धार्मिक तणावानंतर आसामच्या धुब्रीत शांतता बहाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 d ago
धार्मिक तणावानंतर आसाममध्ये शांतता.
धार्मिक तणावानंतर आसाममध्ये शांतता.

 

आसामच्या धुब्री जिल्ह्यातील धुब्री शहरात सामुदायिक तणावानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे प्रशासनाने मंगळवारी शहरातील निर्बंध हटवले. सर्व दुकाने आणि बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवारी धुब्री शहरातील एका धर्मस्थळाजवळ मांसाचे तुकडे आढळल्याने वातावरण तंग झाले होते. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तात्पुरती बिघडली होती. सोमवारी निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले. धुब्रीचे जिल्हा आयुक्त दिबाकर नाथ यांनी सांगितले की, आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. बाजारपेठा आणि दुकाने पूर्ववत सुरू झाली.

शहरातील संवेदनशील भागांत हिंदू आणि मुस्लिम समाजातील सदस्यांनी एकत्र येऊन शांतता समित्या स्थापन केल्या. या समित्या सौहार्द आणि विश्वास वाढवण्यासाठी काम करत आहेत. गुवाहाटी येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे महानिरीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शहरातील असुरक्षित भागांना भेटी दिल्या. त्यांनी सांगितले की, परिस्थिती सामान्य आहे. राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. 

सोमवारी काही अज्ञात व्यक्तींनी धुब्री मजिस्ट्रेट कॉलनी आणि न्यू मार्केट परिसरात भाजीपाला विक्रेते आणि ई-रिक्षा चालकांवर हल्ले केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. तणाव आणि हिंसक निदर्शने टाळण्यासाठी प्रशासनाने बीएनएसएसच्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू केले. सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आणि पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावावर बंदी घालण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, ईदच्या उत्सवात काही ठिकाणी बेकायदा पशुहत्येच्या घटना घडल्या. पोलिसांनी १६ जणांना अटक केली असून तपास सुरू आहे. शांतता समित्या आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे धुब्रीत सौहार्दाचे वातावरण निर्माण होत आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter