वॉशिंग्टन
भारताचा बहुराष्ट्रीय गट असलेल्या एस्सार ग्रुपकडून अमेरिकेत विक्रमी गुंतवणूक करण्यात येत असून, आयोवा येथे अमेरिकेच्या इतिहासातील "सर्वात मोठा स्टील प्लॉन्ट" उभारण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. १५ अब्ज डॉलर्सच्या (अंदाजे १.२५ लाख कोटी रुपये) या महाप्रकल्पाची घोषणा ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये एस्सार ग्रुपचे सह-संस्थापक रवी रुईया आणि त्यांचे सुपुत्र रेवंत रुईया यांच्या उपस्थितीत केली.
एस्सार ग्रुपच्या मालकीची मिनेसोटास्थित कंपनी असलेल्या 'मेसाबी मेटलिक्स' (Mesabi Metallics) द्वारे हा नवीन स्टील प्लॉन्ट उभारला जात आहे. २०२३ पर्यंत उत्पादन सुरू करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असून यादरम्यान वार्षिक १ कोटी टन स्टीलचे उत्पादन होईल आणि राज्यामध्ये तब्बल १,७५० स्थायी रोजगारांची निर्मिती होईल, असे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हा प्लॉन्ट मिनेसोटामध्ये कंपनीने अडीच अब्ज डॉलर्स गुंतवणूक करून तयार केलेल्या नवीन खनिजाचा वापर करणार आहे. या खदानीतून दरवर्षी सुमारे ७.५ दशलक्ष टन लोह उत्पादित होईल आणि ३५० हून अधिक जणांना रोजगार मिळेल. २० व्या शतकात अमेरिकेतील एकूण लोह खनिज उत्पादनात ६० टक्के योगदान देणाऱ्या 'मेसाबी आयर्न रेंज'मध्ये हा प्रकल्प उभारला जात आहे. या घोषणेवेळी ऊर्जा सचिव क्रिस राईट, वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.