दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचा २,००० हून अधिक तक्रारींशी संबंध असून त्यांनी ३०० कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा केला आहे. या टोळीच्या मुख्य सूत्रधारासह १० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. तपासादरम्यान पोलिसांना अनेक राज्यांमध्ये पसरलेले हे संघटित जाळे आढळले असून त्याचे धागेदोरे कंबोडियामधील आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक टोळ्यांशी जोडलेले आहेत.
गुन्ह्यातील पैसा वळवण्यासाठी वापरण्यात आलेल्या १०० हून अधिक बनावट कंपन्यांशी संबंधित २६० पेक्षा जास्त बँक खाती पोलिसांनी आतापर्यंत ओळखली आहेत. या टोळीशी संबंधित तक्रारींची एकूण संख्या २,५६७ इतकी आहे. मुख्य आरोपी करण कजारिया विरुद्ध लूक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. त्यानंतर ३ एप्रिल रोजी त्याला कोलकाता विमानतळावर पकडण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला दुसऱ्या दिवशी दिल्लीत आणण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) आदित्य गौतम यांनी दिली.
एका गुंतवणुकीच्या योजनेत ३१.४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सुलतान या दिल्लीतील रहिवाशाने केली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पीडित व्यक्तीला एका बनावट ट्रेडिंग अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास आणि मोठ्या परताव्याच्या आमिषाने पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. मात्र नफा काढण्याचा प्रयत्न केला असता ते अॅप्लिकेशन बंद पडले आणि टोळीशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी ईशान्य दिल्लीतील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सखोल तपासासाठी तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या टोळीने पीडितांना जाळ्यात ओढण्यासाठी बनावट गुंतवणूक प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग ग्रुप तयार केले होते. मध्यस्थांमार्फत मिळवलेल्या 'म्यूल' बँक खात्यांचा त्यांनी वापर केला आणि ओटीपीसह (OTP) इतर संवेदनशील बँकिंग माहिती मिळवण्यासाठी घातक अॅप्लिकेशन्सचा वापर केला. तपासाचा मागोवा घेता येऊ नये म्हणून पीडितांकडून गोळा केलेले पैसे बँक खाती आणि शेल कंपन्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याद्वारे फिरवण्यात आले.
मुख्य समन्वयक मानला जाणारा कजारिया हा परदेशातील ऑपरेटरशी थेट संपर्कात होता. तो क्रिप्टोकरन्सी चॅनेलद्वारे निधीची हालचाल सुलभ करत असे, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. त्याने भारतीय हस्तक आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार यांच्यातील दुवा म्हणून काम केले. तो 'म्यूल' बँक खाती मिळवण्यामध्ये आणि कूटबद्ध (encrypted) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे संवेदनशील बँकिंग तपशील शेअर करण्यात गुंतलेला होता, असेही त्यांनी नमूद केले.
कजारिया परदेशातील फसवणूक करणाऱ्यांच्या नेटवर्कशी संबंध वाढवण्यासाठी वारंवार परदेश दौरा करत असे. अटक टाळण्यासाठी त्याने भारताबाहेर राहण्याचा प्रयत्न केला होता. तांत्रिक देखरेखीमुळे तपासकर्त्यांना या जाळ्याचा माग कोलकातापर्यंत घेता आला. तिथे अनेक बँक खाती आणि शेल कंपन्या कार्यरत असल्याचे आढळले. भारतात आल्यावर त्याला विमानतळावर अडवून ताब्यात घेण्यात आले.
चौकशी दरम्यान त्याने या टोळीतील सहभागाची कबुली दिली. त्याच्या नेटवर्कशी संबंधित खाती 'नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल'वर नोंदवलेल्या २,५०० पेक्षा जास्त तक्रारींशी आणि ३०० कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहेत, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. ही टोळी गेल्या ४ ते ५ वर्षांपासून सक्रिय असून अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
कारवाई दरम्यान पोलिसांनी ४८ मोबाईल फोन, २५८ सिम कार्डे, अनेक एटीएम कार्डे आणि चेक बुक्स, ४ लॅपटॉप आणि अनेक बँकिंग व केवायसी (KYC) कागदपत्रे जप्त केली आहेत. १९ लाख रुपयांचा निधी गोठवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून टोळीतील इतर सदस्यांची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.