आसाममध्ये ७२२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार; ४० केंद्रांवर मतमोजणीला प्रारंभ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए (NDA) सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवणार की काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडी बाजी मारणार, हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील ४० केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया सुरू असून, यात एकूण ७२२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये सर्व मतदारसंघांसाठी एकच मतमोजणी केंद्र आहे, मात्र नागावमध्ये तीन, तर कोक्राझार, तिनसुकिया आणि जोरहाटमध्ये प्रत्येकी दोन केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रक्रियेनुसार सर्वात आधी टपाली मतदानाची (पोस्टल बॅलेट) मोजणी केली जात आहे.

विक्रमी मतदान आणि कडेकोट सुरक्षा

मतमोजणी केंद्रांवरील ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आसाममध्ये ९ एप्रिल रोजी सर्व १२६ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. यंदा तब्बल ८५.९६ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली असून अडीच कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील अनेक प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई, विधानसभा अध्यक्ष विश्वजित दैमारी, विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया, एआययूडीएफचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल, रायजोर दलचे प्रमुख अखिल गोगोई आणि आसाम जातीय परिषदेचे अध्यक्ष लुरिनज्योती गोगोई यांचा समावेश आहे. याशिवाय अतुल बोरा आणि केशव महंत यांच्यासारखे अनेक कॅबिनेट मंत्रीही रिंगणात आहेत.

एकूण ७२२ उमेदवारांपैकी सर्वाधिक ९९ उमेदवार काँग्रेसचे आहेत. त्यानंतर भाजपचे ९० आणि एआययूडीएफचे ३० उमेदवार आहेत. एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या एजीपीचे २६ आणि बीपीएफचे ११ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच २५८ अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.