उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनास कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताच्या तपासात यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. बारामती येथील अपघातस्थळावरून गुरुवारी (२९ जानेवारी) दुपारी ब्लॅक बॉक्स सुखरूप हस्तगत करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या पेटीमुळे अपघाताच्या अगदी शेवटच्या क्षणी वैमानिक कक्षात काय घडले होते, हे समजण्यास मदत होणार आहे.
तपास पथकाला विमानाचे अवशेष बाजूला करताना हा 'फ्लाइट डेटा रेकॉर्डर' (FDR) आणि 'कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर' (CVR) सापडला. हा बॉक्स तातडीने पुढील विश्लेषणासाठी दिल्लीला पाठवण्यात येत आहे. तिथे असलेल्या प्रयोगशाळेत यातील डेटा डिकोड केला जाईल. वैमानिकांचे शेवटचे संभाषण आणि विमानाची तांत्रिक स्थिती यावरून स्पष्ट होईल. हे विमान लँडिंग करताना धावपट्टीवर का घसरले किंवा हवेतच काही तांत्रिक बिघाड झाला होता का, या प्रश्नांची अचूक उत्तरे आता मिळणार आहेत.
बुधवारी सकाळी लिअरजेट ४५ हे खाजगी विमान बारामती विमानतळावर उतरताना अपघातग्रस्त झाले होते. या भीषण दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली होती. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सुदैवाने अत्यंत मजबूत आवरण असलेला हा नारंगी रंगाचा महत्त्वपूर्ण बॉक्स सुरक्षित अवस्थेत मिळाला आहे.
विमान अपघात अन्वेषण ब्यूरो (AAIB) चे पथक सध्या घटनास्थळी तळ ठोकून आहे. त्यांनी धावपट्टी आणि आसपासच्या परिसराची कसून तपासणी सुरू ठेवली आहे. हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड किंवा मानवी चूक या सर्व अंगांनी तपास सुरू आहे. मात्र, ब्लॅक बॉक्स मधील माहितीच या तपासाला योग्य दिशा देईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. या बॉक्समधील डेटाचे विश्लेषण केल्यानंतर अपघाताचे खरे कारण समोर येईल.