भटक्या कुत्र्यांची दया करा, पण मानवी जिवाच्या बदल्यात नको! सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भटक्या कुत्र्यांबद्दल दयाभाव असायलाच हवा, मात्र त्याची किंमत मानवी जीव गमावून मोजावी लागू नये, असे अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले. देशभरात आणि विशेषतः केरळमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर दाखल याचिकांवर सुनावणी करताना खंडपीठाने हे मौखिक मत व्यक्त केले.

न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती करोल यांनी एका अलीकडील व्हायरल व्हिडिओचा संदर्भ दिला. या व्हिडिओमध्ये भटकी कुत्री एका लहान मुलावर क्रूरपणे हल्ला करताना आणि लचके तोडताना दिसत आहेत. या घटनेबद्दल चिंता व्यक्त करताना न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, आपण प्राण्यांबद्दल नक्कीच दयाळू असायला हवे, पण माणसांचे जीव धोक्यात घालून ही दया दाखवणे योग्य नाही.

न्यायमूर्ती करोल यांनी त्या व्हिडिओतील घटनेचा उल्लेख करत लोकांच्या असंवेदनशीलतेवरही बोट ठेवले. ते म्हणाले, "त्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडला होता. तिथे आजूबाजूला लोक उभे होते, पण दुर्दैवाने त्या मुलाच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही." समाजाची ही उदासीनता अतिशय चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयात सध्या प्राणी जन्म नियंत्रण नियम (Animal Birth Control Rules), २०२३ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुनावणी सुरू आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेला धोका या मुद्द्यांवर न्यायालयात युक्तिवाद सुरू आहेत. न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील सुनावणी आता २८ जानेवारी रोजी ठेवली आहे.