"भारतात गुंतवणूक करण्यासाठी, नवनवीन शोध (innovation) लावण्यासाठी आणि 'मेक इन इंडिया'साठी हीच सर्वोत्तम वेळ आहे," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना थेट आमंत्रण दिले आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५' मध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान सर केयर स्टारमर हे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत बोलताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचा आणि संधींचा आढावा जगासमोर मांडला.
ते म्हणाले, "आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे आणि एक विशाल बाजारपेठ आहे. सरकारने केलेल्या सुधारणांमुळे भारतात व्यवसाय करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे."
भारताच्या डिजिटल क्रांतीचा उल्लेख करताना, त्यांनी यूपीआय (UPI) च्या यशाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "भारताने फिनटेक आणि डिजिटल पेमेंटमध्ये जी क्रांती केली आहे, ती संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहे. हेच 'इनोव्हेशन' आम्ही प्रत्येक क्षेत्रात पाहू इच्छितो."
पंतप्रधान मोदींनी जागतिक कंपन्यांना आवाहन केले की, त्यांनी भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हावे आणि 'मेक इन इंडिया' अभियानाचा भाग बनून, भारताला एक जागतिक उत्पादन केंद्र (Global Manufacturing Hub) बनवण्यासाठी मदत करावी.