेबांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते ही चादर दर्ग्यावर अर्पण करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पत्रात भाविकांना शुभेच्छा देत लिहिले आहे, "गरीब नवाज यांच्या ८१३व्या उरुस मुबारकच्या प्रसंगी जगभरातील त्यांच्या अनुयायांना आणि अजमेर शरीफमध्ये आलेल्या सर्व श्रद्धाळूंना हार्दिक शुभेच्छा!"

पुढे त्यांनी म्हटले आहे, "वेगवेगळ्या कालखंडांमध्ये आपल्या संतांनी, पीर-फकीरांनी आणि महापुरुषांनी त्यांच्या महान प्रेरणादायी विचारांद्वारे लोकांच्या जीवनाला प्रकाशमान केले आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या शिकवणी, मानवतेबद्दलचे त्यांचे प्रेम आणि सेवा कार्य देश व समाजासाठी प्रेरणादायी स्रोत आहेत." 

मोदींनी त्यांच्या संदेशातून प्रेम, सहिष्णुता, आणि सामंजस्याच्या मूल्यांचा पुनरुच्चार करत असेही म्हटले आहे की, या उरुसाच्या निमित्ताने लोकांना देश आणि समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल.
 

किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया
चादर अर्पण करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच धार्मिक सौहार्दाला प्रोत्साहन दिले आहे. अजमेर शरीफच्या उरुसाला पंतप्रधानांच्या वतीने चादर अर्पण करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या कृतीतून देशाच्या एकात्मतेचा संदेश दिला गेला आहे."

न्यायालयीन विवाद आणि त्याचा परिणाम
दरम्यान, अजमेर शरीफ दर्ग्यावरून हिंदू सेनेने न्यायालयात केलेल्या याचिकेमुळे वाद सुरू आहे. त्यांनी दावा केला आहे की, या जागेवर हिंदू मंदिर होते. यामुळे काही गटांकडून पंतप्रधानांच्या चादर अर्पणावर आक्षेप घेण्यात आला आहे. तथापि, पंतप्रधानांनी या समाजकंटकांकडे दुर्लक्ष करत चादर पाठवली.

धार्मिक सौहार्दाचा संदेश
पंतप्रधान मोदींच्या कृतीने धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या शिकवणींनी प्रेम, सेवा, आणि मानवतेच्या तत्त्वांना अधोरेखित केले आहे, आणि पंतप्रधानांनी त्यांच्या शिकवणींना अधोरेखित करून देशातील सामंजस्याला प्रोत्साहन दिले आहे.

अजमेर दर्ग्याचा ऐतिहासिक वारसा
अजमेरचा दरगाह शरीफ हा भारतातील सर्वात महत्त्वाच्या आणि पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे समाधीस्थळ आहे. त्यांना गरीब नवाज अर्थात गरिबांवर कृपा करणारा असे म्हटले जाते. मोईनुद्दीन चिश्ती १२व्या शतकातील एक महान सूफी संत आणि चिश्तिया पंथाचे संस्थापक होते.
 
भारतात आगमन झाल्यावर त्यांनी इस्लामच्या सहिष्णुतेच्या, प्रेमाच्या, आणि सेवाभावाच्या शिकवणींनी भारतातील लाखो लोकांच्या मनावर प्रभाव टाकला. त्यांनी अजमेर येथे राहून धार्मिक सहिष्णुतेचा आणि समाजसेवेचा संदेश दिला. त्यांनी हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मांच्या अनुयायांना समान प्रेमाने जवळ घेतले आणि मानवतेच्या सेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांची दरगाह शरीफ भारताच्या धार्मिक सलोख्याचे प्रतीक मानला जातो. येथे जगभरातून सर्वधर्मीय भाविक दर्शनासाठी येतात.
 
अजमेर उरुस केवळ धार्मिक सोहळा नसून, हा भारतातील सांस्कृतिक ऐक्याचा उत्सव मानला जातो. हा सोहळा धार्मिक आणि सामाजिक सलोखा, एकता, आणि मानवी मूल्यांचा संदेश देतो. दरवर्षी या सोहळ्याला देश-विदेशातून लाखो लोक हजेरी लावतात, ज्यामुळे अजमेरचा हा वारसा जागतिक पातळीवर महत्त्वाचा ठरतो.  

उरुस म्हणजे काय?
उरुस हा उर्स या शब्दाचा अपभ्रंश आहे. सुफी संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनुयायी उर्स साजरा करतात. हा अरबी शब्द असून, त्याचा अर्थ 'विवाह' किंवा 'मिलन' असा होतो. सूफी परंपरेनुसार, संताचा मृत्यू हा ईश्वराशी त्यांच्या आत्म्याच्या मिलनाचा दिवस मानला जातो. म्हणूनच, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.  

मोईनुद्दीन चिश्ती उरुस कधी आणि कसा साजरा होतो?
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा उरुस इस्लामिक चंद्र पंचांगानुसार रजब महिन्यात सहा दिवस चालतो. या काळात लाखो भक्त अजमेर शरीफमध्ये येऊन ख्वाजा साहेबांना श्रद्धांजली वाहतात. सोहळ्याच्या दरम्यान, दर्ग्यात विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यामध्ये खालील गोष्टी महत्त्वाच्या असतात:  

१. चादर चढवणे:  
   भक्तगण दरग्यावर चादर चढवून आपली श्रद्धा व्यक्त करतात. देशाच्या पंतप्रधानांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण चादर अर्पण करतात.  

२. कव्वाली आणि सूफी संगीत:  
   उरुसादरम्यान कव्वालीच्या माध्यमातून सूफी संतांच्या शिकवणींचे गायन होते. या गीतांमध्ये प्रेम, सेवा, आणि मानवतेचा संदेश असतो.  

३.  लंगर (सामूहिक भोजन):  
   उरुसादरम्यान मोठ्या प्रमाणावर लंगरचे आयोजन केले जाते, जिथे हजारो लोकांना अन्नदान केले जाते.  

४. विशेष प्रार्थना:  
   ख्वाजा साहेबांच्या दरग्यात विशेष नमाज आणि प्रार्थना केल्या जातात, ज्या भक्तांना आध्यात्मिक शांती आणि मानसिक समाधान देतात. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter