नवी दिल्ली
भारताच्या ग्रँड मस्जिदचे चीफ इमाम डॉ. मुहम्मद अब्दुल हकीम अझारी यांनी ग्रँड मुफ्ती कांतापुरम ए.पी. अबूबक्र मुसलियार यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशातील सामाजिक सलोखा, अल्पसंख्याकांसमोरील आव्हाने आणि शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.
या भेटीनंतर 'आवाज द व्हॉईस'चे प्रधान संपादक आतिर खान यांच्याशी केलेल्या विशेष संवादात डॉ. अझारी यांनी स्पष्ट केले की, देशाचा विकास, स्थिरता आणि दीर्घकालीन शांततेसाठी 'सामाजिक सलोख्याला'प्राधान्य देणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
त्यांनी सांगितले की, या भेटीत केवळ रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त सकारात्मक संदेशाची देवाणघेवाण झाली नाही, तर देशात वाढत्या ध्रुवीकरणाच्या (एकांगी गटबाजीच्या) प्रवृत्तीवरही गंभीर चर्चा झाली. ते म्हणाले, "आम्ही पंतप्रधानांसमोर अल्पसंख्याक समाजाच्या काही खऱ्या अडचणी मांडल्या. तसेच तळागाळात सामाजिक सलोखा कसा बळकट करता येईल, यावरही विचारविनिमय केला."
डॉ. अझारी यांनी विशेषतः 'इंसानियत के साथ' या उपक्रमाचा उल्लेख केला. ग्रँड मुफ्ती कांतापुरम यांनी केरळमध्ये हि १६ दिवसांची आध्यात्मिक यात्रा केली होती. या यात्रेत त्यांनी विविध समाजांतील लोकांशी संवाद साधला, त्यांच्या गोष्टी ऐकल्या आणि सामाजिक वीण घट्ट करण्याच्या गरजेवर भर दिला. "आम्हाला वाटते की हा 'माणुसकीचा' संदेश संपूर्ण भारतात पसरावा. धर्म आपली जागी आहे, श्रद्धा आपली जागी आहे, पण माणुसकी सर्वात श्रेष्ठ आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
संवादादरम्यान डॉ. अझारी यांनी हेही स्पष्ट केले की, इस्लाम केवळ उपासना, नमाज आणि रोजांपुरता मर्यादित नाही, तर तो मानवाच्या पूर्ण विकासाचे मार्गदर्शन करतो. ते म्हणाले, "इस्लामिक शिक्षण, प्रशिक्षण, शेती, उद्योग आणि व्यापार अशा प्रत्येक क्षेत्रात संतुलित विकासाची गोष्ट करतो. आपल्याला अशा सामाजिक संस्थांची गरज आहे, ज्यांचे नेतृत्व विद्वान करतील आणि जे समाजाला योग्य दिशा देतील."
त्यांनी केरळमधील 'जामिया मरकझ खत्ताब सुन्नत'चे उदाहरण दिले. तिथे एकाच आवारात धार्मिक आणि आधुनिक शिक्षणाचा मेळ कसा साधला जातो, हे त्यांनी सांगितले. ग्रँड मुफ्ती शेख अबूबक्र साहेब यांनी स्थापन केलेली ही संस्था गेल्या ४८ वर्षांपासून प्राथमिक धार्मिक शिक्षणापासून ते मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंतचे शिक्षण देत आहे. आज हे मॉडेल भारताच्या सुमारे २० राज्यांमध्ये विविध स्तरांवर काम करत आहे. पंजाबच्या सरहिंद शरीफमध्ये नुकतेच एका मोठ्या शैक्षणिक संस्थेचे झालेले उद्घाटन हे याचेच प्रमाण आहे.
डॉ. अझारी यांचे असे मानणे आहे की, शिक्षण प्रणालीला काळाप्रमाणे नवी प्रशासकीय रचना आणि नव्या विचारांसह पुढे नेण्याची गरज आहे. "जर संस्थेचा पाया मजबूत असेल, तर समाजात चांगले बदल खूप सहजपणे घडवून आणता येतात," असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या काळात भारतीय विद्वानांसमोर (उलेमा) काय आव्हाने आहेत, असे विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, एकता हाच सर्वात मोठा उपाय आहे. त्यांनी सुचवले, "विद्वानांनी एकटे राहू नये, तर समूहाने काम करावे. केरळमध्ये चाळीस उलेमांची एक समिती (शूरा) आहे, जी चर्चा केल्यानंतरच फतवे जारी करते. इतर राज्यांतही अशा सभा तयार झाल्या पाहिजेत, जेणेकरून प्रत्येक निर्णय पूर्ण विचारांती घेतला जाईल."
त्यांनी हेही अधोरेखित केले की, आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. इथे कोणीही स्वतःला विद्वान घोषित करून चुकीचे विचार पसरवू शकतो. ते म्हणाले, "याचा सामना करण्याचा एकच मार्ग आहे. अस्सल आणि प्रतिष्ठित विद्वानांनी एका व्यासपीठावर यावे, तथ्यांची खात्री करावी आणि विचारपूर्वक विधाने करावीत. घाईगडबडीत प्रतिक्रिया देणे योग्य नाही."
राजकारण आणि धार्मिक नेतृत्व यांच्या संबंधांवर त्यांनी संतुलित भूमिका मांडली. ते म्हणाले, "आम्ही राजकारणात थेट हस्तक्षेप करत नाही आणि राजकारणानेही आमच्या धार्मिक बाबींत ढवळाढवळ करू नये. पण सरकारशी सकारात्मक संवाद आवश्यक आहे, जेणेकरून अल्पसंख्याक आणि इतर समाजांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवता येतील."
आजच्या तणावपूर्ण वातावरणात इस्लामची शिकवण योग्य स्वरूपात कशी मांडावी, यावर डॉ. अझारी यांनी 'संवादाची' परंपरा पुन्हा सुरू करण्यावर भर दिला. ते म्हणाले, "खानकाह (आश्रम) आणि मदरशांमध्ये समोरासमोर बसून शिक्षण दिले जाते. हीच पद्धत सर्वात प्रभावी आहे. सोशल मीडियाच्या गोंगाटात सत्य अनेकदा दबून जाते."
आतिर खान यांच्याशी साधलेल्या संवादाच्या शेवटी त्यांनी प्रेम आणि जिव्हाळा यालाच सामाजिक सलोख्याचा पाया असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "द्वेषाची भाषा पूर्णपणे सोडावी लागेल. हिंदू परंपरांची उदाहरणे असोत वा सुफी संतांची शिकवण—भारताची संस्कृती नेहमीच समन्वयाची आणि एकत्र राहण्याची राहिलेली आहे. आपल्याला तीच परंपरा पुढे न्यायची आहे."
डॉ. अझारी यांच्या शब्दांत सांगायचे तर, भारताची ताकद त्याच्या विविधतेत आणि सामायिक वारश्यात आहे. जर शिक्षण, माणुसकी आणि संवाद यांना केंद्रस्थानी ठेवले, तर केवळ अल्पसंख्याकांच्या समस्यांचे समाधान होणेच शक्य नाही, तर देशाला विकास आणि शांततेची नवी दिशाही मिळू शकते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -