दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला आज भारताने पुन्हा एकदा कठोर शब्दांत सुनावले. "दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा अन्यथा तुम्हाला भौगोलिक अस्तित्व गमवावे लागेल. पाकिस्तानला नकाशावरील त्यांचे स्थान कायम ठेवायचे असेल तर त्यांनी दहशतवादापासून दूर राहायला हवे," असा इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे. ते राजस्थानातील अनुपगड येथील लष्करी तळावर बोलत होते.
जनरल द्विवेदी म्हणाले की, "भारतीय लष्कर यावेळी कोणतीही दयामाया दाखवणार नाही. वेळ आली तर पुन्हा आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवू. जगाच्या नकाशावर स्वतःचे अस्तित्व ठेवायचे की नाही याचा विचार त्यांनी करायला हवा. पाकिस्तानला भूगोलामध्ये स्वतःचे स्थान कायम ठेवायचे असेल तर त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देता कामा नये." जवानांना सज्ज राहण्याचे आदेश देताना जनरल द्विवेदी यांनी देवाची इच्छा असेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळू शकेल. यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, असे नमूद केले.
'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत लष्करप्रमुख म्हणाले की, "या मोहिमेमध्ये कोणत्याही निष्पाप नागरिकाला इजा पोहोचू नये, लष्करी तळावर देखील हल्ला होता कामा नये याची काळजी घेत लक्ष्याचा वेध घेण्यात आला. दहशतवादी त्यांची प्रशिक्षणस्थळे आणि म्होरक्यांना टिपण्यात आले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अस्तित्वाचे पुरावे भारताने जगासमोर सादर केले." यावेळी लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचा गौरव केला. सीमा सुरक्षा दलाच्या १४० व्या बटालियनचे कमाउंट प्रभाकर सिंह, राजपुताना रायफल्सचे मेजर रितेशकुमार आणि हवालदार मोहित गैरा यांचा गौरव करण्यात आला.