पंतप्रधान मोदी आणि ग्रँड मुफ्तींची भेट; सामाजिक सलोखा आणि मानवतेच्या कल्याणासाठी केला निर्धार
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 15 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद
भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद यांनी सोमवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर या भेटीबद्दल माहिती देताना म्हटले की, "भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद साहेब यांच्याशी अतिशय उत्तम संवाद झाला. आम्ही विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. सामाजिक सलोखा, बंधुभाव वाढवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत."
Had a very good interaction with Sheikh Abubakr Ahmad Sahab, Grand Mufti of India. We exchanged views on a wide range of issues. His efforts to further social harmony, brotherhood and improve education are noteworthy.@shkaboobackerpic.twitter.com/HSxmCe2aUG
शेख अबुबकर अहमद हे भारताचे १० वे आणि विद्यमान ग्रँड मुफ्ती आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. केरळमधील एक प्रख्यात सुन्नी विद्वान म्हणून ते 'ऑल इंडिया सुन्नी जमीय्यातुल उलेमा'चे नेतृत्व करतात.
दुबईला रवाना होण्यापूर्वी 'आवाझ-द व्हॉइस'ने शेख अबुबकर अहमद यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांसोबतच्या भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, "ही भेट माझ्या मानवतेसाठी असलेल्या प्रवासाचा एक भाग होती. जानेवारीत केरळ मुस्लिम जमाततर्फे लोकांसोबत आणि मानवतेसोबत या संकल्पनेखाली १६ दिवसांची केरळ यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान मी केरळमधील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. तेथील परिस्थितीबद्दल मी पंतप्रधानांना माहिती दिली. त्यांनी सर्व मुद्दे सकारात्मकतेने ऐकून घेतले. पंतप्रधान आवश्यक ती पावले उचलतील. तसेच केरळचे मुख्यमंत्रीही त्यांचे काम करतील. काही विषयांवर अजून विचार सुरू असून नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून सर्व आवश्यक पावले उचलली जातील."
पंतप्रधानांच्या निदर्शनास नेमके कोणते विषय आणले, असे विचारल्यावर ते म्हणाले, "ही भेट सुमारे अर्धा तास चालली आणि ती अतिशय यशस्वी ठरली. आम्ही संसदेत नुकत्याच संमत झालेल्या वक्फ दुरुस्ती कायद्यावर चर्चा केली. आम्ही जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष परिस्थितीवर भाष्य केले. पंतप्रधानांनी अनेक प्रश्न विचारले आणि मी त्यांना सर्व माहिती सविस्तरपणे दिली."
मरकज जमीय्यातुल उलेमा यांनी शिक्षण क्षेत्रात एक नवीन दर्जा प्रस्थापित केला आहे, यावर चर्चा झाली का? यावर उत्तर देताना ग्रँड मुफ्ती म्हणाले, "आमचा शिक्षणाचा प्रवास केरळमधील केवळ एका शाखेपासून सुरू झाला आणि आज तो कसा वाढत आहे, हे मी त्यांना सांगितले. या क्षेत्रात अजून बरेच काही करायचे आहे. आम्ही शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला असून या मोहिमेत मी पंतप्रधानांचे सहकार्य मागितले आहे."
देशातील सामाजिक सलोखा किंवा सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली का, यावर ते म्हणाले, "अंतर्गत भांडणांमुळे कोणाचाही फायदा होत नाही, असे मी त्यांना सांगितले. देशात जेव्हा सलोखा आणि बंधुभाव असतो, तेव्हाच विकास आणि प्रगती शक्य आहे, असे मी पंतप्रधानांना स्पष्ट केले."
रमजाननिमित्त संदेश देताना ते म्हणाले, "हा असा महिना आहे जेव्हा श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होते. हा महिना प्रेम वाटण्याचा आणि ईश्वराची कृपा मिळवण्याचा आहे. या पवित्र महिन्यात आपण सर्वांनी प्रेम आणि सौहार्द पसरवण्यासाठी कार्य केले पाहिजे."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -