छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची जी अनेक वैशिष्ट्ये होती, त्यातील एक प्रमुख म्हणजे अभेद्य गड-कोट. ते या स्वराज्याचे मानबिंदू होत. या किल्ल्यांनी जसे आपल्या राज्याला सांभाळले; तसाच जनांनाही आधार दिला. हे गड म्हणजे फक्त दगडांच्या वास्तू नव्हेत, त्यांच्या कड्या-कपाऱ्यांमध्ये लढवय्या मराठ्यांची संघर्षगाथा दडली आहे. परकी आक्रमणांना पुरून उरलेल्या या वास्तूंनी नेहमीच शत्रूचा पहिला वार स्वतःच्या छातीवर झेलला. मराठा दौलतीची ही शान आजही देशोदेशीच्या अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय ठरते. शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा नुकताच ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा नामांकनयादीत समावेश झाला. महाराष्ट्र आणि तमाम मराठीजनांसाठी ही गौरवाची बाब म्हणावी लागेल. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्यविषयक व सांस्कृतिक महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले.
सह्याद्रीच्या डोंगररांगांतील दुर्गशृंखलेचे एक शास्त्र आहे. शिवाजी महाराजांच्या आधीही किल्ले होतेच; पण महाराजांनी जे गडकोट उभे केले, त्यात प्रत्यक्ष निसर्गालाच त्यांनी आपला पाठिराखा आणि संरक्षक बनविल्याचे दिसून येते. यातही जुने आणि नवीन किल्ले यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानांचा विचार केला तर ती शिवकालीन एकात्मिक लष्करी यंत्रणा असल्याचे दिसते. पश्चिमेकडील जलदुर्ग, किनाऱ्यावरील किल्ले, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरील वनदुर्ग, गिरीदुर्ग ( उदा ःराजगड) आणि स्थलदुर्ग यांच्या उभारणीमागे मोठी लष्करी रणनीती दडली आहे. या दुर्गशृंखलांचा विस्तार जसा पूर्व-पश्चिम असा आहे, तसाच तो उत्तर आणि दक्षिण असाही आहे.
या गडकिल्ल्यांच्या स्थानांमुळे त्यांच्या पायथ्याशी असलेला मोठा भूप्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. या किल्ल्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घाटवाटा. त्यांच्या निर्मितीमागे दळणवळणाच्या सोयीचा विचार आहे. लष्करालाही वेगवान हालचालींसाठी याच लाभ होत असे. त्यामुळे ही दुर्गशृंखला प्रभावी अशी एकात्मिक लष्करी यंत्रणा ठरते. हे मर्म शिवरायांनी जाणले. जिथे कमकुवत दुवा दिसला तिथे त्यांनी डोंगर नव्याने किल्ल्यामध्ये रूपांतरित केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पन्हाळ्याशेजारील पावनगड होय. महाराजांच्या दूरदृष्टीने तत्कालीन लष्करीप्रणालीत आमूलाग्र बदल झाला.
या किल्ल्यांचे रचनाशास्त्र मुळातून अभ्यासण्यासारखे आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी घेरा असतो, या घेऱ्यात काही गावे असतात. खरे तर तिथूनच त्यांना रसदपुरवठा होतो. त्यानंतर मेठ, माची (टेहळणी आणि आक्रमणासाठी) आणि नंतर मुख्य बालेकिल्ला अशी ही रचना. यातही दुर्गांच्या जलव्यवस्थाप्रणाली, निवासव्यवस्था या भिन्न पण दखलपात्र गोष्टी ठरतात. म्हणूनच या दुर्गांची स्वतंत्र अशी एक परिसंस्था असून तिला वेगळे जागतिक मूल्य आहे. आपल्या किल्ल्यांचे वेगळेपण हे की ती निसर्गानुकूल रचनांमुळे निर्माण झालेली संरक्षणप्रणाली आहे. तिला एकात्मिक का म्हणायचे तर आजही आपण एका दुर्गावरून दुसऱ्या दुर्गावर जाऊ शकतो, दोन दुर्गांमध्ये सांकेतिक संवादही होऊ शकतो. यामुळे परचक्राचे आक्रमण होते तेव्हा सगळे किल्ले लढत असतात.
युनेस्कोच्या वारसायादीत या वास्तूंचा समावेश झाल्याने बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. मुख्य म्हणजे किल्ल्यांच्या पुरातन स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करता येईल. राज्यातील प्रत्येक दुर्गावर आदर्श जलव्यवस्था दिसून येते.जेव्हा काही मानवनिर्मित स्थापत्यकृती कालौघात नष्ट होतात तेव्हा कालांतराने तो ऐतिहासिक दाखलाही पुसला जाण्याचा धोका असतो. हे गड किल्ले राहिले, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची नोंद झाली, तर त्यातून काही नव्या गोष्टीही शिकता येतील. महाराष्ट्रातील तत्कालीन मानवी जीवन, सांस्कृतिक वारसा, लष्करीरचना आणि लोकपरंपरा यांचा साधारणपणे दीड ते दोन हजार वर्षांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचविता येईल. पर्यटनाला चालना मिळेल, शिवाय किल्ल्यांच्या परिसरामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
यंत्रणेसमोर नवी आव्हानेही निर्माण होऊ शकतात, गडांच्या संरक्षण देखभालीवर अधिक लक्ष द्यावे लागेल. गडाच्या पावित्र्याची तटबंदी ढासळता कामा नये, याची काळजी मात्र सरकारलाच घ्यावी लागेल. सन्मानाबरोबर आलेल्या जबाबदारीचे भानही प्रत्येकाने ठेवायला हवे. युनेस्कोसमोर हा वारसा मांडताना आपल्याला ज्या मुख्य अडचणी आल्या त्या म्हणजे दस्तावेजीकरण नसणे आणि व्यवस्थापनातील त्रुटी. ‘युनेस्को’च्या सल्लागार मंडळाने त्यावर बोट ठेवले होते. निदान भविष्यात तरी अशाप्रकारची नाचक्की टाळायला हवी. तेजस्वी वारसा सांगायचा असेल तर वर्तमानातील व्यवस्थापन आणि मांडणीही तितकीच भक्कम असावी लागते.